लेखक, शिक्षक ते महत्त्वाचे सल्लागार : डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन

V. Anantha Nageswaran
V. Anantha Nageswaransakal media

वैभव गाटे

देशाच्या आर्थिक धोरणांना दिशादर्शक ठरणारा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या निधी नियोजनाच्या सोहळ्यानंतर केंद्र सरकारपुढे आव्हान आहे ते देशाच्या अर्थव्यवस्थेला आर्थिक चक्रव्यूहातून बाहेर काढण्याचे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नुकतीच अर्थशास्त्रज्ञ डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती केली आहे.
देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार या पदाची गरिमा अत्यंत मोठी आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १९७२ मध्ये देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदावर कार्य केले आहे.

याशिवाय बिमल जालान, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, अरविंद सुब्रमण्यम यांनीही हा कार्यभार अत्यंत समर्थपणे पेलला. या यादीत आता नागेश्वरन यांना स्थान मिळाले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेकडे अर्थजगतातून तितक्याच जबाबदारीने पाहिले जाईल.
लेखक, शिक्षक, सल्लागार ते थेट देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार हा नागेश्वरन यांचा प्रवास अर्थातच सोपा नाही. त्यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये २०१९ नंतर दोन वर्षांसाठी पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून काम केले आहे.

ही एक महत्त्वाची पार्श्वभूमी त्यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती होण्याला आहे. अहमदाबाद आयआयएममधून त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. तसेच एमहर्स्टच्या मॅसाचुसेट्स विश्वविद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळविली आहे. सरकारच्या आर्थिक स्वायत्त संस्था, आर्थिक समित्या, मध्यवर्ती बँक यामध्ये जबाबदारीची पदे भूषवणारी अनेक अर्थतज्ज्ञ मंडळी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित आहेत. नागेश्वरन हेही त्यांपैकी एक. शिक्षण क्षेत्राशी त्यांचे जवळचे ऋणानुबंध आहेत. नागेश्वरन आयएफएमआर ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये मुख्य अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. केरा विद्यापीठात ते अर्थशास्त्राचे अतिथी प्राध्यापक आहेत.

उल्लेखनीय म्हणजे नागेश्वरन यांनी सार्वजनिक धोरणांमध्ये संशोधन आणि शिक्षणासाठी एक स्वतंत्र केंद्र म्हणून तक्षशीला इन्स्टिट्यूशन स्थापनेत सहाय्य केले आहे. याशिवाय त्यांनी त्यांचा लेखन छंदही जोपासला आहे. भारतीय अर्थव्यवस्था, वित्तीय क्षेत्र यासंबंधी विपुल लिखाण केले आहे. २०१६ मध्ये त्यांचे ‘कॅन इंडिया ग्रो?’ हे पुस्तक प्रकाशित झाले. शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी सिंगापूरमधील क्रेडिट सुइस ग्रुप आणि जुलियस बेयर ग्रुपमध्येही काम केले आहे. स्वित्झर्लंडमध्ये अनेक वित्तीय व्यवस्थापन संस्थांच्या संशोधनात्मक कामात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

ऐतिहासिक नोटबंदीच्या निर्णयाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेक अर्थतज्ज्ञांचे गट पडले. नोटबंदीला नागेश्वरन यांचाही पाठिंबा होता. सरकारने धोरणात्मक सुधारणांना सुरुवात केल्याचे त्यांनी त्या वेळी म्हटले होते. कोरोनाकाळात देशाच्या अर्थचक्रावर झालेल्या परिणामांचाही त्यांनी अभ्यास केला. कोरोनामुळे बंद झालेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता.

कोरोना संसर्गाने मंदावलेल्या अर्थचक्राच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने यंदा आर्थिक विकासदर नऊ टक्क्यांपर्यंत राहील, असा अंदाज वर्तवला; मात्र लॉकडाऊनचा उद्योग व्यवसाय, हॉटेल, मालवाहतूक आणि यांसारख्या अनेक क्षेत्रांवर दयनीय परिणाम झाला आहे. याशिवाय बेरोजगारी, वेतनकपात, घटलेली क्रयशक्ती हीदेखील आव्हाने आहेत. या सर्व समस्यांवर शाश्वत तोडगा काढण्याचे आव्हान मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांच्यापुढे असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com