आव्हानात्मक भूमिकांची आवड..!

rohini-hattangadi
rohini-hattangadi

मी स्वतः फार कमी मराठी चित्रपट केले. मराठीमध्ये ज्या कथा मला भावल्या, तेच चित्रपट करण्यास मी आजवर होकार दिला. मराठी चित्रपटांच्या तुलनेत मी बरेच हिंदी चित्रपट केले. पण एक सांगते, जेवढं प्रेम मला मराठी रसिकांनी दिलं तेवढंच प्रेम मला हिंदी चित्रपटांमध्ये काम करत असतानाही मिळालं. माझ्या प्रत्येक मालिका, चित्रपट किंवा नाटकानंतर प्रेक्षकांकडून मिळालेली दाद नेहमीच माझ्यासाठी महत्त्वपूर्ण राहिली आहे.

शिवाय मी माझ्या आवडीचं काम करत असताना माझ्या वयाचा आकडा कधीच लक्षात ठेवत नाही. प्रत्येक काम अगदी दिलखुलासपणे आणि एन्जॉय करत करते. म्हणूनच माझं काम प्रेक्षकांपर्यंत अधिक पोचतं.

आजही मला बरेच जण प्रश्‍न विचारतात ‘रोहिणीताई, वयाची साठी ओलांडल्यानंतरही तुम्ही तितक्‍याच जिद्दीने आणि उत्साहाने काम कसं करता?’ यावर माझं एकच उत्तर आहे, माझं अभिनयावर असणारं प्रेम मला अधिक उत्साहाने काम करण्यास बळ देतं. हिंदीमध्येही मी अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं. पण त्यांच्याबरोबर काम करत असताना आपली भूमिकाही रुपेरी पडद्यावर अधिक उठून दिसावी यासाठी मेहनत घेतली आणि याच मेहनतीचं फळ मला मिळालं.

मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं, की गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये झालेले बदल खरंच कौतुकास्पद आहेत. आणि या बदलामध्ये खारीचा वाटा आहे तो नव्या पिढीचे दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मात्यांचा. कलाकार म्हणून मी एका गोष्टीचं निरीक्षण केलं आहे, की कलाक्षेत्रामध्ये येणारे नव्या पिढीचे लोक आपण कुठे कमी पडू नये म्हणून जिद्दीने काम करतात. कोणतंही काम करण्याची त्यांची तयारी असते आणि तितकीच मेहनतही. हल्लीच्या हिंदी चित्रपटात ॲक्‍शन, कॉमेडीचा भरघोस मसाला आपल्याला पाहायला मिळतो. पण मराठी चित्रपटांमध्ये याउलट चित्र पाहायला मिळतं. मराठी चित्रपटांची कथाच प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवते. मराठीमध्ये चित्रपटांच्या बाबतीत नवनवीन प्रयोग होत आहेत. ते प्रयोग प्रेक्षकही स्वीकारत आहेत. आपला जो कंटेन्ट आहे, तो मी मल्याळम चित्रपटांमध्ये आधी पाहायचे. मल्याळम चित्रपट कंटेन्टच्या बाबतीत अधिक चांगले होते. आता आपण कंटेन्टच्या बाबतीत त्यांच्या तोडीला तोड देत आहोत, असे मला वाटते. ‘देऊळ’ चित्रपटाला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा मी परीक्षक होते. तेव्हा मराठी सहा ते सात चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांसाठी फायनलला होते. खरं सांगते, तेव्हा मला आपल्या चित्रपटसृष्टीचा फार अभिमान वाटला.

मी ‘गांधी’, ‘चालबाज’, ‘अग्निपथ’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ यांसारखे हिंदी चित्रपट केले. मी केलेल्या हिंदी चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. पण आमच्या वेळी स्ट्रगलची व्याख्या फार वेगळी होती. सहजासहजी चित्रपटांमध्ये काम मिळणं कठीण होतं. पण आताच्या कलाकारांना स्वतःची कला जगासमोर आणण्यासाठी विविध माध्यमं उपलब्ध झाली आहेत. सोशल मीडियामुळे तर रातोरात प्रसिद्धी मिळत आहे. पण हे सारे क्षणिक बदल आहेत, असं मला वाटतं. ग्लॅमरस दुनियेकडे पाहून काही जण या क्षेत्राकडे वळतात. पण हे त्यांच्यासाठी घातक आहे. रातोरात मिळणारी प्रसिद्धी काही दिवसांत कमीही होऊ शकते. कलाक्षेत्राशी मी जोडली गेले तेव्हापासूनच मी माझा एक नियम तयार केला. कधीच मी कोणाकडे काम मागायला गेले नाही. याउलट माझं काम पाहूनच मला चित्रपट, मालिकांच्या ऑफर येत गेल्या. आपण काम मागायला गेल्यावर त्यांनी सांगितलेल्या भूमिका आपल्या मनाविरुद्ध कराव्या लागतात, असं मला वाटायचं. त्यामुळे मी पहिल्यापासूनच कोणाकडे मला हा चित्रपट द्या, असे बोलायला गेले नाही. कधी कधी कामच नाही, असेही माझ्या बाबतीत घडले आहे. माझा बॅंक बॅलन्सही अगदी एक हजाराच्या घरात गेलेला आहे. पण अशा वेळीदेखील देवाच्या कृपेने माझ्याकडे काम आलेलं आहे. त्यामुळे मला काम द्या, असं मला कधीच कोणाकडे बोलायला लागलं नाही.

नरेश बिडकर दिग्दर्शित ‘वन्स मोअर’ या चित्रपटाच्या निमित्ताने मी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये माझी दुहेरी भूमिका आहे. त्यामधील एक पात्र मी आजोबांचं साकारलं आहे. या पात्रासाठी चक्क मला पाच तास मेकअप करण्यासाठी लागायचे. चित्रीकरण झाल्यानंतर दोन तास मेकअप उतरवण्यासाठी लागायचे. पण हा वेळदेखील मी एन्जॉय केला.

आजवर मी केलेल्या भूमिकांपैकी ही भूमिका आव्हानात्मक होती. प्रॉस्थेटिक मेकअपच्या साह्याने मेकअप आर्टिस्ट रमेश आणि कमलेश यांनी माझा मेकअप केला. आजोबांच्या गेटअपमध्ये मी स्वतःला पहिल्यांदाच आरशामध्ये पाहिलं, तेव्हा मीच आश्‍चर्यचकित झाले; पण मला आव्हानात्मक भूमिका स्वीकारायला आवडतात आणि म्हणूनच मी हा चित्रपट करण्यास होकार दिला.
(शब्दांकन - काजल डांगे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com