दादू आणि राजा : चर्चा तर होणारच

कानोजी
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

दादू आणि राजा

दादू आणि राजा
दोन भाऊ शेजारी, भेट नाही जन्मभरी, सांगा रे कोण? हे महाराष्ट्रातल्या मुलांना विचारले जाणारे कोडे. त्याचे उत्तर म्हणजे डोळे; पण आताच्या पिढीतल्या एखाद्या राजकीय समज असलेल्या मुलाने या कोड्याचे उत्तर उद्धव आणि राज असे दिले, तर वाईट वाटून घेऊ नका. दोघेही राजकीयदृष्ट्या आता जवळ येणार नाहीत. खरे तर हे दोघेही उत्तमप्रकारे जाणतात. मराठी माणसातल्या दुहीमुळेच आजवर येथील नियोजने फसली. दोन ठाकरे एकत्र येऊ नयेत, या हेतूने कितीतरी मंडळी काम करत असतील. नाही, नाही. "कानोजी'ला घरातल्या मंडळींबद्दल काही माहिती नाही हां. तिकडे गुजरातेत नियोजन होत असेल दोघांना वेगळे ठेवण्याचे. मराठी माणूस एकत्र आला तर बाकी सगळे क:पदार्थ ठरणार; पण हे साधे सत्य बाळा नांदगावकरांना पटत नाही. त्यांनी म्हणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला आहे. (तो त्यांनी मागितला होता का असले प्रश्‍न विचारू नका.) दोन भावांना एकत्र आणण्याची शर्थ ते सुरूच ठेवणार आहेत म्हणे. लहान वयात वाद नसताना राज वयाने मोठा असलेल्या उद्धवना दादू म्हणत. आता दादूने जर राजाचे ऐकायचे नाही, असेच ठरवले आहे तर कोण काय करणार? आपण रेकॉर्डसाठी एक माहिती मनात ठेवणे मात्र आवश्‍यक आहे, की सातही फोन राजाने केले होते, दादाने नाही...

अवधूत कधी इथे, तर कधी तिथे
म राठी कलाकारांना ठाकरे घराण्याचे फार प्रेम. अगदी खरे सांगायचे तर मराठीच काय हिंदीतले बडे स्टार्सही बाळासाहेबांच्या भेटीसाठी ताटकळत. कित्येकांच्या घरातील वाद ते सोडवत. "मातोश्री'चे आशीर्वाद घेतले की सिनेमाही बिनधोक चाले. आता बाळासाहेबांनंतर कलाकारांचा राबता वांद्य्रातील "मातोश्री'वरून दादरच्या "कृष्णकुंज'कडे हलला आहे. "मातोश्री'वर असतात भावोजी आदेश बांदेकर, छत्रपती शिवाजी महाराज साकारणारे डॉ. अमोल कोल्हे; पण बाकी पुष्कर श्रोत्रींसकट अजित भुरे, सई ताम्हणकर वगैरे मंडळी "कृष्णकुंज'ची प्रशंसक. काही जण तर दोन्हीकडे बरे संबंध ठेवून असायचे. त्यातलेच एक अवधूत गुप्ते. संगीतकार गुप्ते गायक, परफॉर्मर. टीव्हीचा पडदा असो किंवा एखादी सभा; "तोडलेस मित्रा' म्हणून ते अशी काही दाद देणार की संपले. एका निवडणुकीत राज ठाकरेंचे मैत्र सोडून अचानकच ते उद्धववासी झाले. याच बदलाच्या वेळी गाणे तयार झाले... शिवसेना, शिवसेना; पण आता अवधूतजींशी थोरल्या पातीचे काहीतरी फाटले आहे म्हणे, त्यामुळेच ते पुन्हा मनसे गाऊ लागले आहेत : माझ्या राजाला साथ द्या... मनसेच्या मेळाव्यात जबरदस्त गाजणारे हे गाणे अवधूत गुप्तेंनी स्वत:च लिहिले आहे. त्यात वर्णन केलेली परिस्थिती राज ठाकरेंना इतकी चपखल लागू होते आहे, की गाणे ऐकून भरूनच येते म्हणा ना... आता त्यातली आर्त साद लक्षात घेत कितीजण राजाला साथ देतात ते बघायचे.

मुख्यमंत्र्यांना संमेलनाचा आधार!
ना गपूर ही उपराजधानी; पण भाजपसाठी ते केवळ संघपरिवाराचेच नव्हे, तर दोन प्रमुख नेत्यांचे मुख्यालय. ज्येष्ठ नेते नितीन गडकरी मोठे; तर सध्याचे पद लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मानाने महत्त्वाचे. या दोन्ही नेत्यांचा नागपुरातला संपर्क दांडगा. पदाचा बडिवार न मानता दोघेही नागपूरकर कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात सामील व्हायला कायम हजर. त्यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी सर्वांत महत्त्वाचे पद म्हणजे नगरसेवक. प्रभाग पद्धतीने नागपुरातली निवडणूक जिंकणेही सोपे झालेले. काहींना नितीनजी आपल्यालाच संधी देतील, असा विश्‍वास तर काहींची देवेनभाऊंवर मदार. दोघांनाही सर्वेक्षणाचे भारी प्रेम. त्यामुळे आपापल्या कार्यकर्त्यांना शांत करत, चुचकारत कुठे सर्वेक्षणात तुम्हाला मते नाहीत चांगली, असे दाखवत दोघांनी मर्यादेत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण संधी न मिळालेल्या मंडळींनी शेवटी शिस्तशीर पक्षाच्या संस्कृतीला गालबोट लावत निदर्शने केलीच. गडकरी वाडा हे त्या आरडाओरड्याचे स्थळ. मुख्यमंत्री फडणवीस या रोषातून सुटले. कसे, हे विचाराल तर डोंबिवली येथे सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटनपर भाषण करण्यासाठी मुंबई गाठायची असल्याने ते नागपूर सोडून उडाले. नामनिर्देशनपत्रे भरण्याची ती शेवटची घटिका होती, त्यामुळे एबी फॉर्म तेव्हाच वितरित झाले अन्‌ गडकरी रोषाचे धनी ठरले!

दुसऱ्याची पीडा...
प रीक्षेतला पहिला क्रमांक म्हणजे अव्वल स्थान. दुसरा कितीही चांगला असला तरी त्याचे स्थान खालचे. देवेंद्र फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळातले क्रमांक एकचे मंत्री. त्यांनी ठरवलेले क्रमांक दोनचे सहकारी म्हणजे चंद्रकांतदादा पाटील. दादा संघटनेत ज्येष्ठ. कार्यकर्तान्‌ कार्यकर्ता माहीत असलेले. राजकारणात नवागत असलेल्या दादांवर आता मुख्यमंत्री अत्यंत विश्‍वासाने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवतात. दादा कोल्हापूरचे. पश्‍चिम महाराष्ट्र हा तसाही भाजपसाठी खडकाळ प्रांत. तेथे कमळ रुजवण्याची कामगिरी सोपवली गेली आहे ती दादांवर. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत दादा पक्षकार्य करण्यात गुंतले आहेत. महसूल हे अफाट खाते. तेथे ते काम समजावून घेताहेत. त्यातच जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि मंत्रिवर्य गिरीश महाजन यांचे पटत नसल्याने तेथे आग विझवण्यासाठी दादांनाच पालकमंत्री केले गेले आहे. दादांचा जळगावशी काय संबंध, असा प्रश्‍न मनात येत असेल तर त्यांनी तेथे विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून कोणे एकेकाळी काम केले होते. त्याच आधारावर आता जळगावची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ये दौडत शकुंतले...
ना ही, हे कालिदासाचे उदाहरण नाही. ही आहे विदर्भातील ब्रिटिशकालीन आगगाडीला घातलेली आर्त साद. कापूस उत्पादक पट्ट्यातून कच्चा माल थेट ब्रिटनपर्यंत नेऊन तेथे त्याचा कपडा बनवण्यासाठी साहेबांनी उभारलेल्या यंत्रणेचा भाग होती शकुंतला एक्‍स्प्रेस. विदर्भात धावणारी ही गाडी एकेकाळी सगळा कच्चा माल लोहमार्गाने मुंबईच्या बंदरापर्यंत पोचवण्याचे काम करायची. ब्रिटिश कंपनीच्या खासगी मालकीची ही गाडी घरघर करत बंद पडली होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत जाते आहे, त्यात बंद पडलेल्या अशा यंत्रणांसारखी अनेक कारणे आहेत. आता या भागात कच्चा मालही सिंचन सोयींअभावी पिकत नाही. सारेच कोलमडून पडले असताना या भागात नव्याने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासन झटते आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या शकुंतला एक्‍स्प्रेसच्या मार्गाचे विस्तारीकरण करणारी योजना अर्थसंकल्पात मंजूर केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सावलीप्रमाणे वावरणारे अभिमन्यू पवार आणि सुमित वानखेडे हे त्यांचे स्वीय सहायक अशा योजनांचा पाठपुरावा करत असतात. अत्यंत शांतपणे काम करणाऱ्या सुमित वानखेडेंनी रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या मान्यतेनंतर यासंबंधात केलेले फेसबुक वॉलवरचे कथन बदलासाठी काम करणाऱ्या तरुणांची तळमळ व्यक्‍त करणारे आहे. शकुंतले, पुन्हा एकदा दौडत ये आणि विदर्भाला संपन्न कर...

Web Title: charcha tar honarch : political satire