रश्‍मी अनपटने केले मालिकांमधून कमबॅक

rashmi anpat
rashmi anpat

सेलिब्रिटी टॉक - रश्‍मी अनपट, अभिनेत्री 
मी मूळची पुण्याची आहे. मला लहानपणापासूनच अभिनयाची फार आवड आहे. माझे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच झाले. शाळेत असताना मी बालकलाकार म्हणून नाटकांमध्ये कामही केले होते. मी पाचवीत असताना अविनाश देशमुख यांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात राजाराम महाराजांची भूमिका साकारली होती. या नाटकापासून खऱ्या अर्थाने माझ्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. दहावीपर्यंत मी नाटकांमध्येच काम केले. ‘स्वभावाला औषध नाही’, ‘गाठीभेटी’ या नाटकांमध्येही मी काम केले. त्यानंतर ‘सुवासिनी’ ही माझी पहिली मालिका होती. या मालिकेनंतर माझा मालिकांतील प्रवास सुरू झाला. ‘पुढचं पाऊल’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘फ्रेशर्स’, ‘कुलस्वामिनी’ या मालिकांत काम केले.

माझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरलेली मालिका सांगता येणे फारच कठीण आहे. कारण, प्रत्येक मालिकेतून नव्याने काहीतरी शिकायला मिळाले. त्यामुळे प्रत्येक मालिकेने मला काहीतरी दिले आहे.  

अभिनय क्षेत्रात आल्यानंतर माझ्या आई-बाबांनी मला मोठा पाठिंबा दिला. अगदी रात्री-अपरात्री चित्रीकरण संपल्यानंतर माझे बाबा मला घ्यायला यायचे. लग्नानंतर माझा नवरा, माझे सासू-सासरे यांनी मला पाठिंबा दिला. मूल झाल्यानंतर मी अभिनयापासून थोडीशी दूरच गेले होते. मात्र, माझ्या सासू-सासऱ्यांनी मला पुन्हा माझ्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात करण्यासाठी बळ आणि प्रोत्साहन दिले.
मी अवघ्या दोनच वर्षांनी मालिकांमध्ये कमबॅक करत आहे. ‘अग्निहोत्र २’ या मालिकेतून मी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा मी भाग होणार आहे, हे मला कळल्यावर आनंदही झाला, मात्र दडपणही तेवढेच आले होते. दिग्गज कलाकारांसोबत काम करणार म्हणून थोडेसे दडपण आले होते. चित्रीकरणासाठी गेल्यावर सर्वांनी मला आपलेसे करून घेतले व आलेले दडपण दूर पळाले. या मालिकेत मी ‘अक्षरा’ ही भूमिका साकारत आहे. साधी, सरळ आणि ठाम मताची महाविद्यालयीन शिक्षण घेणारी अशी ही मुलगी आहे. अक्षराचे बाबा एका संकटात सापडलेले असतात आणि त्यांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी नाशिकच्या वाड्यात उत्तर सापडणार असते. त्यामुळे अक्षरा उत्तर शोधायला अग्निहोत्र वाड्यात जाते आणि त्यानंतर काय घडते, याबद्दलचे गूढ पुढील भागांत उलगडत जाणार आहे. 
(शब्दांकन - स्नेहा गांवकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com