...हे पाप मला नको!

Samruddhi-Pore
Samruddhi-Pore

सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका
शेजारच्या काकू काल कचरा देताना बोलत होत्या, ‘आता नवीन सरकार आलंय, तर पहिलं काम स्वच्छता अभियनाचं चालवतील. परदेशात कसं सगळं सुंदर वाटतं. कारण तिकडचे लोक साधं चॉकलेट खाल्ल्यावर रॅपर खिशात ठेवतात आणि डस्टबिन दिसल्यावर त्यातच टाकतात. मी या ‘थर्टी फस्ट’पासून शपथच घेतलीय, की काहीही झालं तरी कचरा हा कचरा कुंडीतच टाकणार.’ काकूंची दोन्ही मुलं अमेरिकेत असतात. दोन्ही मुलांची लग्न झालीत. सुना आल्या, नातवंडं झालीत. सुरवातीला काकू अमेरिकेत खूपदा जायच्या, पण हल्ली तिकडचे गोडवे जरा कमीच गातात. त्या म्हणाल्या, ‘‘आता नातवंडं मोठी झालीत. आम्ही असताना त्यांना मराठी यायचं बोलायला, पण आता ते अमेरिकेची इंग्लिश बोलतात. आम्ही त्यांच्याशी बोलायचं तर सोडा, त्यांचं बोललेलं कळत पण नाही आम्हाला आणि ते त्यांच्या विश्‍वात रमलेत. त्यांना वेळ नाही आमच्याशी बोलायला. मग फार एकटं वाटतं हो तिकडं. आपलं आपण फिरायला जाऊ शकत नाही. जवळपास चालत गेलो तेवढंच. बस, रिक्षा असं काहीच नाही. सुंदर बंगल्यात बंदिवान असल्यासारखं वाटतं...’ मला ऑफिसला जायला उशीर होत होता म्हणून मी आपलं ‘हो-हो’ म्हणत कलटी मारली. काकूंना बोलायला कुणीतरी बकरा हवा होता. माझ्या लक्षात आलं, दया आली, पण काय करणार मलाही वेळ नव्हता. 

जाताना मला दिसलं, की काकूंनी आज घराची साफसफाई करून काही सामान कचरा उचलणाऱ्याला दिलंच नव्हतं. मी निघाले. सगळं काम आटपून सायंकाळी घरी येताना घराजवळच्या चौकात एका वडाच्या झाडाच्या बुंध्यांजवळ सकाळी काकूंनी जे सामान काढून ठेवलं होतं, त्यापैकी भंगलेल्या देवाच्या मूर्ती आणि एक जुनी झालेली देवाची तुटलेली फोटो फ्रेम आणून ठेवली होती. माझं लक्ष गेलं. मनाशी म्हटलं, सकाळी देश आणि परदेशातील स्वच्छतेवर बोलणाऱ्या काकूंनी हे सामान झाडाच्या बुंध्याजवळ आणून ठेवलंय. काय बोलायचं आता? तुम्ही सगळ्यांनीच हे दृश्‍य कुठे ना कुठे पाहिलं असणार. वडाचं झाड सुंदर आहे, त्याला छानसा पार आहे. मात्र बुंध्याशी अशा तुटलेल्या मूर्ती आणि काच फुटलेल्या देवाच्या बऱ्याच फ्रेम पडल्या आहेत. रोज तेथील स्वच्छता होते. पालिकेचे लोक रस्ता झाडायला येतात. पारावर काही खायच्या वस्तू सांडलेल्या असतात, त्या साफ करतात.

पण तुटलेल्या देवांना मात्र कुणीच हात लावत नाही. मग तो कोणत्याही धर्माचा असो. मी एकदा गाडी थांबवून म्हटलं, ‘‘आप ये सब तुटा-फुटा सामान क्‍यों नहीं लेकर जाते?’ तर म्हणाला, ‘खालीपिली कौन पाप सर पर लेगा? सरकार सफाई का पैसा देता है. पाप सर पर लेने का नहीं.’ तो पैसे देऊनही मूर्ती फेकायला तयार नव्हता. 

अशा अडचणी फक्त भारतातच येत असाव्यात. आपण काय परदेशांतल्यांचं अनुकरण करणार? आणि कोणतेही सरकार काय करणार? आता प्रत्येक पत्रिकेवर गणपती आणि देवाचे स्टिकर असतात. आपण काम झाल्यावर फेकतोच ना? वर्तमानपत्रात असे कितीतरी देवाचे फोटो असतात. आपला देव-धर्म आपल्या भावना आहेत. त्यातील तत्त्व आहेत. जे आचरणात आणण्याची गरज आहे. या बाह्य गोष्टींची भीती बाळगून आचरण खराब करणं म्हणजे धर्म भ्रष्ट करणंच होय. तुटलेल्या मूर्तीला कुठे फेकू, जाळू, गाडू कळतच नाही, तेव्हा सोपा उपाय म्हणजे गुपचूप कुठेतरी नेऊन ठेवणं आणि दुसरा कुणीतरी ती जबाबदारी पार पाडेल अशी आशा बाळगणं! पाप लागायचंच असल्यास ते त्याला लागेल, मला नाही. किती घाणेरडी विचारसरणी आहे. मी तर म्हणेन पाप-पुण्य असं काय असंलच, तर अशी विचारसरणी करणाऱ्यालाच लागू शकतं. देवाला घाबरण्यापेक्षा देवावर प्रेम करा आणि वाईट कर्माला घाबरा. 

स्वच्छता कुठल्याही धर्मातलं पहिलं पुण्य आहे. चला तर मग स्वच्छता करून आपल्या देशाची आपण पूजा करूयात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com