सरदारी

Kirn-Kher
Kirn-Kher

चौकटीतील ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक
दिल्लीतील गजबजलेल्या मोहल्ल्यातली एक जुनाट इमारत. तिथं वरच्या मजल्यावरच्या घरात सरदारी बेगम आपल्या एकुलत्या एका मुलीसह सकिनासह राहतेय. सरदारी ही एके काळची नामांकित ठुमरी गायिका. आता तारुण्यासोबतच तिचं गाणंही ओसरत चाललेलं. किंबहुना गाणं बजावणं तिनं बंदच केलंय. आता मुलीला शिकवण्यापुरताच काय तो गाण्याशी संबंध.

स्वत:च्या समाधानासाठी थोडाफार रियाज चाललेला. एकदा असाच रियाज करताना खाली रस्त्यावर गदारोळ माजतो. काय गडबड चालली आहे ते पाहण्यासाठी सरदारी सज्जातून डोकावून बघत असतानाच अचानक भलामोठा दगड जोरात येऊन तिच्या कपाळावर बसतो. त्या आघातानं जागीच कोसळून सरदारी गतप्राण होते. कायदा व सुव्यवस्थेच्या परिभाषेत हा मोहल्ला ‘संवेदनशील’ असल्यानं जातीय तणाव, दगडफेक हे प्रकार त्या भागाला नवे नसतात. पण सरदारी बेगमसारखी शतकातली सर्वश्रेष्ठ ठुमरी गायिका दगड लागून मृत्युमुखी पडल्यानं साहजिकच तणाव वाढतो. तापल्या तव्यावर राजकीय पोळी भाजून घ्यायला वेगवेगळ्या पक्षांचे लोक प्रयत्नशील असतात. त्यातच तहज़ीब नावाची पत्रकार या घटनेचं वार्तांकन करण्यासाठी त्या ठिकाणी येते. अल्पावधीतच तिला कळतं की, मरण पावलेली गायिका सरदारी बेगम ही तिची सख्खी आत्या होती. गाण्यासाठी लहानपणी घरातून पळून गेलेली, माहेरच्यांशी संबंध तोडलेली. सरदारीवर एक मोठा लेख लिहिण्याच्या उद्देशानं तहज़ीब वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधते. त्यातून उलगडत जाते सरदारीची कहाणी... 

सर्वसाधारण मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या सरदारीला लहानपणापासून संगीताचं वेड असतं. आई अल्लाला प्यारी झालेली, तर वडील कडक शिस्तीचे. घरात एक धाकटा भाऊ. हिची गाण्याबजावण्याची आवड वडिलांना मंजूर नसते अन्‌ त्यापायी ती सतत त्यांची बोलणी खात असते. हा विरोध सहन करूनही ती तडक इद्दनबाई या गायिकेच्या घरी पोचते. काहीही करून मला पदरात घे, मला गाणं शिकव अशी गळ ती घालते. गाणं सुरू असतानाच आलेल्या सरदारीला पाहून इद्दनबाईच नव्हे, तर श्रोतेदेखील अवाक होतात.

अखेर इद्दनबाई तिला गाणं शिकवायला राजी होते. थोड्या काळातच सरदारीच्या गाण्याची सर्वत्र छाप पडते. इद्दनबाईचा दर्दी चाहता हेमराज तिच्यावर आशक होतो. हे सारं मंजूर नसलेले सरदारीचे वडील तिला घरात कोंडून ठेवतात. धाकट्या भावाच्या मदतीनं सरदारी रातोरात घरातून पळून जाते आणि  हेमराजच्या घरात आश्रय घेते. ‘राजासाब’ अशी ओळख असलेला, रंगेल वृत्तीचा खानदानी हेमराज पत्नीचा विरोध डावलून सरदारीला घरात घेतो. आता राजासाबच्या आशीर्वादानं तिचं गाणं बहरू लागतं. पैसा आणि कीर्ती तिच्या वाट्याला येतात. याच काळात तिचं गाणं ऐकायला आलेला सादिक नावाचा तरुण तिच्यावर भाळतो. तिलाही तो आवडतो. राजासाबपासून गरोदर राहिलेली सरदारी सादिकसोबत पळून जाते, त्याच्याशी लग्न करते. व्यवहारकुशल सादिकमुळे सरदारीचं गाणं भरभराटीला येतं. खासगी मैफली, गाण्यांचं रेकॉर्डिंग अशा माध्यमातून ती प्रचंड लोकप्रिय होते. कालांतरानं सादिकशीही तिचे खटके उडू लागतात.

आपण कमावलेली सगळी संपत्ती सादिकनं स्वत:च्या नावावर केल्याचं तिच्या लक्षात येतं. जोरदार भांडण झाल्यानंतर सादिक तिला सोडून निघून जातो. मुलीला वाढवत, गाणं शिकवत सरदारी निग्रहानं राहू लागते. दुर्दैवानं मुलीमध्ये तिच्याएवढे गुण नसल्यानं तिच्यावर अवमानाचे प्रसंग येतात.

याच काळात रेकॉर्डिंग कंपनीचा मालक सेन तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतो. अर्थात तिच्या मुलीची जबाबदारी न स्वीकारण्याच्या अटीवर. सरदारी सौजन्यपूर्वक तो प्रस्ताव नाकारते. आता तिला कुणाचीही सोबत नको असते. उत्तरायुष्यात मुला-मुलींची लग्न जुळवून देण्याचं काम करून पैसे कमावण्याची लाजिरवाणी वेळ तिच्यावर येते आणि एके दिवशी ध्यानीमनी नसताना तो दगड कपाळी लागून तिचा दुर्दैवी मृत्यू होतो... 

खालिद मोहंमद यांच्या मूळ कथेवर दिग्दर्शक श्‍याम बेनेगल बनवलेल्या ‘सरदारी बेगम’ (१९९६) या चित्रपटातली ही शीर्षक भूमिका साकारून किरण खेर हिनं आश्‍चर्याचा सुखद धक्काच दिला. तो यासाठी की, अनेक मान्यवर अभिनेत्री समोर असताना बेनेगल यांनी तुलनेनं नवख्या असलेल्या किरण खेरची ‘सरदारी’साठी निवड केली होती. किरण खेरसोबतच किशोरावस्था ते तरुणपणातली सरदारी साकारणाऱ्या स्मृती मिश्रा हिनंही या भूमिकेत गहिरे रंग भरले. नायिकेला त्यागमयी बनवण्याचा, तिला देवत्व बहाल करण्याचा कोणताही प्रयत्न दिग्दर्शक व पटकथाकारानं केला नव्हता. सरदारी ही संगीताच्या वेडानं झपाटलेली आहे. तिचं गाणं भल्याभल्यांना वेड लावून जातं. पण संगीतातल्या उथळपणावर, बाजारू वृत्तीवर ती संतापून उठते. ती सर्वसामान्य माणसांप्रमाणेच स्वार्थी आहे. त्याप्रमाणेच मुलीवर जीव लावणारी आईदेखील आहे. एकुलत्या एका भावानं संबंध तोडल्याची तिला खंत आहे, पण तोच भाऊ मुलीच्या शिक्षणासाठी मदत मागायला येतो तेव्हा परतफेडीची अपेक्षा न ठेवता ती त्याला भरभरून मदत करते. (पुढे हाच भाऊ उसने घेतलेले पैसे परत करायला येतो तेव्हा ती ते पैसे लाथाडते.) सरदारी बेगमची ही कथा प्रख्यात गझल व ठुमरी गायिका बेगम यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतला असल्याची चर्चा (मुख्यत: त्याच्या नावावरून) होत असते. त्यात फारसं तथ्य नसावं. काय असेल ते असो, एका श्रेष्ठ गायिकेची ही शोकांतिका हृदयाला भिडणारी होती, एवढं मात्र खरं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com