आव्हानात्मक नाटककार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh elkunchwar

प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांना टाटा समूहातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या साहित्य महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

आव्हानात्मक नाटककार!

- चंद्रकांत कुलकर्णी saptrang@esakal.com

प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांना टाटा समूहातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या साहित्य महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या एलकुंचवार यांच्या शिरपेचात या जीवनगौरव पुरस्काराने आणखी एक मानाचा तुरा खोवला जात आहे. भारतीय रंगभूमीवरील या नाटककाराविषयी, त्यांच्या नाटकांच्या वैशिष्ट्याविषयी....

भारतीय रंगभूमीवर अनेक महत्त्वाचे नाटककार होऊन गेले. मात्र आधुनिक काळात खऱ्या अर्थाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचं अधिष्ठान मिळवलेले पाच नाटककार भारतीय रंगभूमीवर आहेत, असं मी मानतो. यामध्ये विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, मोहन राकेश, धर्मवीर भारती आणि महेश एलकुंचवार यांचा समावेश आहे. तेंडुलकर यांची ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘सखाराम बाइंडर’, ‘घाशीराम कोतवाल’ ही नाटकं; कर्नाड यांचं ‘हयवदन’ आणि ‘तुघलक’, मोहन राकेश यांची ‘आषाढ का एक दिन’, ‘आधे अधुरे’, धर्मवीर भारती यांचं ‘अंधायुग’ आणि एलकुंचवार यांची ‘वाडा नाट्यत्रयी’, या नाटकांचा उल्लेख आपण प्रामुख्याने अभिजात नाटकं म्हणून करतो. विविध भाषांत अनुवादित होऊन अनेक ठिकाणी या नाटकांचे प्रयोग झाले. या प्रत्येक नाटककाराचा प्रांत वेगळा आहे; पण या सर्वांच्या नाटकांत नवता आणि परंपरा या दोन्हींचं सुयोग्य आकलन आहे. त्यात आधुनिक दृष्टिकोन आहे, नाट्य रचनेचा अभ्यास आहे आणि आशयात जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे.

एलकुंचवार यांच्या नाटकांबाबत प्रामुख्याने विचार करता काही ठळक वैशिष्ट्यं आपल्याला दिसतात. पाच पिढ्यांच्या दिग्दर्शकांनी एलकुंचवार यांची नाटकं दिग्दर्शित केली. हौशी नाट्यसंस्था, प्रायोगिक नाट्यसंस्था, राष्ट्रीय नाट्य विद्यालय यांसारख्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था अशा सर्वांनी या नाटकांचे प्रयोग केले. हिंदी, बंगाली, कन्नड, फ्रेंच, इंग्रजी अशा नानाविध भाषांतील अनुवाद करून सादर झालेले प्रयोगदेखील यशस्वी झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून भारतीय पातळीवर एलकुंचवार यांची नाटकं पोहोचली.

एलकुंचवार यांची नाटकं मी दिग्दर्शित करण्यापूर्वी इब्राहिम अल्काझी, विजया मेहता, सत्यदेव दुबे, अमोल पालेकर अशा अनेक दिग्गजांनी ही नाटकं दिग्दर्शित केली होती. मी वयाच्या ३१ व्या वर्षी एलकुंचवार यांच्या ‘वाडा नाट्यत्रयी’चे प्रयोग केले. तत्पूर्वीच्या दिग्दर्शकांनी या नाट्यत्रयीतील प्रत्येक भागाचे स्वतंत्रपणे प्रयोग केले होते. मात्र सलग त्रिनाट्यधारा सादर झाली नव्हती. ‘आविष्कार’तर्फे १९९४ मध्ये मात्र आम्ही ही त्रिनाट्यधारा सलगपणे सादर केली. भारतीय रंगभूमीवरचा हा पहिला प्रयोग तर होताच; पण तो विक्रमही ठरला. त्यानंतर पंचवीस वर्षांनी व्यावसायिक रंगभूमीवरदेखील हे प्रयोग आम्ही ‘जिगीषा’ आणि ‘अष्टविनायक’ या संस्थांतर्फे सादर केले, तेदेखील यशस्वी ठरले. त्यानंतर एलकुंचवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या नाट्य महोत्सवात त्यांच्या प्रस्थापित नाटकाचा नव्हे, तर ‘मौनराग’ या ललित निबंधाच्या पुस्तकातील दोन लेख निवडून मी आणि सचिन खेडेकर यांनी त्याचं अभिवाचनाच्या स्वरूपात ‘आविष्कार’तर्फे सादरीकरण केलं.

त्यामुळे गेली तीस वर्षं मला एलकुंचवार यांचा, त्यांच्या लिखाणाचा सहवास लाभला, असं म्हणायला हरकत नाही. माझं वय वाढत गेलं, समज वाढत गेली, नाटकाविषयीचं आकलन वाढत गेलं, तसा त्यांच्या लिखाणातील गर्भितार्थ मला उलगडू लागला, त्यातील मूळ स्वरूप अधिक चांगल्या पद्धतीने मला कळू लागलं. एलकुंचवार यांच्या ‘वाडा नाट्यत्रयी’मध्ये महाराष्ट्राचा तीस-पस्तीस वर्षांचा सांस्कृतिक इतिहास मांडलेला आहे, असं मी नेहमी म्हणतो. या

नाट्यत्रयीत जितकं नाटक आहे, तितकंच साहित्यही आहे. त्यात कादंबरीचा आवाका आहे, नाटकाची रचना आहे आणि कवितेची तरलता आहे. याशिवाय ते तत्त्वचिंतनात्मक तर आहेच. प्रत्येक पिढीतल्या रंगकर्मींनी ही नाटकं करून पाहिली आणि पाहणाऱ्या प्रत्येक पिढीतल्या प्रेक्षकांना ही नाटकं आपलीशी वाटली. तीस वर्षांपूर्वीचं लिखाण आजच्या काळातही जर प्रेक्षकांना कालानुरूप आणि आपलंसं वाटत असेल, तर हे लेखकाचं सर्वांत मोठं बलस्थान आहे.

एलकुंचवार यांची नाटकं नाटकाच्या सर्व विभागांसाठी अतिशय आव्हानात्मक असतात. प्रकाशयोजनाकार असेल, नेपथ्यकार असेल, नट असतील, दिग्दर्शक असतील, अशा प्रत्येकाला त्यांच्या नाटकावर काम करताना वेगळं आव्हान जाणवतं. त्यांचं नाटक प्रत्येक विभागासाठी अनेक शक्यता खुलवतं. त्यांच्या नाटकातील रंगावकाश मंचित करणं, हे दरवेळी विलक्षण अनुभव देणारं असतं. संवाद, त्यातील विराम आणि त्यातील शांतता, हेही एलकुंचवार यांच्या नाटकांचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. पात्रांचे संवाद आणि त्यामागील सबटेक्स्ट, यामुळे त्यांच्या नाटकातील छोटे छोटे क्षणही जिवंत होतात.

रंगकर्मी हे कायमच आव्हानांसाठी भुकेले असतात. आपल्या मर्यादा ओलांडून नवं काहीतरी करण्याची त्यांची दरवेळी इच्छा होते. ही आव्हानं एलकुंचवार यांची नाटकं कायम उपलब्ध करून देतात. प्रत्येक रंगकर्मीसाठी अनेकविध शक्यतांची दारं ही नाटकं खुली करतात. त्यांच्या या नाटकांतील आशयमूल्य रंगकर्मींना आणि प्रेक्षकांनाही सतत विचार करायला भाग पाडतं, त्यामुळेच प्रत्येक पिढीतल्या सर्व प्रकारच्या विचारसरणीच्या रंगकर्मींना त्यांच्या नाटकाचं आकर्षण वाटत आलं आहे. म्हणूनच चेतन दातार, गिरीश पतके, मोहित टाकळकर, संदेश कुलकर्णी या दिग्दर्शकांनीही त्यांच्या नाटकांचं दिग्दर्शन आवर्जून केलं.

गेल्या काही वर्षांत एलकुंचवार यांनी नाट्यलेखनापेक्षा ललित लेखनाकडे आपला कल वळवला. त्यांचे ‘मौज’मधील लेख असतील; ‘मौनराग’, ‘त्रिबंध’ यांसारखी पुस्तकं असतील, यांकडे पाहिल्यावर एलकुंचवार आता तत्त्वज्ञानाचा, चिंतनाचा, सृजन प्रक्रियेचा अर्थ समजून घेण्याचा, कलेचं नेमकं स्थान जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं आहे. हे लिखाण आत्मचिंतनाकडे, स्वतःच्या अनुभवाकडे अधिक झुकलेलं असेल, असं प्रारंभी वाटलं. मात्र, ते कलेचा सार्वकालिक आशय, कलेचं मूल्य, कलेचा मूळ स्रोत असा शोध घेत असल्याचं दिसतं आहे.

एलकुंचवार मोजकंच लिहितात; पण ते लिहितात तेव्हा त्यात गेल्या पाच-दहा वर्षांचं महत्त्वाचं काहीतरी झिरपलेलं असतं. अशा प्रकारचा श्रेष्ठ लेखक आपल्या आजूबाजूला असतो, तेव्हा साहित्य, संगीत, नाटक अशा सर्वच क्षेत्रांतील विद्यमानांना त्यांचे विचार मार्गदर्शक ठरत असतात. त्यामुळे त्यांच्या या अलीकडच्या लिखाणातूनही असं काहीतरी महत्त्वाचं निर्माण होईल, जे आपल्याला पुढील अनेक काळासाठी पुरेल, याची मला खात्री वाटते.

जिवावरच्या संकटाचा विसर...

वाडा नाट्यत्रयीवर आधारित जिगीषा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘दायाद’ या पुस्तकात शाम चौघुले या एका रसिकाने दिलेली प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. ते म्हणतात, ‘‘मी एकदा शिडनौकांच्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन गोव्यावरून मुंबईला परतत होतो. परतताना मुंबईजवळ ओहोटी लागल्याने आम्ही रात्री खांदेरी बेटाजवळ नांगर टाकला. सकाळी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला. ताशी ४५ किलोमीटर वेगाचे वारे किनाऱ्यावर आदळणार होते. समुद्रात आमचं होत्याचं नव्हतं होणार होतं. याच काळजीत मी नौकेत येणाऱ्या संकटाची प्रतीक्षा करत होतो. मन थाऱ्यावर नव्हतं. ते दिवाळीचे दिवस होते. रेडिओवर सकाळपासून दिवाळीचे खास कार्यक्रम लागले होते. त्यात एलकुंचवार यांचं ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक लागलं होतं. बदलत्या जीवनमूल्यांच्या ओघात माणसामाणसांमधील संबंध कसे बिघडतात याचं दर्शन या नाटकात होतं. या नाटकाने मी कुठल्या सागरी संकटात आहे, हे साफ विसरून गेलो. तीन तासांच्या या नभोनाट्यानंतर मी भानावर आलो; परंतु दरम्यान या नाटकाने मला माझी चिंता आणि काळजी दूर करायला लावली होती.’’ एलकुंचवार यांचं साहित्य हे असं प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणारं आहे.

(लेखक नाट्यदिग्दर्शक असून विविध पुरस्कारांचे मानकरी आहेत.)

(शब्दांकन : महिमा ठोंबरे)

टॅग्स :drama artistsaptarang