‘जंगली’ माझ्यासाठी आशीर्वाद

Pooja-Sawant
Pooja-Sawant

सेलिब्रिटी टॉक - पूजा सावंत
खरेतर मला प्राण्यांचे डॉक्‍टर व्हायचे होते. शाळेत शिकत असताना तोच विचार डोक्‍यात होता. मात्र, त्याचवेळी स्मिता पाटील यांच्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील एक गाणे पाहिले आणि मी कमालीची इम्प्रेस झाले. तेथेच मला ॲक्‍टिंगमध्ये येण्याची खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली. आपला जन्म अभिनयासाठी झाला आहे, हे मला कळले आणि आपण याच क्षेत्रात काही तरी करू शकतो, असे वाटले. स्मिता पाटील यांच्या कामानेच मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि मला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. ‘क्षणभर विश्रांती’ हा माझा पहिला मराठी चित्रपट. तेव्हा पहिल्यांदाच कॅमेऱ्याचा सामना करताना थोडे अवघडल्यासारखे वाटले आणि मनात थोडी धाकधूकही झाली, मात्र युनिटमधील सगळ्यांनी मदत केली आणि माझा या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटाला फारसे काही यश मिळाले नाही; परंतु मी काही डगमगले नाही. माझी वाटचाल मी सुरूच ठेवली. त्यानंतर ‘सतरंगी रे’, ‘निळकंठ मास्तर’, ‘दगडी चाळ’, ‘पोश्‍टर बॉईज’, ‘लपाछपी’ असे काही मराठी चित्रपट केले. त्यातील ‘दगडी चाळ’, ‘पोश्‍टर बॉईज’ व ‘लपाछपी’ असे काही चित्रपट उत्तम चालले. 

‘लपाछपी’ चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. माझ्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. मी रोमॅंटिक, हॉरर, ऐतिहासिक, थ्रिलर व कॉमेडी जॉनरचे चित्रपट केले. मराठी चित्रपटसृष्टीत माझी घोडदौड सुरू असतानाच मला काही साऊथच्या ऑफर्सही आल्या, मात्र मला त्या आवडल्या नाहीत. खरे तर मराठी इंडस्ट्रीमध्ये मी खूष होते, मात्र हिंदीसाठीही प्रयत्न करीत होते.

‘जंगली’ चित्रपटासाठी मी ऑडिशन्स दिली आणि दोन दिवसांनी मला फोन आला. फोनवर तुम्हाला आज रात्री दिग्दर्शक चक रसेल यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायचे आहे, असे सांगण्यात आले. ‘द मास्क’सारखा चित्रपट दिग्दर्शित केलेल्या दिग्दर्शकांसोबत व्हिडिओ कॉलिंगद्वारे बोलायचे म्हटल्यावर मनात धाकधूक होती. मी त्यांच्याशी बोलले. त्यांनी मला माझी भूमिका समजावून सांगितली आणि मला ‘शंकरा’ सापडली, असेही ते म्हणाले. मीदेखील भलतीच खूष झाले. कारण हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना मला ज्या पद्धतीची भूमिका अपेक्षित होती ती मिळाली. माझे प्राणीप्रेम सगळ्यांना माहीत आहे. आजही माझ्या घरात दोन कुत्री आणि मांजरे आहेत.  या चित्रपटातील शंकराच्या भूमिकेसाठी मला पंधरा दिवसांचे वर्कशॉप करावे लागले. चित्रीकरण थायलंड येथील जंगलात झाले. हत्तींचे वास्तव्य असलेल्या ठिकाणीच आम्ही चित्रीकरण केले. प्राण्यांसोबत चित्रीकरण करणे मोठे जिकिरीचे आणि आव्हानात्मक काम होते. मी साकारलेली शंकरा ‘दीदी’ नावाच्या हत्तीणीची माहुत असते. आंतरराष्ट्रीय शिकारी हत्तीची शिकार करण्यासाठी या जंगलात येतात. त्याला ती विरोध करते. ‘जंगली’ हा चित्रपट माझ्यासाठी आशीर्वाद आहे. या चित्रपटात ॲक्‍शन, रोमान्स आणि ॲडव्हेंचर आहे. स्मिता पाटील यांच्यासारखे काम करता यावे आणि ऐश्‍वर्या राय यांच्यासारखा जगभरात रिस्पेक्‍ट मिळावा, असे मला वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com