कोणतीही भूमिका दबावाखाली करत नाही (श्‍वेता त्रिपाठी)

श्‍वेता त्रिपाठी
सोमवार, 22 एप्रिल 2019

"सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" या पुरवणीत....

सेलिब्रिटी टॉक
मी  मूळची दिल्लीची. माझे वडील आयएएस ऑफिसर तर आई शिक्षिका. त्यामुळे आमच्या घरात ॲक्‍टिंगबाबत काही फारसे अनुकूल वातावरण नव्हते. परंतु मला ॲक्‍टिंगची आवड होती. मी श्रीदेवीचे चित्रपट खूप पाहायची आणि मला तेथूनच प्रेरणा मिळायची. तिच्या नृत्याची मी जबरदस्त फॅन आहे. तिचे ‘ना जाने कहाँ से आयी है...’ हे गाणे माझ्या कमालीचे आवडीचे. तिचे कोणतेही नृत्य आणि त्यावरील हावभाव पाहून मी इम्प्रेस व्हायची. त्यामुळे माझी अभिनयाची आवड दिवसेंदिवस वाढत गेली. तसं पाहायला गेलं तर मला वकील व्हायचे होते. वकील बनून समाजात काही तरी बदल घडवून आणण्याचा माझा विचार होता. परंतु आता अभिनेत्री झाली आहे, आणि अभिनेत्री म्हणूनही समाजात काही तरी बदल आपण घडवू शकतो; कारण अभिनयाद्वारे आपण चांगल्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकतो. त्यामुळे एका अर्थी आपण समाजकार्यच करीत आहोत असे मला वाटते. ‘मसान’, ‘हरामखोर’ असे काही चित्रपट केले आणि ‘मिर्झापूर’ नावाची वेबसीरिजही केली.

माझ्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांपर्यंत काही तरी पोचले पाहिजे ही माझी इच्छा असते. मी कधीही कोणतीही भूमिका दबावाखाली करत नाही, तर प्रत्येक भूमिकेत मला आनंद शोधायला आवडतो. लोकांना माझी कोणती भूमिका आवडली नाही तरी त्याचा जास्त टेन्शन मी घेत नाही. मी आता ‘लाखो में एक’ या हिंदी वेबसीरिजचा दुसरा भाग करीत आहे. या वेबसीरिजमध्ये मी डॉक्‍टरची भूमिका साकारत आहे. डॉ. श्रेया पाठारे असे या भूमिकेचे नाव आहे. ही भूमिका साकारताना मी खूपच मेहनत घेतली. या भूमिकेचा मी पूर्णपणे अभ्यास केला. या भूमिकेसाठी मला कार्यशाळा करावी लागली. या कार्यशाळेत डॉक्‍टरकडे अचानक आलेली एखादी केस कशी सांभाळायची हे शिकवलं गेलं. सर्जरी कशी असते किंवा ती कशी हाताळायची या सगळ्याच शिक्षण मी घेतलं. ही वेबसीरिज ॲमेझॉन प्राईमवर पाहायला मिळेल. प्रत्येक भूमिका करताना मी त्यासाठी खूप मेहनत करते. भूमिका साकारताना भाषेपेक्षा जास्त मला त्यामागची भावना महत्त्वाची वाटते. विषयाबरोबर प्रेक्षकांना माध्यमही महत्त्वाचं आहे. मग ते टीव्ही, चित्रपट किंवा वेबसीरिज असो. त्यामध्ये काही स्पर्धा आहे असं मला वाटत नाही. चांगले विषय प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी नक्कीच स्पर्धा असली पाहिजे. मला सर्व माध्यमांतून काम करण्याची इच्छा आहे. वेगळ्या भाषेत तसेच वेगळ्या विषयांवर आणि फक्त भारतीय चित्रपट नाही तर, हॉलिवूड चित्रपटदेखील मला करायचे आहेत. मी सगळ्यात जास्त खूष कॅमेऱ्यासमोर आली की होते. कामाचा व्याप कितीही असला तरी मला काही वाटत नाही. 

खरंतर बॉलिवूडमध्ये आल्यावर मला काही चांगले व वाईट अनुभव आले. मी बॉलिवूडमध्ये आली तेव्हा मी स्वतःला बदलावं अशी काही लोकांची इच्छा होती. काही लोकांनी तसे प्रयत्नही केले. मी जशी आहे, माझी विचारसरणी तसेच मी ज्या प्रकारचे चित्रपट करते ते सगळे बदलण्यासाठी प्रयत्न केले गेले. मी निश्‍चितच बदलेन; पण माझ्यात काही बदल घडविण्यासाठी मला त्यामागचं ठोस कारण समजलं तरच मी तसे प्रयत्न करू शकते. मी असं नाही म्हणणार की मी सगळ्यांपेक्षा बेस्ट आहे. पण मी केलेल्या कामापासून मी आनंदी आहे. मी ते पुन्हा पाहते तेव्हा मी फारच खूष होते आणि त्यामुळे मी स्वतःला बदलावं असं मला वाटत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity talk Shweta Tripathi maitrin supplement sakal pune today