लघुउद्योजकांची ‘धनलक्ष्मी’ 

प्रवीण कुलकर्णी
गुरुवार, 9 मे 2019

"सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" या पुरवणीत...

बिझनेस वुमन: शिल्पा पोफळे
स्टार्टअप संस्कृतीचा जन्म होण्याअगोदर एखाद्या महिलेने लघुउद्योजकांना कर्ज देणारी कंपनी सुरू करणे आणि तिचा देशभर विस्तार करणे हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील दुर्मीळ उदाहरण. त्यातही बॅंका किंवा इतर वित्तपुरवठादार कंपन्या कर्जे देताना तारण म्हणून व्यावसायिकाची जमीन, स्थावर किंवा जंगम मालमत्ता ठेवत असताना प्रत्यक्षात व्यवसायासाठी वापरात असलेल्या मशिन्स किंवा इतर सामग्रीवर कर्जे देणाऱ्या ‘इलेक्‍ट्रॉनिका फायनान्स लिमिटेड’ अर्थात ‘ईएफएल’च्या व्यवस्थापकीय संचालिका शिल्पा पोफळे या एकमेव. 

शिल्पा यांनी वनस्पती शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण (एमएस्सी, बॉटनी) पूर्ण केले आहे. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या त्यांचा फायनान्सिंग क्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. मात्र, वडिलांबरोबर ऑफिसला जात असताना त्यांना या क्षेत्राची ओळख झाली आणि त्यांची त्यातील रुची वाढत गेली. याविषयी बोलताना त्या सांगतात, ‘‘वडिलांच्या मॅन्युफॅक्‍चरिंग कंपनीसाठी विविध उत्पादनांचा पुरवठा करणाऱ्या लघुउद्योजकांसमोर भांडवलाची मोठी समस्या होती. ती समस्या जाणून घेऊन सोडविण्याच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना ‘ईएफएल’ला सुरवात झाली. आज ‘ईएफएल’ देशभरातील उद्योजकांना कर्ज पुरविण्यात आघाडीवर आहे. मशिन टूल्स, प्लॅस्टिक, फर्निचर, प्रिंटिंग किंवा पॅकेजिंगसारख्या उद्योग क्षेत्रात अद्ययावत उपकरणे घेण्यासाठी कंपनी अर्थसाह्य करत आहे. अलीकडेच कंपनीने किराणा दुकानदार, छोटे व्यावसायिक यांनादेखील कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरवात केली आहे.’’ 

शिल्पा या लघुउद्योजकांसाठी खऱ्या अर्थाने धनलक्ष्मी ठरत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याचे कारण म्हणजे कर्जे देण्याच्या प्रकारातील नावीन्यता. एकीकडे व्यवसायात आवश्‍यक असणाऱ्या मशिन्सला कर्जे देत असतानाच व्यावसायिकाला स्वतःची जागा घेता यावी यासाठी ‘इंडस्ट्री प्रॉपर्टी खरेदी’ नावाने त्यांनी वेगळा फंड तयार केला आहे. याअंतर्गत त्या व्यावसायिकाला एका जागी स्थिरावत यावे यासाठी स्थावर मालमत्ता घेण्यासाठी कर्ज उपलब्धता करू देतात. एकीकडे सरकार, बॅंका किंवा इतर संस्था लघुउद्योजकांना कर्जपुरवठा करत असताना ईएफएलच्या वेगळेपणाविषयी बोलत असताना शिल्पा सांगतात, ‘‘बॅंका किंवा इतर कर्जे देणाऱ्या संस्थांना प्रत्यक्षात त्या व्यवसायाची जाणीव नसते त्यामुळे व्यावसायिकाची गरज आणि त्याची अडचण ओळखून ‘कस्टमाइझ्ड ॲप्रोच’ ठेवून कर्ज उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे.’’ 

देशाच्या विकासात छोटे आणि लघुउद्योजकांचे महत्त्व जाणून घेऊन त्या दृष्टीने कंपनीचा व्यवसाय वाढविण्यावर भर असतानाच त्यांनी स्वतःला देखील अपडेटेड ठेवण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापनाचा कोर्स पूर्ण केला आहे. व्यवसाय, कर्जे यांसारख्या विषयात गढून गेलेल्या शिल्पा यांना कामाचा ताण हलका होण्यासाठी काय करता, असे विचारले असता, ‘विविध विषयांवरील वाचन,’ असे उत्तर येताच या ‘बिझनेस वुमन’चा पिंडच वेगळा असल्याचे लक्षात येते. ‘निसर्गसंवर्धन करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत,’ असे सांगून ‘एमएस्सी बॉटनी’ला त्या विसरल्या नसल्याचे देखील लक्षात येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business women Shilpa Pophale maitrin supplement sakal pune today