इमेज तयार झाल्यावर खरा स्ट्रगल

mrunmayee deshpande
mrunmayee deshpande

सेलिब्रिटी टॉक - मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री
मी महाविद्यालयात असताना नाटकात काम करायचे. तिथूनच मला अभिनयाची गोडी लागली. अभिनेत्री बनण्याचं माझं स्वप्न होतं. हे स्वप्न सत्यात उतरवण्याचा ध्यास मी घेतला. नाटक करत असताना मी चित्रपट, मालिकांसाठी ऑडिशन देत होते. ऑडिशन देत असतानाच मला ‘अग्निहोत्र’ मालिका मिळाली. या मालिकेपासूनच माझ्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. छोट्या पडद्यावर मी रमू लागले. ‘अग्निहोत्र’ने मला प्रचंड प्रेम दिलं. लगेचच मला ‘कुंकू’ मालिकेसाठीही विचारणा करण्यात आली. या मालिकेसाठीही मी होकार दिला. ‘कुंकू’ करत असताना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्‍यावर उचलून धरलं. मालिका करत असतानाच मला एकापाठोपाठ एक चित्रपटांच्या ऑफरही येऊ लागल्या.

माझ्या करिअरची सुरवातच अगदी चांगली झाली. त्यानंतर पुढे अधिकाधिक काम करण्यास प्रोत्साहन मिळू लागलं. पण, मला असं वाटतं इंडस्ट्रीमध्ये आपली एक इमेज तयार झाल्यावर खरा स्ट्रगल करावा लागतो. कारण ही इंडस्ट्री तुम्हाला जशी स्थिर बनवते तशी अस्थिरही बनवते. कोणताही चित्रपट, मालिका किंवा नाटक करत असताना आपल्या भूमिकेचा विचार करावा लागतो. शिवाय चित्रपटसृष्टीमध्ये आपलं नाव टिकवून ठेवण्यासाठी करावा लागणारा स्ट्रगलही वेगळा असतो. मलाच नव्हे तर प्रत्येक कलाकाराला या स्ट्रगलला सामोरं जावं लागतं. बरेच चित्रपट, मालिका करूनही कधीकधी हाती काम नसतं. त्या वेळी कलाकाराची खरी कसोटी असते. खरंतर प्रत्येक परिस्थितीवर हिमतीनं मात देण्यासाठी मी शिकले आहे. स्वतःचा स्वतःसाठी असणारा स्ट्रगल प्रत्येकाच्या करिअरमध्ये फार महत्त्वाचा असतो.
आताही मला बऱ्याच मराठी चित्रपट, मालिकांसाठी विचारण्यात येतं.

म्हणूनच प्रत्येक प्रोजेक्‍टला मी होकार देत नाही. एखादी कथा मला आवडली तरच मी तो प्रोजेक्‍ट करते. फक्त कथाच नव्हे तर माणसं बघूनही मी चित्रपट करते. याच कारण असं की, एखादी कथा चांगल्या माणसांनी हाताळली नाही तर प्रेक्षकांपर्यंत ती योग्य पद्धतीने पोचत नाही. माझ्याबाबतीतही असे बऱ्याचदा घडलं आहे. मी फार वेगळ्या विचाराने एखादा प्रोजेक्‍टला होकार दिला आणि तो प्रेक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने पोचलाच नाही. त्यामुळे कोणतंही काम, भूमिका करताना मी विचारपूर्वकच करते.

सध्यातरी मी ऐतिहासिक चित्रपटामध्ये गुंतली आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याबरोबर मी ‘फर्जंद’ हा चित्रपट केला. आता पुन्हा एकदा दिग्पाल यांच्या आगामी ‘फत्तेशिकस्त’ या ऐतिहासिक चित्रपटामध्ये मी केसर ही भूमिका साकारत आहे. ‘फर्जंद’मध्ये मी साकारलेली केसर प्रेक्षकांना फारच आवडली. पुन्हा एकदा केसर साकारण्याची संधी माझ्याकडे आली आहे. खरंतर माझं केसर या पात्रावर प्रेम आहे. त्यामुळे मी रुपेरी पडद्यावर हे पात्र उत्तमरीत्या साकारू शकते. केसरची आणखी एक नवी बाजू ‘फत्तेशिकस्त’मधून मला प्रेक्षकांसमोर मांडता येणार आहे. ऐतिहासिक चित्रपट करत असताना माझ्या मनावर कोणत्याच प्रकारचं दडपण नसतं.

फक्त केसर ही भूमिका साकारत असताना मला शिवकालीन भाषा शिकावी लागली. तलवारबाजीचं प्रशिक्षण घ्यावं लागलं. पण, ही संपूर्ण प्रक्रिया मी एन्जॉय केली. शिवाय, ‘फर्जंद’ची संपूर्ण टीम ‘फत्तेशिकस्त’च्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र आली आहे.
(शब्दांकन - काजल डांगे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com