मुलगी म्हणून कोणतीही सूट नाही!

मुलगी म्हणून कोणतीही सूट नाही!

जोडी पडद्यावरची : श्रावणी देवधर (दिग्दर्शक), सई देवधर (अभिनेत्री)
नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा म्हणजे ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटाशी आणखी एका सुंदर नात्याची नाळ जुळली आहे, ते नातं म्हणजे आई आणि मुलीचं. अर्जुनसिंग बरन आणि कार्तिक निशाणदार ‘जीसिम्स’ निर्मित ’मोगरा फुलला’च्या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीस येणार श्रावणी देवधर आणि सई देवधर या मायलेकीची जोडी. श्रावणी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे, तर सई प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाविषयी त्यांच्यामध्ये असलेली उत्सुकता त्यांनी शब्दांतून व्यक्त केली आहे.

‘लपंडाव’, ‘सरकारनामा’, ‘लेकरू’नंतर बऱ्याच वर्षांनी श्रावणी ‘मोगरा फुलला’च्या निमित्तानं मराठीत दिग्दर्शन करत आहेत. याविषयी सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘मी ‘लेकरू’नंतर काही हिंदी चित्रपट केले. त्यानंतर काही कौटुंबिक अडचणी आल्या. नंतर मात्र मी बरीच वर्षं स्टार प्रवाहची हेड म्हणून काम केलं. आता नुकतीच नोकरी सोडली असून, परत माझ्या आवडीच्या छंदाकडं वळाली आहे. जीसिम्सचे प्रमुख अर्जुनसिंह बरन, कार्तिक निशाणदार आणि स्वप्नील जोशी यांच्यासोबत काम करताना, आता चित्रपटाचं दिग्दर्शन केले पाहिजे अशी इच्छा निर्माण झाली. स्वप्नील खूप चांगला आणि हुशार मुलगा आहे. काहीतरी वेगळं करूयात, या उद्देशानं ‘मोगरा फुलला’च्या प्रवासाला सुरवात झाली.’’

सईनं हिंदीमध्ये काम करायला सुरवात केल्यामुळं तिला मराठी बोलता येतं, ही अनेकांना अवाक्‌ करून टाकणारी बाब आहे. याविषयी सई सांगते, ‘‘अनेक लोकांनी विचारलं की, ‘अरे, तुला मराठी बोलता येतं? वाह!’ तेव्हा मी त्यांच्याकडं वळून बघायचे. कारण, मी पार्ले टिळकमध्ये शिकलेली मराठमोळी मुलगी आहे! मुळात मी सुरवात हिंदीनं केली. मराठीत काम करावं, असं मला खूप वाटायचं पण ते शक्‍य झालं नव्हतं. एका वर्षाआधी आईनं ‘मोगरा फुलला’ लिहायला घेतला. मी तर प्रचंड उत्सुक आहे. कारण ‘अगं तुला मराठी बोलता येतं?’ हे विचारणाऱ्यांसाठी माझ्याकडून ही खास भेट  असेल.’’

आई दिग्दर्शक आणि मुलगी अभिनेत्री याविषयी सांगताना श्रावणी म्हणतात, ‘‘चित्रपटाच्या कथेनुसार सईनं साकारलेली भूमिका अगदी योग्य आहे. ‘लपंडाव’मध्ये सईनं साकारलेल्या भूमिकेला राज्य पुरस्कार, तर मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सईसोबत चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा होतीच. तिलादेखील मराठीत काम करायचं होतं. स्वप्नीलला ‘मोगरा फुलला’ची कथा ऐकवली आणि त्याला ती खूप आवडली. सई आणि स्वप्नील यांचे फॅमिली कनेक्‍शन असल्यामुळं रॅपोही छान बनला.’’

‘आईसोबत काम करणं हे माझ्यासाठी ड्रीम कम ट्रु आहे,’ असं म्हणत सई सांगते, ‘‘मी लहानपणापासून आईला काम करताना बघितलं आहे. तिची पटकथा उत्कृष्ट असते. कलाकारांकडून अभिनय करून घेणं तिला खूप सुंदर जमतं. त्यामुळं मला असं सतत वाटायचं, की मला आईसोबत पुन्हा काम करण्याची संधी कधी मिळेल? आईच्या ‘लपंडाव’ चित्रपटात मी काम केलं होतं, पण त्या वेळी मी तिसरीत होते. त्याच्यानंतर आता थेट ‘मोगरा फुलला’...’’

सेटवरच्या गमतीजमती सांगताना सई म्हणते, ‘‘शेवटी काय, तर आम्ही आई आणि मुलगीच आहोत ना? मी प्रॉडक्‍शन डिझायनिंग पण केलं आहे, त्यामुळं मला चित्रपट निर्मितीची बऱ्यापैकी कल्पना आहे, तर कधी आईला दिग्दर्शनाबद्दल सुचवल्यास ती म्हणायची, ‘डिरेक्‍टर कोण आहे आता?’ तिनं स्वतःहून मला काही काम सांगितलं की मी म्हणायचे, ‘मी फक्त ॲक्‍टर आहे.’ अशी मजा सेटवर होत राहायची. मी पडद्यावर कलाकार असले, तरी पडद्यामागे मी तिची मुलगीच आहे. त्यामुळं सेटवर संवाद साधताना, चर्चा करताना आपसूक माझ्याकडून ‘अगं आई.’ असं निघायचंच.’’

सईच्या या वाक्‍याला उत्तर देत श्रावणी यांनी सांगितले, ‘आम्ही शेजारी-शेजारी राहतो. तिचं लग्न होऊन बरीच वर्षं झाली, तरी ती अजूनही मला उत्तर देण्यासाठी बांधील आहे. तिला कोणासमोर ओरडलं तरी तिला वाईट नाही वाटायचं. आई आहे तर ओरडणारच... मुलगी म्हणून मी तिला कोणतीही सूट नाही दिली.’’

‘माझी आणि माझ्या आईची खूप ग्रेट पार्टनरशिप आहे, आईपेक्षा माझी ती मैत्रीण जास्त आहे. मी तिला बऱ्याचदा ‘ब्रो’ या नावानं देखील हाक मारते,’ असं  सई सांगते....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com