मैत्री पहिल्याच भेटीतील... (हर्षद अत्कारी आणि गौतमी देशपांडे )

हर्षद अत्कारी आणि गौतमी देशपांडे 
शनिवार, 4 मे 2019

"जोडी पडद्यावरची..."
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" या पुरवणीत...

जोडी पडद्यावरची
हर्षद अतकरी आणि गौतमी देशपांडे हे दोघेही सोनी मराठीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत एकत्र काम करत आहेत. दोघंही या मालिकेच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र आले. प्रथम एकमेकांना न ओळखणाऱ्या हर्षद-गौतमीमध्ये आता चांगली मैत्री झाली आहे. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल विचारलं असता गौतमी म्हणाली, ‘‘माझी ही पहिलीच मालिका आहे. हर्षदने याआधी दोन मालिकांमध्ये काम केलं होतं. मी फक्त हर्षदचं नाव ऐकलं होतं आणि त्याचा फोटो पाहिला होता. त्यानंतर आम्ही दोघंही सोनी वाहिनीच्या जाहिरातीच्या चित्रीकरणावेळी भेटलो. त्यानं तो अनुभवी असल्याचं मला जाणवू दिलं नाही. आम्ही पहिल्याच भेटीत एकमेकांशी खूपच कंफर्टेबल झालो.’’ यावर हर्षद म्हणाला, ‘पहिल्या भेटीत आम्ही ‘हाय, हॅलो’ केल्यानंतर एकमेकांशी एवढं बोलू लागलो, की सेटवरील सर्वांना आम्ही खूप आधीपासूनच एकमेकांना ओळखतोय असं वाटायला लागलं. त्या दिवसापासूनच आमच्यात चांगली मैत्री झाली.’’ जसजशी मैत्री वाढत जाते तसे एकमेकांचे स्वभाव ही कळू लागतात याबद्दल विचारल्यावर गौतमी म्हणाली, ‘‘हर्षद सहसा शांतच असतो. मीच जास्त बडबड करते. कधीतरीच तो एखाद्या गोष्टीवर चिडतो. मीही चिडते, पण तेव्हा तो खूप सांभाळून घेतो. मूड खराब असल्यास मजा करून मूड चांगला करतो. तो माझी नेहमीच समजूत घालत असतो. समोरच्याला समजून घेणं हा त्याचा स्वभाव मला फार आवडतो.’’

गौतमीच्या स्वभावाबद्दल हर्षद सांगतो, ‘‘गौतमीचा स्वभाव मजेशीर आहे. ती सेटवर हसत खेळत असते, पण मी तिच्या विरुद्ध स्वभावाचा आहे. मी सेटवर फारच शांत असतो. गौतमीचा आवाज फार सुंदर आहे व छान गाते.’’ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर फार धमाल-मस्ती असते. सेटवरील मजामस्ती विषयी विचारलं असता हर्षद म्हणाला, ‘‘गौतमी सेटवर अनेकदा धडपडत असते. पडल्यावर तिला खूप जोरात लागतं. ती धडपडते, तेव्हा तिची चुकी नसतेच. समोरच्या निर्जीव वस्तूची चुकी असते! यावरून आम्ही तिची खूप चिडवत असतो.’’ हर्षदबद्दल गौतमी म्हणाली, ‘‘खरंतर मला हर्षदला चिडवायची भीती वाटते. तो जेवढा शांत असतो तेवढाच तो चिडतो. आम्ही एकमेकांना सेटवर चिडवत असतो. आमचे असे अनेक छोटे छोटे किस्से आहेत. मी बऱ्याचदा त्याला मजेमध्ये मारत असते, मग तो माझ्यावर खोटं खोटं चिडतो. अशी हसत खेळत आम्ही सेटवर मजा करत असतो.’’ 

चित्रीकरण व्यतिरिक्त बाहेर तुम्ही भेटता का? या प्रश्‍नाचं उत्तर देताना गौतमी सांगते, ‘‘सहसा आमचं भेटणं सेटवरच होतं. सुट्टी मिळाल्यावर मी पुण्याला माझ्या घरी पळते. भेटलो तर संपूर्ण टीम एकत्र जातो. एखाद्या बर्थ डे पार्टीला आम्ही बाहेर जातो.’’ दोघांच्याही मैत्रीच्या बाँडिंगबद्दल हर्षद सांगतो, ‘‘ऑनस्क्रीन आमची मैत्री प्रेक्षकांपर्यंत पोचतेच आहे, मात्र आमची मैत्री पटकन झाली. पहिल्याच दिवशी आमच्या दोघांचेही विचार पटकन जुळले. आता आम्ही खूप चांगले मित्र आहोत.’ 

(शब्दांकन - स्नेहल सांबरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk Harshad Atkari and Gautami Deshpande maitrin supplement sakal pune today

टॅग्स