डिमॅट म्हणजे नक्की काय? (चंद्रशेखर ठाकूर)

डिमॅट म्हणजे नक्की काय? (चंद्रशेखर ठाकूर)

डिमॅट (Dematerialization) खातं म्हणजे आहे तरी काय, उघडायचं कसे आणि कुठं, असे असंख्य प्रश्‍न संभाव्य गुंतवणूकदारांच्या मनात घर करून असतात. पूर्वी कंपनीकडून शेअर सर्टिफिकेटं दिली जात असत. इसवीसन१९९६ मध्ये डिपॉझिटरी ॲक्‍ट अस्तित्वात आला आणि सर्टिफिकेटचा जमाना मागं पडला. या डिमॅट खात्याची माहिती समजून घेण्यासाठी आपण बॅंकेत जे सेव्हिंग खाते उघडतो त्याच्याशी या डिमॅटची तुलना करू. माझ्याकडं पाचशे रुपये आहेत. मी एखाद्या बॅंकेत जाऊन सेव्हिंग खातं उघडतो आणि माझ्याकडचे पाचशे रुपये सेव्हिंग खात्यात भरतो. बॅंक मला पासबुक देते आणि माझ्या खात्यात पाचशे रुपये आहेत अशी नोंद करून देते. या दोन स्थितींत काय फरक आहे? नोटा आणि पासबुक! पण परिणाम मात्र एकच, की मी पाचशे रुपये बाळगून आहे! हीच संकल्पना डिमॅटची आहे. मला डिमॅट खात्याचं स्टेटमेंट मिळतं. त्यात उल्लेख असतो, की माझ्या डिमॅट खात्यात उदाहरणार्थ बजाज ऑटोचे शंभर शेअर, हिंदुस्थान लिव्हरचे चारशे शेअर्स जमा आहेत.

डिमॅट खातं उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देणारी संस्था म्हणजे डिपॉझिटरी. आपण बॅंकेत सेव्हिंग खातं उघडतो, तशाच पद्धतीनं डिपॉझिटरीत डिमॅट खातं उघडत असतो. आपल्या देशात दोन डिपॉझिटरी आहेत. एक म्हणजे नॅशनल सेक्‍युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि दुसरी म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसल)! दोन्ही डिपॉझिटरींची कार्यपद्धती, शेअर्सची सुरक्षितता या गोष्टी सारख्याच असतात. डिपॉझिटरींवर सेक्‍युरिटीज अँड एक्‍सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या संस्थेचं नियंत्रण असतं. कुठल्याही डिपॉझिटरीत आपण आपलं डिमॅट खातं उघडू शकतो. मात्र, डिपॉझिटरीत जाऊन थेट खातं उघडता येत नाही. त्यासाठी डिपॉझिटरींनी एजंट नेमलेले असतात. या एजंटना डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) म्हणतात. राष्ट्रीयीकृत बॅंका, सहकारी बॅंका, अर्थसंस्था, शेअर दलाल हे डीपी म्हमून काम करतात. बॅंक डीपी असो किंवा शेअर दलाल डीपी असो, दोनही ठिकाणी आपल्या शेअर्सची सुरक्षितता सारखीच असते. डिमॅट खातं उघडण्यासाठी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आदींसारखा आपल्या पत्त्याचा पुरावा; निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड यांसारखं  आपलं छायाचित्र असलेलं ओळखपत्र; तसंच खातेदाराचं छायाचित्र या गोष्टींची आवश्‍यकता असते. पॅन कार्ड नसेल, तर कुणालाही डिमॅट खातं उघडता येणार नाही. डिमॅट खातं जास्तीत जास्त तीन व्यक्तींच्या नावे उघडू शकतो. कुणा अज्ञान (मायनर) व्यक्तीच्या नावे डिमॅट खातं उघडायचं असेल, तर त्यासाठी अर्ज करणार तो त्याचा पालक. कारण कायद्यानुसार अज्ञान व्यक्ती सही करू शकत नाही.

योग्य रितीनं फॉर्म भरून ती कागदपत्रं डीपीकडं दिली, की खातं उघडलं जातं आणि आपल्याला सोळा आकड्यांचा डिमॅट खाते क्रमांक मिळतो. डिमॅट खाती किती उघडावीत यावर काहीही बंधन नाही. मात्र, प्रत्येक खात्याला डीपी दर वर्षाला ठराविक शुल्क आकारतो, जे प्रत्येक डीपीकडं भिन्न असू शकतं. तुमच्या डिमॅट खात्यात काही व्यवहार होवोत किंवा न होवोत- हे शुल्क मात्र भरावंच लागतं.
बॅंकेतं सेव्हिंग खातं आणि डिमॅट खातं यांत बरंचसं साम्य असतं, हे आपण याआधी पाहिलं. तरीदेखील या दोन खात्यांच्या बाबतीत काही गोष्टींत फरक आहे, हे विसरून चालणार नाही. सेव्हिंग खात्यात किमान काही रक्कम कायम जमा असली पाहिजे, असा बॅंकेचा नियम असतो. डिमॅट खात्यात शून्य बॅलन्स चालतो. म्हणजे खातं रिकामं असलं, तरी चालतं. संयुक्त बचत खात्यात व्यवहार करताना कुणाही एका खातेदाराची सही चालते. डिमॅट खात्यात मात्र असं नाही. समजा डिमॅट खात्यात तीन संयुक्त खातेदार असतील, तर प्रत्येक वेळी म्हणजे कुठलंही पत्र डीपीला द्यायचं असेल, डिलिव्हरी इन्स्ट्रक्‍शन स्लिप द्यायची असेल, पत्त्यात बदल करायचा असेल, तर सर्व खातेदारांनी सह्या करणं आवश्‍यक असतं. ‘आयदर ऑर सर्व्हाइवर’ ही बचत खात्याच्या बाबतीत असलेली सोय इथं नाही.

एकदा डिमॅट खातं उघडलं, की डीपी आपल्याला दर महिन्याला खात्याचं स्टेटमेंट देतो. आपल्याला आपल्या डिमॅट खात्याची पडताळणी करून पाहायची असेल, तर सोय असते. खातेदारांना इंटरनेटमार्फतची सेवा विनामूल्य दिली जाते, जी वापरून आपण घरबसल्या आपल्या खात्याचं स्टेटमेंट कितीही वेळा पाहू शकतो किंवा स्टेटमेंट छापूनही घेऊ शकतो. यासाठी डिपॉझिटरीकडून तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल. मात्र, काही मंडळींना इंटरनेट वापरता येत नाही. त्यांच्यासाठी अशी सोय असते, की तुमच्या डिमॅट खात्यातून जेव्हा शेअर्स डेबिट होतात, तुम्हाला आयपीओ अलॉटमेंट झाली असेल, किंवा बोनस शेअर्स जमा झाले असतील, तर तसा एसएमएस येतो... आणि हो, तुम्हाला येणारा एसएमएस हा अपरात्री झोपमोड करायला येणार नाही, याची काळजी सीडीएसएलनं घेतलेली असते!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com