देवयानी, पन्नाबाई आणि सुपर्णा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक
सारं काही सुरळीत झालं असतं तर अन्य शेकडो-हजारो मुलींसारखं देवयानीचं आयुष्यही सुखासमाधानात जाऊ शकलं असतं. पण हे ‘सारं काही सुरळीत’ होण्यासारखं नव्हतं म्हणूनच नशिबाचे फेरे बदलले अन्‌ दुर्दैवाचे भोग तिच्या वाट्याला आले. देवयानी सुंदर सुशील आणि सद्‌गुणी होती. मनीष रॉयसारखा हुशार, देखणा, श्रीमंत प्रियकर तिला लाभला होता. तिचा दोष एवढाच की त्या दोघांमधली आर्थिक परिस्थितीची दरी खूप मोठी होती. नियतीला तिच्या विरोधात जाण्यास एवढं एक कारण पुरेसं होतं...

मनीषला बॅरिस्टर होण्यासाठी परदेशी जायचं असतं. तिथून परत आल्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचं वचन देऊन तो निघून जातो.

त्याच्यासाठी थांबायची तिची तयारी असते. कर्जापायी वडिलांची अवस्था ओढगस्तीला आल्यानं देवयानीसमोर मोठं संकट येतं. राखाल नावाच्या एका व्यसनी, दुराचारी अन्‌ कपटी माणसाकडून घेतलेल्या कर्जाच्या सापळ्यात तिचे वडील सापडतात. ‘देवयानीचं लग्न माझ्याशी करून देणार असाल तर सारं कर्ज माफ करून टाकीन’ असं आमिष राखाल त्यांना दाखवतो. देवयानी मनीषच्या आईला भेटून मदतीची याचना करते. पण ती कठोर स्त्री देवयानीला हाकलून देते. देवयानीसमोर आता राखालची अट मान्य करण्यावाचून पर्याय उरत नाही. लग्नाच्या पहिल्या रात्रीच राखालचं पाताळयंत्री रूप उघड होतं. तिचा उपभोग घेऊनच तो कर्जाची कागदपत्रं तिच्या स्वाधीन करतो. एवढंच नव्हे, व्यसनासाठी पैसे हवेत म्हणून हा नराधम एका परपुरुषाशी देवयानीचा सौदा करू पाहतो. या नरकातून सुटण्यासाठी ती घरातून पळून जाते. रेल्वेतून उडी मारून जीव देण्याच्या प्रयत्नात असताना एक सहप्रवासी स्त्री तिला वाचवते. आपल्या घरी घेऊन जाते. ती स्त्री असते लखनौची एके काळची प्रसिद्ध तवायफ मीनाबाई. आता उतारवयाला लागलेली, कलकत्त्याला स्थायिक झालेली. इथं राहून गाणं-बजावणं केलंस तर जगण्याचा मार्ग सापडेल, असं सांगून ती देवयानीला मानसिक आधार देते. देवयानीही हळूहळू या धंद्यात रुळते.

कोलकत्यामधली प्रसिद्ध कोठेवाली बनते. आता तिचं नाव असतं पन्नाबाई! राखाल तिचा माग काढत इथंही पोचतो. तिच्याकडून नियमितपणे पैसे उकळत राहतो. लग्नानंतर राखालपासून देवयानीला एक मुलगी झालेली असते. सुपर्णा तिचं नाव. राखालची सावली सुपर्णावर पडू नये यासाठी देवयानीनं तिला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलेलं असतं, स्वत:ची ओळख दडवून. मधल्या काळात बॅरिस्टर होऊन देवयानीचा प्रियकर मनीष परततो.

देवयानीनं प्रतारणा केल्यानं धक्का बसलेल्या मनीषनं लग्न केलेलं नसतं. एकदा बाजारात हिंडत असताना अचानक त्याच्या नजरेला देवयानी पडते. चकित होत तो तिला हाक मारतो. पण ती दुर्लक्ष करून निघून जाते.

मनीषला कळतं की ती देवयानी नसून कोठेवाली पन्नाबाई आहे. त्याचा विश्‍वास बसत नाही, म्हणून तो थेट तिच्या कोठ्यावर जाऊन खात्री करून घेतो. तिची सगळी हकीकत त्याला कळते. दोघांमधला भावबंध पुन्हा जुळतो. मनीष देवयानीला याही परिस्थितीत स्वीकारण्याची तयारी दर्शवतो. पण ती नकार देते. त्याऐवजी ‘तुला शक्‍य असेल तर माझ्या मुलीचं पालकत्व स्वीकार’ अशी विनंती ती त्याला करते. 

मनीष आनंदानं ते स्वीकारतो. सुपर्णाला आपलं नाव देऊन मुलीप्रमाणे वाढवतो. सुपर्णा वकील होते. पिता मनीषच्या व्यवसायात हातभार लावू लागते. हे सगळं आनंदानं पाहणारी देवयानी प्रत्यक्षात मुलीला मात्र भेटू शकत नाही. दुर्दैव पुन्हा एकदा तिच्या मार्गात येतं. तिचा नवरा राखाल यानं आता पैशासाठी कोर्टात खोट्या साक्षी देण्याचा उद्योग सुरू केलेला असतो. एकदा कोर्टात त्याला सुपर्णा दिसते. हुबेहूब देवयानीचीच प्रतिकृती असलेली! धूर्त राखाल तिची माहिती काढतो तेव्हा सुपर्णा ही आपलीच मुलगी असल्याचं त्याला समजतं. 

पैसे उकळण्यासाठी त्याला आयती संधी मिळते. ‘मला हवे तेवढे पैसे दे, अन्यथा सुपर्णाला तुझ्याविषयी सारंकाही सांगून टाकेन’, अशी धमकी तो देतो. त्याच्या सततच्या छळवादाला कंटाळून देवयानी पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याला कायमचा संपवते. तिच्यावर खुनाचा खटला चालतो. मनीष आणि सुपर्णा कोर्टात तिची बाजू लढवतात. याच टप्प्यावर सुपर्णाला देवयानी ही आपली आई असल्याचा उलगडा होतो. आई निर्दोष असल्याचा युक्तिवाद करतानाच देवयानीशी असलेल्या आपल्या नात्याचा गौप्यस्फोट सुपर्णा भर न्यायालयात करते. आरोपीच्या पिंजऱ्यातली देवयानी मात्र शोकातिशयानं कोसळते. मुलीच्या मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडते...    

नीहार रंजन गुप्ता यांच्या ‘उत्तर फाल्गुनी’ या कादंबरीवर दिग्दर्शक असित सेन यांनी त्याच नावाचा बंगाली चित्रपट १९६३मध्ये बनवला होता. तीन वर्षांनी त्याचाच हिंदी रीमेक त्यांनी ‘ममता’ या नावानं केला. दोन्ही भाषांतल्या चित्रपटांत मायलेकीची दुहेरी भूमिका रंगवली होती सुचित्रा सेन हिनं. देवयानी आणि सुपर्णा या दोन्ही व्यक्तिरेखांच्या छटा या अभिनेत्रीनं एवढ्या ताकदीनं दाखवल्या की हिंदी आवृत्तीच्या वेळी अन्य नटीचा विचार करण्याची वेळच दिग्दर्शकावर आली नाही. 

आपली आई कोण, तिचा पूर्वेतिहास काय, हे कळाल्यानंतर सुपर्णाची आईला वाचवण्यासाठी जिवापाड मेहनत घेते. स्वत:च्या बदनामीचं भय न बाळगता न्यायालयासमोर जीव तोडून युक्तिवाद करते. ‘जशी देवयानी मेली तशी पन्नाबाई देखील मरेल. सुपर्णा मात्र जिवंत राहील...’ हे देवयानीचे अखेरचे उद्‌गार काळजाला भिडावेत अशीच सुचित्रा सेनची कामगिरी होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity sunil deshpande maitrin supplement sakal pune today