बदल हाच स्थायिभाव

change.jpg
change.jpg

वेळ बदलते, लोक बदलतात, परिस्थिती सतत बदलत असते.
अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर, या जगात जिथे सगळं बदलत असते तिथे एकच गोष्ट आहे जी शाश्वत, अटळ आणि कधी ना बदलणारी आहे... ती म्हणजे बदल!
थोडं पेचाचं आहे, पण सत्य हेच आहे.
आज जे आहे ते काल नव्हतं आणि उद्या राहणार नाही, काळ बदलतो आणि काळाबरोबर परिस्थिती बदलते.
आपण ऐकलेल्या अशा कितीतरी कहाण्या आहेत, काही ऐकलेल्या काही घडलेल्या. काही आपण स्वतः Manage केलेल्या. काही करवून घेतलेल्या.
प्रत्येक पिढी नवीन प्रश्न आणि नवीन उत्तरांसहित या गोष्टी नव्याने जगत असते. जुन्या पिढीकडून नेहमी ऐकलंय की, आम्ही काय सहन केलं आणि कसा परिस्थितीचा सामना केला याची प्रचिती तुम्हाला न आलेलीच बरी! हे कदाचित असंच काहीसं त्यांच्या आधीच्या पिढीने त्यांना सांगितलं असेल. महत्त्वाची आणि मजेची गोष्ट म्हणजे आम्ही पण असंच सांगणार आहोत पुढे, आहोत काय सांगतच असतो. दर पिढी सिनिअर पिढीला त्यांना काही कळत नसल्याचं सांगते आणि पुढे मग तेच काहीसं ऐकते. पण आयुष्य Must Go On कारण पिक्‍चर नेहमी बाकी असतो. मजा आहे ना... पेच पडतो की नाही ते महत्त्वाचं नाही; पण उलगडत नक्कीच नाही. मग म्हणायचं तरी काय आहे तुम्हाला? असं जर कोणी विचारलं तर मग मात्र चर्चा प्रारंभ होईल.
महत्त्वाचं म्हणजे प्रश्न पडतात आणि या प्रश्नांची उत्तरं आपलं आयुष्य पुढे नेत असतात.
या प्रश्न पडण्याला ऍकेडेमिक शब्दांत संशोधन समस्या (Research Problem) म्हणतात. ही समस्या कळली की त्याचं उत्तर शोधायला सुरुवात होते. नवीन काहीच नसते. सगळं तेच, साहित्य तेच, आयुष्य तेच, मग नवीन काय? नवीन असतो दृष्टिकोन. त्या दृष्टिकोनाची कारणं आणि त्याचं स्पष्टीकरण. फक्त संशोधनाची पिढी बदलते आणि जुन्यातून नवीन काहीतरी शोधून काढते आणि मोठ-मोठी संशोधनं पुढे येतात. तसंच काहीसं आपल्या दैनंदिन जीवनाचं. सगळं तेच फक्त प्रश्न नवीन. हे प्रश्नांचं नावीन्य काहींना आनंद मिळवून देतं तर काहींना पेचात पाडतं. आपली उत्तर शोधण्याची पद्धत महत्त्वाची.
अर्थातच, आपला प्रश्न कोणताही असू शकतो, त्याचं उत्तर आपल्याला शोधायचंय, ही प्रश्न पडण्याची अवस्था म्हणजे आपला होणारा अर्जुन.
अर्जुनाला प्रश्न पडला, की माझ्याच नातेवाइकांना आणि मित्रांना मी कसा मारू. ते माझ्या पुढच्या कितीतरी पिढ्यांना भोगावं लागेल असं पापच. इथे अर्जुनाचा झाला To Be or Not To Be !! आपलाही कदाचित विविध विषयांमध्ये अर्जुन होत असतो कारण कुरुक्षेत्र सतत बदलत असते. तेव्हा अर्जुन पेचात पडला आणि अर्जुनाला सावरायला, त्याला उत्तर द्यायला आला तो कृष्ण आणि निर्माण झाली गीता.
महाभारतासारख्या अतिशय थरकाप उडवणाऱ्या घटनेमध्ये मनाला, विचाराला आणि कर्तव्याला आधार देणारी गीता ही दर काळात प्रश्नांची उत्तरं देईल अशीच आहे. लहानपणी आजोबा म्हणायचे, ज्ञानेश्वरांनी ज्या वयात ज्ञानेश्‍वरी लिहिली, त्या वयात जर प्रत्येकाने वाचली तर कितीतरी प्रश्न पडणारच नाहीत. तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी अशाच काही कथा-कहाण्या ऐकायलाही मिळायच्या. आता कधी कधी Whatsapp मुळे काही समोर येतात. कदाचित प्रश्नांच्या उत्तरांची technique बदलली. या ना त्या कारणाने का होईना पण वाचन सुरू झालं. अशीच या ना त्या कारणाने प्रश्नांची उत्तरं मिळत असतात, आठवणी घडत जातात आणि कहाण्यांना सुरुवात होते.
अशाच काही गोष्टींची आपण चर्चा करू या "मनमानसी' या सदरातून... आपली भेट आता ठरली तर मग!

डॉ. मृणालिनी नाईक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com