ग्रीटिंगमुळे झाली मैत्री

चिन्मय उदगीरकर, भाग्यश्री लिमये
शनिवार, 16 मार्च 2019

सेलिब्रिटी टॉक : चिन्मय उदगीरकर, भाग्यश्री लिमये
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी टॉक : चिन्मय उदगीरकर, भाग्यश्री लिमये
‘घाडगे अँड सून’ या कलर्स मराठीवरील मालिकेतील अक्षय-अमृता म्हणजेच चिन्मय उदगीरकर आणि भाग्यश्री लिमये. मालिकेत त्यांचं नातं खूप गुंतागुंतीचं असलं, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांची खूप छान मैत्री आहे. 

‘‘चिन्मयची आणि माझी पहिली भेट माझ्या व्हॅनिटीमध्ये झाली. त्यानं माझा पहिला प्रोमो पाहिला होता. त्याबद्दल त्यानं छान कॉम्प्लिमेंटही दिली. त्यानंतर आम्ही शूटिंगला भेटलो. मी चिन्मयची ‘स्वप्नांच्या पलीकडे’ ही मालिका पाहिलेली होती. त्यामुळे त्याच्याबरोबर नायिका म्हणून उभं राहण्याचं थोडं दडपण आलं. शिवाय सुकन्या ताई, अतिषा ताई, उदय सबनीस असे मुरलेले कलाकार समोर होते. त्यांच्यासमोर आपण कसं निभावणार, याचंही टेन्शन होतं. पण सगळ्यांनीच सांभाळून घेतलं.

चिन्मयनं मला खूपच सहकार्य केलं. मुलाखती देताना उत्तरं कशी द्यावीत, हेपण त्यानं शिकवलं. सुरवातीला आमच्यात कामाव्यतिरिक्त जास्त बोलणं होत नव्हतं, पण शूटिंग झाल्यानंतर महिन्याभरातच त्याचा वाढदिवस होता.

त्याच्यासाठी मी ग्रीटिंग बनवलं व त्यामुळे तो खूप खूष झाला. त्याच दिवसापासून आमच्यातील फॉरमॅलिटी संपून आम्ही मित्र झालो,’’ भाग्यश्री त्यांच्या नात्याबद्दल सांगते. त्यावर चिन्मय म्हणतो, ‘केवळ ग्रीटिंग दिलं म्हणून आमची मैत्री नाही झाली. मी पहिल्या दिवसापासून तिचं निरीक्षण करत होतो. मला भाग्यश्री खूप खरी वाटली. तिच्यातला साधेपणा, भाबडेपणा मला भावला तेव्हाच आपल्यात चांगली मैत्री होऊ शकते, हे मला जाणवलं होतं. भाग्यश्री अत्यंत नवखी होती, त्यामुळे तिचा आत्मविश्‍वास कुठंही ढळू न देता ती अजून कशी इम्प्रूव्ह होऊ शकते हे समजावण्याचा आमचा प्रयत्न असायचा. सेटवरचं छोटसं पिल्लू, असंच आम्ही भाग्यश्रीला वागवायचो.

त्यानंतर संवाद वाढला आणि आमची मैत्री घट्ट होत गेली. मैत्री होण्यासाठी आणि टिकण्यासाठी एकमेकांचं ऐकून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे समोरच्याला समजून घेता येतं आणि नंतर न बोलताही बऱ्याच गोष्टी समजतात.’’

मालिका सुरू होऊन दोन वर्षं होतील. तुमच्यातही खूप घट्ट मैत्री झाली आहे. तुम्हाला एकमेकांचे सगळे गुण-अवगुण कळले असतील, असं विचारताच भाग्यश्री म्हणाली, ‘‘चिन्मय खूपच सॉर्टेड माणूस आहे. तो त्याच्या आजूबाजूच्या लोकांना खूप कंफर्टेबल फील करवतो, त्याला भेटल्यावर आपण पहिल्यांदाच भेटतोय असं वाटणारच नाही. तो सगळ्यांच्या आवडीनिवडी जपतो. कोणाशी काय बोलल्यावर त्याला बरं वाटंल, हे त्याला उत्तम कळतं. काम आणि व्यक्तिगत आयुष्यातला समतोल तो उत्तमप्रकारे साधतो. त्याला सामाजिक भानही आहे. गोदावरी नदीच्या प्रोजेक्‍टसाठी तो गेली अनेक वर्षं काम करतोय. आपण ज्या समाजात राहतो त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही प्रेरणा त्याच्याकडूनच मला मिळाली. भविष्यात ॲनिमल शेल्टर सुरू करण्याची माझी इच्छा आहे. अवगुण तर नाहीच त्याच्यात! हो पण त्याचं काम लवकर झालं आणि मला उशीर असेल तर खूप चिडवतो!’’  भाग्यश्रीच बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यावर चिन्मय म्हणाला, ‘‘माझी खूपच प्रशंसा केलीय भाग्यश्रीनं, पण ही तिची अभ्यासू आणि चौकसबुद्धी आहे. त्यातून तिनं काही गोष्टी न सांगताच आत्मसात केल्या आहेत. तिच्या वयाच्या मुलांमध्ये हल्ली अभावानंच आढळणारी निरागसता, भाबडेपणा तिच्यात आहे. तो तिनं शेवटपर्यंत टिकवल्यास ती खूप प्रगती करेल.

तिच्यातील अवगुण म्हणजे, खूप पटकन चिडते; पण तिच्या आवडीचं काही 
खायला आणलं, की बाईसाहेबांचा राग जातो! तिची एक सवय खूप मजेशीर 
आहे. कधीही वेळ मिळाला, की फेऱ्या मारत राहते आणि खूप जोर जोरात इंग्लिश गाणी (जी तिला वाटतं, की ती खूप सुरात म्हणते...) गाते! हे आमच्यासाठी खूप त्रासदायक असतं! तिच्यामुळेच मी इनस्टाग्रामवर परत आलो. आमचे धमाल व्हिडिओ आम्ही त्यावर पोस्ट करत असतो. सेटवरून घरी गेल्यावर मात्र आमचं फारसं बोलणं होत नाही, कारण मैत्रीमध्येही एकमेकांना थोडी स्पेस दिलीच पाहिजे, नाहीतर त्याचाही कंटाळा येईल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk chinmay udgirkar bhagyashri limaye maitrin supplement sakal pune today