मुलाचं हास्य पाहून थकवा जातो!

deepika-singh-goyal
deepika-singh-goyal

कम बॅक मॉम - दीपिका सिंग-गोयल, अभिनेत्री
‘आई’ या शब्दाचा खरा अर्थ एका मुलाला जन्म दिल्यावर मला समजला. आई होणं हेच जगातील सर्वांत मोठं सुख आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून मी प्रेक्षकांच्या भेटीला येत असते; पण प्रेक्षकांचं मनोरंजन करतानाच दुसरीकडं माझ्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारीही असते. खरं तर मी माझ्या प्रेग्नंसीदरम्यान काहीच काम केलं नाही. फक्त काही कार्यक्रम, फॅशन शोला मी हजेरी लावायचे. प्रेग्नंसीदरम्यान माझ्या आरोग्याच्या दृष्टीनं काही काळ अभिनय क्षेत्रापासून दूर राहण्याचा मी निर्णय घेतला. त्यानंतर मला अनेक भूमिकांसाठी ऑफर येऊ लागल्या, मात्र लगेचच कोणत्याही चित्रीकरणाला सुरवात करण्याची माझी तयारी नव्हती. मला माझ्या मुलाला अधिक वेळ द्यायचा होता. माझा मुलगा सोहम आता दोन वर्षांचा आहे. तो एक वर्षाचा झाल्यावर मी कमबॅक करण्यासाठी तयारी सुरू केली होती. प्रेग्नंसीदरम्यान माझं वजन खूपच वाढलं होतं. सोहम एक वर्षांचा झाल्यानंतर वजन कमी करण्याकडं मी भर दिला. प्रेग्नंसीनंतर अभिनयक्षेत्रात काम मिळणार की नाही, या भीतीने मी वजन कधीच कमी केलं नाही. लठ्ठपणामुळं पुढं आपल्यालाच त्रास होऊ शकतो, या विचारानं मी वजन कमी केलं.

इतका काळ अभिनयक्षेत्रापासून लांब राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे, सोहमसारखा आजारी असायचा. त्याला सोडून काम करणं माझ्या मनाला पटत नव्हतं. त्यामुळं माझ्या करिअरचा, कामाचा विचार न करता मी पूर्ण वेळ त्याच्याबरोबर राहिले. अभिनयक्षेत्रात पुन्हा काम मिळालं नाही तरी चालेल, पण आपण आपल्या मुलाला एकटं सोडायचं नाही, या मतावर मी ठाम होते. सोहम अगदी ठणठणीत झाल्यावर मी नव्या जोमानं काम करण्याची तयारी दाखवली. हिंदी कलर्स वाहिनीवरील ‘कवच २’ या मालिकेसाठी मला विचारण्यात आलं. या मालिकेतील माझी भूमिकाही चांगली असल्यानं मी लगेचच होकार दिला. प्रेग्नंसीनंतरची ही माझी पहिली मालिका आहे. 

कामाचा सगळा विचार बाजूला सारून मी आईपण खऱ्या अर्थानं एन्जॉय केलं. या दोन वर्षांमध्ये मी सोहमलाही वेळ दिला आणि आई म्हणून मला स्वच्छंदपणे जगताही आलं. अजूनही मी एकत्रित कुटुंबामध्ये राहते. नव्यानं कामाला सुरवात करायची म्हटल्यावर त्यांचाही मला खूप पाठिंबा मिळाला. माझा नवरा रोहित गोयलनंही माझ्या प्रत्येक कामामध्ये मला प्रोत्साहन दिलं. सोहमला सांभाळण्यात माझ्या सासूबाईंचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी मला प्रेग्नंसीनंतर दोन महिन्यांनी काम करण्याची परवानगी दिली होती; पण त्या वेळी कुटुंबाबरोबर राहणं मला महत्त्वाचं वाटलं. माझा माझ्या कुटुंबावर पूर्ण विश्‍वास आहे आणि म्हणूनच मी घराबाहेर पडून पुन्हा काम करू शकले. आई झाल्यानंतर संपूर्ण जीवनच बदलून जातं.

घर, कुटुंब आणि मूल यांना सांभाळत काम करण्यातही एक वेगळी मजा आहे. आपल्या मनाची तयारी असेल आणि काम करण्याची जिद्द असल्यास आपला प्रत्येक दिवस सुखकर जातो. मुळातच प्रेग्नंसीनंतर आपल्याला अभिनयक्षेत्रात काम मिळणार की नाही, हा प्रश्‍न मनात निर्माण होणंच चुकीचं आहे. कारण लुक, ग्लॅमरस चेहरा याचबरोबरीनं अभिनयालाही कलाक्षेत्रात तितकंच महत्त्व दिलं जातं. तुमच्या अभिनयाच्या जोरावर तुम्हाला काम मिळणारच. मी दोन वर्षं घरीच असल्यामुळे सोहममध्ये माझा जीव गुंतला होता. त्याला ठेवून चित्रीकरणासाठी जाणं मला काही दिवस जड गेलं. पण त्यानंतर सोहमनंही मला समजून घेतलं आणि मीही माझ्या मनाची तयारी केली. आजही मी कितीही चित्रीकरणामध्ये व्यग्र असले, तरी सोहमकडं दुर्लक्ष करत नाही. चित्रीकरण करून घरी आल्यावर पहिला मी सोहमला मिठी मारते. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहूनच माझा दिवसभराचा थकवा निघून जातो.

प्रेग्नंसीनंतर माझ्यामध्ये झालेला सर्वांत मोठा बदल म्हणजे, संपूर्ण दिवस मी थकलेली असतानाही घरी आल्यावर मी प्रत्येक काम अगदी उत्साहानं करते. कोणत्याच जबाबदारीचं मला ओझं जाणवत नाही. घरी आल्यावर मी सगळा विचार बाजूला सारून सोहममध्ये रमून जाते. 

(शब्दांकन - काजल डांगे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com