अभिनयाबरोबर गायनालाही प्राधान्य (तारा सुतारीया)

अभिनयाबरोबर गायनालाही प्राधान्य (तारा सुतारीया)

सेलिब्रिटी टॉक 
माझे आजपर्यंतचे आयुष्य कला आणि मनोरंजन क्षेत्रातच गेले आहे. मला पिया ही जुळी बहीण आहे. आम्हाला नेहमीच माझ्या आई-वडिलांनी गाणे शिकणे, वेगवेगळे नृत्यप्रकार शिकणे आदी कलात्मक गोष्टींकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिले. वयाच्या पाचव्या वर्षांपासून मी आणि माझी बहीण वेस्टर्न क्‍लासिकल आणि बेली डान्स शिकलो आहोत. तेव्हापासून मी गाणी आणि डान्स परफॉर्मन्स करत आली आहे. मी गायक म्हणून अनेक ठिकाणी कार्यक्रम केले आहेत. मी माझ्या करिअरला लहान वयातच सुरवात केली. माझा पहिला शो १२ वर्षांची असताना व्हिडिओ जॉकी म्हणून डिस्ने वाहिनीवरील  ‘बिग बडा बूम’ हा टीव्ही शो केला होता. हा शो फारच प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याच वाहिनीवरील ‘द सूट लाइफ ऑफ करण ॲण्ड कबीर’ आणि ‘ओय जस्सी’ असे दोन शो केले. मी डिस्ने वाहिनीची पाच वर्षांसाठी ॲम्बेसिडर होते. 

मी आता ‘स्टुडंट ऑफ द इयर-२’मधून हिंदी चित्रपटांत पदार्पण करीत आहे. मी दोन ते तीन वर्षांपूर्वीच या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. तेव्हा मी कॉलेजमधून पदवी प्राप्त करणार होते. लहानपणापासूनच माझे सगळ्याच बाबतीतले प्रशिक्षण फारच शिस्तीचे आणि कडक असल्याने मला हा चित्रपट काम करताना फार कठीण गेले नाही. यासाठी टायगर श्रॉफने आणि या चित्रपटाच्या सर्वच टीमने मला फारच सहकार्य केले आहे. लोक आपल्याला ओळखतात, आपले चाहते प्रत्येक ठिकाणी आपली वाट पाहत असतात, आजूबाजूला माध्यमांचा घोळका असतो हे सर्व माझ्यासाठी फार नवीन आहे. या सगळ्यामुळे माझे आयुष्य बदलणार आहे आणि मला ते आवडते आहे. माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या क्षेत्रातील नाही. त्यामुळे मला खूप मेहनत करावी लागणार आहेच. मी इंडस्ट्रीमध्ये माझी स्वतःची वेगळी ओळख ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. भविष्यात मला मेहनत करून सर्व नावाजलेल्या कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा आहे. मला जुनी हिंदी गाणी ऐकायला फार आवडतात. मी नेहमी ही गाणी गुणगुणत असते. त्यामुळे माझे हिंदीवरील प्रभुत्व वाढत गेले. माझे हिंदी आणि इंग्रजी भाषेवर फार प्रेम आहे. मी खूप भाग्यवान आहे की, हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यावर लगेच माझ्या हाती तीन चित्रपट आले. ‘स्टुडंट ऑफ द इयर-२’, ‘मरजावा’ आणि ‘आरएक्‍स १००’ असे तीन चित्रपट मी २०१९मध्ये करते आहे. हे तिन्ही चित्रपट खूप वेगवेगळ्या विषयांवर आधारित आहेत. भविष्यात मला अशाच वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करण्याची इच्छा आहे. अभिनयाबरोबर माझे गायनालाही प्राधान्य असेल. मी पदार्पण करण्याऱ्या अभिनेत्यांना सांगेल की, आव्हानांना स्वीकारा आणि त्यांना बिनधास्तपणे सामोरे जा. स्वतःवर विश्‍वास ठेवा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com