‘मलाल’मधून स्वतःला सिद्ध करायचेय!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी टॉक - शर्मिन सहगल, अभिनेत्री
शाळेत असताना वयाच्या १७ वर्षांपर्यंत मला डॉक्‍टर बनण्याची इच्छा होती. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर मी थिएटर हा विषय निवडला होता. मी थोडी जाड होती आणि मला मेकअप, हेअरस्टाइल करणे अजिबात जमत नव्हते. त्यामुळे भविष्यात मी कधी अभिनय करेन, असा विचार केला नव्हता.

कॉलेजमध्ये थिएटर करत असल्याने मी एका नाटकात भाग घेतला होता. जाड असल्याने मला मुलाची भूमिका साकारायला मिळाली. स्टेजवर ती भूमिका साकारताना मी स्वतःला पूर्णपणे विसरले आणि मनापासून ती भूमिका साकारली. तेव्हा पहिल्यांदाच ॲक्‍टिंग केली होती. तेव्हापासून माझ्यात अभिनयाची गोडी वाढत गेली. त्यानंतर हळूहळू मी ॲक्‍टिंग शिकण्यास सुरवात केली आणि मला ॲक्‍टिंगबाबत बऱ्याच गोष्टींची माहिती झाली. मी हळूहळू स्वतःवर लक्ष देण्यासही सुरवात केली. 

जाड असल्याने वजन कमी करायला सुरू केले. त्या वेळी माझे मामा संजय लीला भन्साळी यांना अजिबात कल्पना नव्हती, की मला या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. मी वजन कमी करण्यास सुरवात केल्यानंतर त्यांना याची कल्पना आली. त्यानंतर मी असिस्टंट डायरेक्‍टर म्हणून काम करायला सुरवात केली. कारण थिएटर आणि सेटवरील ॲक्‍टिंग ही पूर्णपणे वेगळी असते. मला सेटवरील ॲक्‍टिंग शिकण्याची इच्छा होती. मी ‘मेरी कॉम’ चित्रपटाच्या टीमसोबत असिस्टंट डायरेक्‍टर म्हणून काम करू लागले. तिथे मला प्रियांका चोप्रा भेटली. तिने मला ॲक्‍टिंगबद्दल फार छान शिकवले.

प्रियांका कशी ॲक्‍टिंग करते, याचे मी निरीक्षण केले. त्यानंतर ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासाठी काम केले. यानंतर ॲक्‍टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. ॲक्‍टिंग स्कूल संपल्यानंतर मी संजय सरांना भेटले. मला ॲक्‍टिंगची आवड असल्याचे मी त्यांनी सांगितले. त्यांनी दिग्दर्शक मंगेश हडवले यांच्यासोबत माझी ओळख करून दिली. ते ‘मलाल’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते.

मंगेश सरांनी माझे ऑडिशन घेतले आणि ‘मलाल’ चित्रपटासाठी माझी निवड झाली. माझे स्वप्न पूर्ण होत असल्यासारखे मला दिसू लागले. ‘मलाल’ चित्रपटात मी मिजान जाफरीसोबत काम करत आहे. मिजान आणि मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच मित्र आहोत. तो माझा बेस्ट फ्रेंड होता आणि आताही आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांसोबत काम करण्यास सुरवात केल्यावर फार अवघड वाटले नाही. एकमेकांना आधीपासूनच ओळखत असल्याने त्याच्याबरोबर काम करताना फारच कंफर्टेबल वाटत होते; पण पहिलाच चित्रपट असल्याने थोडा तणाव आणि भीती मनात होतीच. या चित्रपटातील माझी भूमिका शर्मिनच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा फारच वेगळी आहे. ही भूमिका फारच शांत स्वभावाची आहे आणि मी स्वतः अजिबात शांत नाही. या भूमिकेसाठी माझ्यात शांतता आणायला मंगेश सरांनी फार मदत केली. चित्रपटासाठी मी काही खास तयारी केली नाही; पण मंगेश सरांसोबत खूप जास्त वेळ घालवला आणि त्यामुळे चित्रपटात मी जे काही काम केले आहे ते केवळ मंगेश सरांमुळे. त्यांनी मला खूप काही शिकवले. सध्या माझ्या हातात फक्त ‘मलाल’ चित्रपट आहे. या चित्रपटातून मला इंडस्ट्रीमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. त्यानंतरचा विचार मी अजून केलेला नाही. 
(शब्दांकन - स्नेहल सांबरे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk sharmin segal maitrin supplement sakal pune today