ते घर... हे घर..!

Madhurani-Prabhulkar
Madhurani-Prabhulkar

सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभुलकर, अभिनेत्री
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीच्या प्रगल्भ लेखणीतून आणि दिग्दर्शनातून साकारलेला एक सुंदर चित्रपट मागच्या महिन्यात पाहण्यात आला. वेलकम होम! मृणाल कुलकर्णीची प्रमुख भूमिका... तिने अप्रतिम काम केलंय... तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे, सौदामिनी! ८-१० वर्षांच्या मुलीची आई असलेली आडनिड्या वयाची ही सौदामिनी नवऱ्याचं कुठलंसं वागणं असह्य झाल्यानं ते घर सोडून आईबाबांच्या घरी येते. सर्व सामानसुमान, मुलीला आणि आजारी वृद्ध सासूला बरोबर घेऊन! इथून सुरू झालेली ही कथा पुढे ‘घर’ या संकल्पनेचा विविध कोनांतून ठाव घेत जाते. यात दोन तसे साधेच प्रसंग आहेत. त्यातला एक - सौदामिनी खरंतर उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र तरी आईवडिलांच्या घरी येऊनही अवघडलेली... अस्वस्थच. आपल्यामुळे यांची अडचण होतेय... रूटिन बिघडतंय या भावनेतून अचानक अपराधीपणाच्या कोषात जाते... सतत स्वतःसोबत ‘सॉरी’ घेऊन फिरू लागते. दुसऱ्या प्रसंगात - ती काही तरी राहिलं म्हणून घ्यायला नवऱ्याच्या घरी जाते... खरंतर तिचंच ते घर, तिनं सजवलेलं... नटवलेलं... जोपासलेलं... ते आता तिनं खरंतर सोडलंय; पण जेव्हा ती ते अस्ताव्यस्त पसरलेलं पाहाते तेव्हा अतिशय अभावितपणे झरझर आवरायला घेते... नीटनेटकं करून बाहेर पडते...या दोन्ही प्रसंगांनी मी आतून ढवळून निघाले... अतिशय अस्वस्थ झाले...! खरंच स्त्रीचं स्वतःचं आपलं घर नक्की कुठलं? 

विवाह संस्था जन्माला आली त्याचवेळी खरंतर साधारणपणे ‘घर’ ही संकल्पना जन्मली असणार... घर म्हणजे डोक्‍यावरचं छप्पर... चार भिंतीमध्ये आखलेलं आपापलं जग... आपली चौकट! ज्यात हक्क, अधिकार, आपलेपणा आणि या अनुषंगानं येणाऱ्या सर्व भावभावना अध्यारूत आहेत....! पण याच विवाहसंस्थेने घर या संकल्पनेबाबत स्त्रीची अवस्था काहीशी दयनीय केलीय असं वाटतं मला! 

लहानपणापासून कळत-नकळत अगदी आई-वडिलांकडूनच असं नव्हे, पण वेगवेगळ्या माध्यमातून हे तुझं कायमचं घर नव्हे हे मनावर ठसतं... कुण्या एकाशी लग्न करून आपल्याला त्याच्या घरी जायचंय... ते ‘आपलं’ घर आणि नंतर आताचं आपलं घर होणार ‘माहेर’... ज्या माहेराची आपण चार दिवसांची पाहुणीच असणार... ज्या नवऱ्याच्या घरी ती इतक्‍या थाटामाटात जाते ते आपलंसं करून घ्यायला तिला वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रचंड लढाई लढायला लागते.. सतत सिद्ध करत राहावं लागतं... जिवाचा आटापिटा करावा लागतो... रक्त आटवावं लागतं... यात तिला प्रचंड मानसिक शारीरिक, भावनिक इन्व्हेस्टमेंट करावी लागते... प्रत्येकीला हा प्रवास करावाच लागतो... तो अटळ आहे... त्यात मनाची प्रचंड शक्ती लागते...! तरी एवढं करूनही किती जणींना माहेरी असतानाचा मोकळेपणा... ती सहजता सासरी जाणवते, हा प्रश्‍न उरतोच! आणि त्यात काही कारणांनी सासरी काही गडबड झालीच तर माहेरी परत येऊनही अवघडलेपणाच! कमवती असली तरी आश्रिताचीच भावना... हे असं आणि असंच वर्षानुवर्षे चाललंय... आणि सर्व स्त्रिया हे सहजतेनं चालवून घेतात.. निभावून नेतात हेच मी पाहतेय...! 

एका स्त्रीसाठी घर या संकल्पनेला तरीही अनन्यसाधारण महत्त्व असतं... तिच्यासाठी त्या चार भिंती नसतात... तिच्यासाठी घर.... म्हणजे तिचा संसार असतो... तिनं मायेनं जोडलेली माणसं असतात... ममतेनं वाढवलेली लेकरं-बाळं असतात... ती या घरांसाठी... किती आणि कोणकोणते त्याग करते तिचं तिलाच ठाऊक असतं. तरीही ती असते सतत... हसतमुख... सर्वांना पंखाखाली घेणारी अशीच! या साऱ्यात अल्लड, निर्धास्त, मनमोकळी ‘ती’ हरवून जात असावी का? 

‘वेलकम होम’मध्ये मृणालची मुलगी तिला विचारते... ‘आई, आपलं घर म्हणजे काय?’ त्यावर मृणाल खूप साधं तिला समजेल असं उत्तर देते... ‘जिथे आपल्याला आपल्या मनासारखं राहता-वागता येईल... मोकळेपणा, निवांतपणा जाणवेल ते आपलं घर!’ 

मला सर्रकन्‌ आठवण झाली ती अमृता प्रीतम यांनी निर्माण केलेल्या चौथा कमरा या संकल्पनेची... चौथा कमरा म्हणजे तिची... फक्त तिची खोली... तिची स्पेस... तिची जागा... तिचं विश्‍व.... जिथे ती फक्त ती असेल... कुणाचीच कुणी नसेल... तिची ती असेल फक्त! मात्र ही कल्पना अनेक जणींसाठी केवळ कल्पनाच राहिली असेल... कल्पनाच राहून जाईल... पण सासर-माहेर या दोन भोज्जांच्यामध्ये हेलकावे घेणाऱ्या स्त्रीमनाला ही कल्पनासुद्धा सुखद...! 

अखेर वेलकम होममध्ये मृणालची व्यक्तिरेखा तिचा पर्याय निवडते... नवऱ्याचं घर सोडते... आई-बाबांचंही मागं टाकते...आणि भाड्याच्या स्वतंत्र घरात राहायचा निर्णय घेते.... ज्यात नांदतील तीन पिढ्या...तिची सासू, तिची मुलगी....आणि ती...तिची ती...फक्त तिची ती...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com