‘गोल्ड’मुळे अभिनयाची सुवर्णसंधी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी टॉक - मौनी रॉय, अभिनेत्री
मी मूळची पश्‍चिम बंगालची. माझे शालेय शिक्षण तेथेच झाले. मला लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची मोठी आवड होती. मी लहानपणीच डान्सच्या क्‍लासही जायचे. नृत्य हे माझे पहिले प्रेम आहे, तर अभिनय ही माझी आवड आहे. माझी आई आधीपासूनच अभिनय क्षेत्रात होते. शिवाय माझे आजोबा शेखर चंद्रा रॉय हे एक उत्तम अभिनेते होते. घरातच अभिनयाचे वारे वाहत असल्याने मीही अभिनय क्षेत्राकडे वळले. अभिनय क्षेत्र निवडण्याआधी मी मुंबईत आले. येथे माझ्या अभिनय क्षेत्राचा खरा प्रवास सुरू झाला. मला २००७मध्ये एकता कपूर निर्मित ‘क्‍यूकीं सांस भी कभी बहु थी’ या मालिकेतून अभिनयाला सुरवात केली. नृत्याची आवड असल्याने ‘जरा नचके दिखा’ या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाले. शिवाय मी ‘झलक दिखला जा’ या रिऍलिटी शोमध्येही डान्स केला. नृत्याची एकही संधी मला गमवायची नव्हती. चित्रपटांच्या बाबतीत सांगायचे तर ‘गोल्ड’ चित्रपटाच्या वेळी मला ऑडिशनसाठी कॉल आला, त्यावेळी मी खूपच आनंदी होते. अभिनय क्षेत्रात येण्याची ही मोठी संधी आहे, असे मला त्यावेळी वाटले. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी ‘गोल्ड’ चित्रपटासाठी ऑडिशन दिले.

त्यामध्ये माझी निवड झाली. ‘गोल्ड’ चित्रपट माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी खूपच भाग्यवान ठरला. त्याशिवाय मी ‘तुम बिन २’, ‘के. जी. एफ २’ या चित्रपटातील गाण्यांतही दिसले.

मी टीव्हीवरून माझा अभिनयाचा प्रवास सुरू केला आणि आज मी बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील लकी अभिनेत्री म्हणून समोर आले आहे. माझ्या या टेलिव्हिजन ते हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रवासाचा मी खूपच आनंद घेतला.

दरम्यान, बऱ्याच आव्हानांनाही मला तोंड द्यावे लागले, पण न डगमगता मी मला हवे असलेले यश मिळवले. टेलिव्हिजनवर काम करतानाच मला समाधानी आणि खूप आनंदी वाटत होते. चित्रपट निवडताना मी आधी स्क्रिप्ट वाचते. चित्रपटाची कथा आणि त्यात असलेली माझी भूमिका माझ्यासाठी अधिक महत्त्वाची असते. आता लवकरच मी ‘मेड इन चायना’ या चित्रपटातून मुख्य भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात मी अभिनेता राजकुमार रावसोबत दिसणार आहे. या चित्रपटात मला एका गुजराती व्यावसायिकाच्या बायकोची भूमिका साकारायला मिळाली आहे.

राजकुमारसोबत मी पहिल्यांदाच काम करते आहे. त्याचे अभिनय कौशल्य अफाट आहे. त्याच्याकडून मला बरेच काही नव्याने शिकायलाही मिळाले. यापुढेही मला वेगवेगळ्या भूमिका करायला नक्की आवडतील.
(शब्दांकन - स्नेहा गांवकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk mouni roy maitrin supplement sakal pune today