सतत शिकण्याला पर्याय नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी टॉक - ऐश्‍वर्या नारकर, अभिनेत्री
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘स्वामिनी’ या मालिकेमधून मी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘स्वामिनी’ मालिकेत मी ‘गोपीकाबाई’ यांची भूमिका साकारते आहे. गोपीकाबाईंचे तिच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. ती कठोर आहे; पण कुटुंबीय आणि तिच्या मुलांसाठी ती एक प्रेमळ आई आहे. पेशवाई ही आपल्या कुटुंबातच राहिली पाहिजे, या मताची ती आहे. या सगळ्या प्रकारात कोणी पेशवाई हिसकावण्याचा प्रयत्न केला तर ती खूपच कठोर होते आणि त्यांच्यासोबत तिचे डावपेच सुरू होतात, अशी काहीशी माझी गोपीकाबाईंची भूमिका आहे. मी याआधी बऱ्याच नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.

मात्र, मी पेशवेकालीन भूमिका पहिल्यांदाच साकारत आहे. या भूमिकेसाठी मी काही वेगळी मेहनत घेतलेली नाही. मला वाटते, की आपण एखादी भूमिका साकारतो तेव्हा त्या भूमिकेच्या अनुषंगाने आपण घडत जातो.

माझ्या पात्राविषयी मला फार थोडा अभ्यास करावा लागला. हे सगळे करत असताना या मालिकेच्या दिग्दर्शकाची मदत मला लाभली. दिग्दर्शक नेहमीच योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनानेच आपण पुढे जात असतो. या मालिकेत गोपीकाबाईंनी बरीच वेगवेगळ्या प्रकारची आभूषणे घातली आहेत. ही वेशभूषा आणि आभूषणे पारंपरिक आहेत. परंतु या आभूषणांना आणि वेशभूषेला थोडा मॉडर्न टच देण्यात आला आहे. प्रत्येक भूमिकेला एक वेगळा लूक दिला असून, तो फारच छान आहे. दागिनेदेखील वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे पारंपरिक दागिने असले तरी सगळेच दागिने आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे त्या दागिन्यांचे वेगवेगळे पॅटर्न मी या मालिकेसाठी परिधान केले आहेत. या मालिकेत ‘रमाबाई’ची भूमिका बालकलाकार सृष्टी पगारे साकारत आहे. सृष्टी खूपच हुशार मुलगी आहे.

चित्रीकरण सुरू असताना ती खूपच शांत असते. ती लहान असल्याने सेटवर खेळत असते. तिचे सीन असतील तेव्हा ती ते सीन अगदी उत्तम करते. विशेष म्हणजे तिचे स्क्रिप्ट पाठ असते आणि काम करण्याची तिला खूपच आवड आहे. मला तिच्याबरोबर काम करायला मजा येते. 

मी साकारलेल्या सगळ्याच भूमिका माझ्या जवळच्या आहेत; परंतु माझी पहिलीच मालिका असलेल्या ‘महाश्‍वेता’मधील भूमिका मला खूपच जवळची वाटते. अजूनही काही लोक मला मालिकेतील भूमिकेमुळे ओळखतात.

त्याचबरोबर ‘या सुखांनो या’ या मालिकेतील भूमिकादेखील माझ्या आवडीची आहे. या दोन मालिका माझ्या नेहमीच जवळच्या राहतील. मला अभिनयाची मुळातच खूप आवड आहे, त्यामुळे मला माझ्या कामाचा कधीही कंटाळा येत नाही. चित्रपटसृष्टीत काही गोष्टी अशा असतात, की त्या आपल्या चौकटीबाहेरील असतात; पण तरीही आम्ही ते करत असतो, कारण या क्षेत्राची मला आवड आहे आणि माझे माझ्या कामावर प्रेम आहे, त्यामुळे माझा चित्रपटसृष्टीतील अनुभव फार छान आहे. आताच्या पिढीची मुले खूपच उत्साही आहेत. आताची बहुतेक मुले ही इंग्रजी शाळेतून आलेली असतात. त्यांची मराठी भाषा आणि मराठी उच्चार तितकेसे स्पष्ट नसतात, त्यामुळे त्यांनी मराठी भाषेवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी अधिक मराठी भाषेचा अभ्यास करायला हवा. हा अभ्यास आत्ताच केला तर पुढे त्यांना याचा जास्त त्रास होणार नाही. आपण शिकण्याची प्रक्रिया सुरू ठेवायला हवी. शिकल्यामुळेच आपल्याला नवनवीन गोष्टींची माहिती होते.

(शब्दांकन - स्नेहल सांबरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk Aishwarya Narkar maitrin supplement sakal pune today