मुलींना वेळ दिल्यानंतरच पुनरागमन

Madhu-Shaha
Madhu-Shaha

कमबॅक मॉम - मधू शहा, अभिनेत्री
मला दोन मुली आहेत. माझी मोठी मुलगी अमेया आता १८ वर्षांची आणि धाकटी केया १६ वर्षांची आहे. प्रेग्नन्सीनंतर मी लगेचच कामाला सुरवात केली नाही. मुलांना वेळ दिला आणि मगच पुनरागमन केले. प्रेग्नन्सीवरून परतल्यावर मी सर्वांत आधी राजश्री प्रॉडक्‍शनची ‘लव्ह यू मिस्टर कलाकार’ आणि त्यासोबत हेमामालिनी प्रॉडक्‍शन ‘टेल मी ओ खुदा’ हे दोन चित्रपट केले. इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केल्यानंतर मला माझ्या घरून मिळणारा पाठिंबा खूप भक्कम होता. माझी सासू आणि माझे पती या दोघांचा मला आधार होता. त्यांनीच मला पुन्हा कमबॅक करण्यासाठी प्रवृत्त केले. यामुळे मला मुली आणि घर सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारावी लागली नाही.

घरच्यांचे प्रेम आणि मुख्य म्हणजे घराच्यांची साथ होती. यामुळे मी बिनधास्त घराबाहेर पडले. आता माझ्या मुली मोठ्या झाल्या आहेत. त्या लंडनला शिक्षणासाठी गेल्या आहेत. त्यामुळे आता माझ्याकडे काम करण्यासाठी भरपूर वेळ आहे. तो वेळ वाया न घालवता मी काम करत आहे.

त्याशिवाय चित्रीकरणावेळी सगळी माणसे मला खूप मदत करायची. एकूणच काय, तर घरातली आणि बाहेरची दोन्हीकडील माणसे मला मदत करणारी आणि समजून घेणारी मिळाली. त्यामुळे एका काम करणाऱ्या महिलेला जितकी कसरत करावी लागते, ती कसरत मला फार कमी करावी लागली. कधीकधी असे व्हायचे, की मुली आजारी असायच्या आणि मला चित्रीकरणासाठी जावे लागायचे. तेव्हा मला रडू यायचे. 

एक किस्सा मला अजूनही आठवतोय, मी म्हैसूरमध्ये शूटिंगमध्ये व्यग्र होते आणि अमेयाला डेंगी झाला होता, तेव्हा म्हैसूरवरून मुंबईत येणे म्हणजे एक फ्लाइट नाही. त्याआधी चार-पाच तास प्रवास करून बंगळूरला यावे लागायचे आणि मग फ्लाइट. पल्ला लांबचा होता आणि अशा वेळी मी तिच्याजवळ असणे खूप गरजेचे होते, पण ते मला शक्‍य झाले नाही. या वेळी माझी आई म्हणजे माझी सासू एक क्षणही अमेयापासून दूर गेली नाही. तिला कसलीच कमी पडू दिली नाही, यासाठी मी आज पुन्हा त्यांचे आभार मानते. मात्र मी या प्रसंगासाठी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. शूटिंगमध्येही माझे नीट लक्ष नव्हते, मात्र माझे दिग्दर्शक खूप चांगले होते. त्यांनीही खूप समजून घेतले. प्रेग्नन्सीनंतर मी इंडस्ट्रीमध्ये काम करायला तयार नव्हते.

मात्र ‘खरा कलाकार हा मरेपर्यंत कलाकार असतो,’ या विचाराने मी पाऊल टाकले आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणला. जी येईल ती भूमिका स्वीकारायला मी सुरवात केली. भूमिका कोणती आहे, हेसुद्धा मी ऐकायचे नाही आणि सरळ शूटिंगला जायचे. मला हळूहळू अनुभव मिळत गेला आणि माझा आत्मा अभिनयात आहे, हेदेखील कळले. त्याशिवाय माझे कुटुंबीय मला सगळ्या गोष्टींमध्ये पाठिंबा देत आहेत. हे पाहून मी घट्ट पाय रोवून इंडस्ट्रीत उभे राहिले. माझ्या दोन्ही मुली सेटवरसुद्धा मला भेटायला यायच्या, फिल्मसिटीमध्ये स्टार प्लस वाहिनीवरील माझ्या ‘आरंभ’ मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. त्या वेळी त्या दोघी आल्या होत्या. अमेया आणि केया दोघींनाही माझा अभिनय आवडतो. प्रेग्नन्सीच्या वेळी माझ्या शरीरयष्टीमध्ये बदल झाले आणि ते मी योगासने, जिम आणि डाएट करून कमी केले. माझ्या मुली आता समजूतदार झाल्या आहेत. शिवाय त्यांना मेकअप करायला फार आवडतो. विशेष म्हणजे, आम्ही सोबत चक्क मेकअपच्या सामानाची शॉपिंग करायला जातो. चित्रपट बघायलाही आम्ही बऱ्याचदा एकत्र जातो. त्याहून सर्वांत जास्त वेळ आम्ही एकमेकांसोबत घरात बसून गप्पा मारण्यात घालवतो. 
(शब्दांकन - स्नेहा गावकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com