एकजुटीने शेती केल्यास विकास शक्‍य!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 July 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका
मागच्या लेखात आपण बोलत होतो, की गावतली मुलं आपली शेती करायची सोडून शहरात किरकोळ पगारात नोकरी करायला का येतात? शेतकऱ्यांशी मुली लग्न करायला का नकार देतात? दुसरीकडं अशा मुलांचे आई-वडील त्रस्त आहेत, की त्यांची मुलं त्यांना शेती करायला मदत करत नाहीत. शेतीत पैसा असूनही मुलं शहरात पळतात. आज शेतकऱ्यांची सगळ्यांत मोठी समस्या आहे, की त्यांना शेतात काम करायला माणसं मिळत नाहीत. परवा रेडिओवर एक जाहिरात ऐकत होते. सारखी-सारखी लागत होती. अमिताभ लोकांना शौचालयाला कुठं जायचं, कसं शौचालय बांधायचं हे समजावून सांगत होते. 

‘‘अरे चाचा, घर में बयालीस इंच का रंगीन टीव्ही है, हाथ में स्मार्टफोन है. मगर शौच करने रेल की पटरी पर काहे जाते हो?’’ मग चाचा म्हणतो, ‘‘वो का है, हमे खुली हवा का आनंद लेते हुए सौच करने में मजा आता है.’’ 

‘‘ऐसा सेहत के लिए कितना हानिकारक है. भारत देश के उन्नती के लिए खराब है,’’ वगैरे-वगैरे अमिताभ समजावून सांगत होते. मला ते सगळं ऐकून खरंच कीव आली, की बघा कुठून सुरवात करायचीये. लोकांना बाहेर शौचाला जाण्यात काही गैर वाटत नाही. एका मोठ्या कलाकाराला अशा जाहिराती कराव्या लागतात.  

सरकारी योजनेत शौचालय बांधायला मिळालेले पैसे लोक दुसरीकडं खर्च करतात. योजनेमध्ये शेतकऱ्याला सातबारा दाखवल्यास शून्य टक्‍के व्याजावर कर्ज मिळतं, पण शंभरातले ७० लोक ते पैसे शेती करायला वापरतच नाहीत. विकासाच्या अनेक योजनांची नीट अंमलबजावणी होतच नाही. आता राहिला तरुणवर्ग का शहराकडे पळतोय. तर त्याचं कारण आहे ‘फ्रीडम’! राहणीमानाचं स्वातंत्र्य!

खेड्यामध्ये लोकांनी विचारांच्या चौकटी बांधून ठेवल्या आहेत. घरातील सुनेनं अमुक तऱ्हेनंच राहिलं पाहिजे, अमुक तऱ्हेचेच कपडे घातले पाहिजेत, इतक्‍या वाजताच उठलं पाहिजे. कधी-कधी घरातील मंडळींना तरुण पिढीसोबत नवीन जमान्यासारखं जुळवून घ्यायचं असल्यासही आजूबाजूचे लोक नावं ठेवून त्यांना बदललेल्या विचारांसोबत चालायला देत नाहीत.

आजच्या तरुण पिढीला बंधनं नकोत. तरुणांना चौकटीत अडकून राहणं पसंत नाही. त्यांना माहीत आहे, मेहनत केल्यास घरच्या जमिनीत एखाद वेळी जास्त पैसा मिळेल; पण तो बायकोला घेऊन छोट्याशा चाळीत राहणं पसंत करतोय. 

जुन्या पिढीनं आपल्या जुन्या, बुरसटलेल्या चालीरीती नवीन पिढीवर लादायचं बंद केलं, वस्तुस्थितीला स्वीकारून चालायला सुरवात केल्यास घरातील टीमवर्क सक्षम होईल. मी जसं नेहमी म्हणते, शेती करणंसुद्धा एक टीमवर्क आहे. ज्या दिवशी घरा-घरांत अशी आपल्याच भावंडाची टीम तयार होईल आणि शेती व्यवसाय एकजुटीनं केला जाईल, त्या दिवशी खरा विकास सुरू होईल. खरंच तो दिवस दूर नाही, की आपण म्हणू शहरातील आणि गावातील दरी आता कमी होत चालली आहे. जमीनदार, शेतकरी जो जमिनीत अन्न तयार करतो, त्याला मोठा दर्जा प्राप्त होईल. आपला विकास फक्त सरकारी योजनांनी कधीच होणार नाही. आपल्यालाही सहभागी व्हावं लागेल. आपला गाव स्वच्छ असावा, निर्व्यसनी असावा, प्रगल्भ विचारांचा असावा. लहान-मोठा माणूस त्याच्या जातीवरून आणि कामावरून ठरू नये. आपल्या संस्कृतीचा मान ठेवून इतर बुरसटलेल्या चालीरीतींचा आता तरी त्याग करावा, म्हणजे आपल्यापासून दुरावलेली आपली तरुणपिढी गावाकडं परत येईल आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या जोमानं जमिनीत राबायला तयार होईल. जमिनीत राबणाऱ्या आपल्या जमीनदार नवऱ्याचा नवीन आधुनिक मुलींना सन्मान वाटेल. 

निसर्ग आणि जमिनीचा योग्य मेळ साधून शेती आणि शेतकऱ्याला ग्लॅमरस करण्याची आजच्या काळाची गरज आहे. त्यातून सर्वार्थानं आपला विकास होईल आणि हळूहळू आपल्या देशाचा. मग आपल्याला म्हणता येईल, ‘मेरे देश की धरती सोना उगले... उगले हिरे मोती...’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk Samruddhi Pore maitrin supplement sakal pune today