‘...तो भैया ऑल इज वेल!’

कधी कधी आयुष्याचं चाक जणू गाळात रुततं. अशा वेळी काय करायचं? जिंदगी की झंड लग गयी है, म्हणतात ना...तशी अवस्था होते.
All is Well
All is WellSakal
Summary

कधी कधी आयुष्याचं चाक जणू गाळात रुततं. अशा वेळी काय करायचं? जिंदगी की झंड लग गयी है, म्हणतात ना...तशी अवस्था होते.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार, मित्रांनो!

कधी कधी आयुष्याचं चाक जणू गाळात रुततं. अशा वेळी काय करायचं? जिंदगी की झंड लग गयी है, म्हणतात ना...तशी अवस्था होते. तुम्ही आयुष्यात कधी ना कधी अशी अवस्था अनुभवली असेल... काहीही सुरळीत होत नाही, कितीही प्रयत्न करा, काहीही करा, पदरात अपयशच येतं.

आपण करिअर, आरोग्य व नातेबंध या गोष्टींबद्दल बोलत असतो. ही त्रिसूत्री आनंदी, सुखी-समाधानी आयुष्याचा मंत्र असते. आयुष्यात एखादी छोटीशी समस्या उद्भवली, तर माणूस त्यातून काहीतरी मार्ग काढतो; पण काही वेळा मात्र, कुठल्याच बाबतीत काहीच सुरळीत होत नाही...ना करिअरची गाडी नीट चालते, ना तब्येत नीट साथ देते, ना नातेबंध व्यवस्थित राहतात...मग अशा वेळी काय करायचं...? रडायचं? छाती बडवून घ्यायची...? काय करायचं?

विशेषतः कोरोनामुळं हे खूप प्रमाणात घडलं आहे. कोरोनानं अवघ्या जगाला जणू ‘ब्रेक’ लावला होता; या काळात लोकांनी जे काही बेत आखले होते - कुणाला बिझनेस सुरू करायचा होता, कुणाला लग्न करायचं होतं, कुणाला प्रवासाला जायचं होतं, कुणाला नोकरी करायची होती - ते सगळं तिथल्या तिथं थांबलं!

आता कोरोना कमी होतोय; पण काही जणांना वाटतंय, आता काय उपयोग, आता सगळं संपलंय! त्यांना वाटतंय, की ‘माझा सगळा उत्साह...माझ्यातलं चैतन्यच हरवलंय. सगळं जग पुन्हा पूर्वपदावर येतंय, कोरोना संपतोय असं वाटतंय; पण मला कसली उमेदच वाटत नाहीये. लोकांचं आयुष्य पूर्वपदावर येतंय, ते आता सुटी घेत आहेत, परीक्षांची तयारी करत आहेत, नोकरीला जात आहेत, लग्नं ठरत आहेत; पण... मला मात्र काही करावंसंच वाटत नाहीये.’

तुम्ही जर अशा मनःस्थितीत असाल किंवा अशा अवस्थेतून गेला असाल किंवा भविष्यात जर कधी तुम्हाला अशा अवस्थेचा सामना करावा लागला तर लक्षात घ्या की, अशा परिस्थितीला फक्त तुम्ही एकटेच तोंड देत नाही आहात.

जेव्हा अशी उदासवाणी भावना तुमच्या मनात येत राहते तेव्हा ज्या गोष्टी थोड्याशा बऱ्या असतात किंवा तितक्‍या वाईट नसतात, त्यासुद्धा तुम्हाला आवडेनाशा होतात. कारण, तुमचा मेंदू असा विचार करत असतो की, जगात फक्त तुमच्याबाबतीतच असं घडतंय. मग तुम्हाला सगळ्याच गोष्टी वाईट दिसू लागतात. आरशात पाहिलंत तर स्वतःचा चेहरासुद्धा तुम्हाला आवडेनासा होतो. तुम्हाला चेहऱ्यावरचे फोड खुपू लागतात... पण जेव्हा तुमचा मूड छान असतो तेव्हा तुमची तीच छबी पाहून तुम्ही खूश होता. तुम्ही उदास असता जेव्हा तुम्हाला चेहऱ्यावरचे फोड, एखादा डाग, एखादी सुरकुतीसुद्धा ठळकपणे दिसू लागते. अशा मनःस्थितीत अशा प्रकारचे कुठलेही विचार मनात येतात. तुम्हाला सगळ्या गोष्टी वाईटच दिसतात, कारण, तुमची मनोवस्था ठीक नसते.

‘हे बघा, सगळी कशी वाट लागलीय.’

‘हे बघा, माझ्या नशिबात अपयशच आहे.’

‘माझ्या नशिबात सुख लिहिलेलंच नाहीये.’

अशा प्रकारचे विचार तुमच्या मनात येत असतात.

मी तुम्हाला सांगू इच्छितो की, हा तुमचा समज आहे...फक्त भ्रम! प्रत्यक्षात असं नसतं. ही केवळ तुमची मनोभूमिका असते. काही लोकांच्या नशिबात फक्त दुःख लिहिलेलं आहे, दुर्दैव लिहिलेलं आहे, तर काहींच्या नशिबात सुख असं नसतं. काही लोकांचं नशीब फळफळलेलं दिसतं; पण त्याचा अर्थ, तुमच्या वाट्याला अतीव दुःख, दुर्दैव येणार आहे असं नाही.

काही लोकांच्या बाबतीत दुर्दैवाचा फेरा दिसतो. ते रस्त्यावर येतात आणि त्यांना बसची धडक बसते. हे अर्थातच त्यांचं दुर्दैव असतं; पण तुम्ही अगदी प्रतिकूल तेच घडेल असा किंवा अत्यंत टोकाचा विचार करत आयुष्य कंठू शकत नाही - टोकाचा म्हणजे लॉटरी लागेल आणि भाग्य उजळेल किंवा बसची धडक बसेल, अशा दोन्ही टोकांचा. बहुतेक जणांच्या बाबतीत इतकं प्रतिकूल घडत नाही.

पण अशा मनःस्थितीत असताना काय करायचं? तुम्हाला जर वाटत असेल की, माझ्या करिअरमध्ये काहीही चांगलं घडत नाहीये, माझी तब्येतही साथ देत नाहीये, माझे नातेबंध फारसे ठीक नाहीयेत, तर अशा वेळी काय करायचं? तुम्ही जणू एखाद्या दरीत कोसळला आहात, तर तिथून वर कसं यायचं?

पहिली गोष्ट, अशा वेळी तुम्हाला करण्याजोग्या बऱ्याच गोष्टी असतील; पण जर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी एकदम समेटण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्हाला जागचं हलावंसं वाटणार नाही.

समजा, तुम्ही तुमच्या खोलीत बसला आहात. ती खोली अतिशय अस्वच्छ झाली आहे. एरवी ती खोली तुमची प्राणप्रिय आहे; पण आता तिथं खाण्याचे पदार्थ जमिनीवर सांडले आहेत...कपड्यांचो बोळे पडले आहेत...सगळं अस्ताव्यस्त झालं आहे...खोलीतला बल्ब गेला आहे...दार मोडलं आहे...आणि त्यात भर म्हणून तुमचा ‘मूड’ गेला असेल, तुम्ही उदास असाल तर अशा वेळी तुम्हाला ‘हे असंच चालणार. माझ्या नशिबी असलंच आयुष्य आहे’ असं वाटेल.

अशा वेळी मी जर तुम्हाला सांगितलं की, ‘एक काम करा. बाकीचं राहू दे, फक्त जमिनीवर हे जे खाण्याचे पदार्थ सांडले आहेत ते उचलून टाका,’ तर तुम्ही म्हणाल, ‘ठीक आहे, टाकतो.’

त्यानंतर जर म्हटलं, ‘चला, फरशी तर स्वच्छ झाली, आता कपड्यांच्या घड्या घाला...एकेक करत...’

यातून मला काय सांगायचं आहे ते लक्षात घ्या. तुमचं आयुष्य या खोलीसारखं अस्ताव्यस्त, अव्यवस्थित झालेलं आहे असं आपण समजू या. अशा वेळी तुम्ही काय करायला हवं?

सर्वप्रथम तुम्ही एक कोरा कागद घ्या किंवा तुम्ही फोन, लॅपटॉप अशा ज्या कुठल्या साधनाचा लिहिण्यासाठी वापर करत असाल ते घ्या आणि त्यावर एक यादी तयार करा...तुमच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींची घडी विस्कटली आहे ते लिहून काढा. ही यादी मोठी होत गेली तरी बिचकू नका, सगळ्या गोष्टी येऊ द्या त्या यादीत.

माझ्याबाबतीत सांगायचं तर मी या अवस्थेतून गेलोय...बऱ्याचदा गेलोय. लोक मला यशस्वी व्यक्ती मानतात; पण मी आयुष्यात किती तरी वेळा, काहीच सुरळीत घडत नाहीये, अशा अवस्थेतून गेलोय. एक उदाहरण सांगतो. मी नोकरी सोडण्याच्या विचारात होतो तेव्हाचा काळ. लोकांना वाटतं की, तो किती शौर्यपूर्ण वगैरे क्षण असेल.. मी नोकरी सोडून लेखक व्हायचं ठरवत होतो; पण खरं सांगायचं तर, तसं अजिबात नव्हतं. त्या वेळी मी व्याकुळ होतो, अतिशय दुःखी होतो. त्या वेळी आयुष्यात पहिल्यांदाच मी ‘थेरपी’ घेत होतो. माझं वजन वाढलं होतं. मी माझ्या कुटुंबालाही आनंद देऊ शकत नव्हतो. मी नोकरी सोडण्याच्या बेतात होतो; पण हा निर्णय स्वीकारायची त्यांच्या मनाची तयारी झाली आहे का ते मला कळत नव्हतं. करिअरच्या बाबतीत सांगायचं, तर ‘बॅंकिंग’मध्ये माझं मन रमत नव्हतं; पण ती माझी नोकरी होती. लेखनाच्या क्षेत्रात काय होईल त्याचा अंदाज येत नव्हता, त्यामुळं लेखनाची भीती वाटत होती...अशा सगळ्या गोंधळात डोकं नुसतं भणाणून गेलं होतं.

हे सगळं खूप काळ चाललं होतं. मी बराच काळ काहीही न करता घालवला...अगदी परिस्थिती हाताबाहेर जाईपर्यंत; पण त्यातून काहीही निष्पन्न होत नसतं.

मग अशा वेळी काय करायचं?

तर अशा वेळी यादी करायला घ्यायची.

नोकरीबाबत काय करायचं याचा निर्णय मला घ्यावा लागला. मला बॅंकेतली नोकरी करायची आहे की नाही? मला लेखक व्हायचं आहे की नाही? माझ्या यादीतलं हे पाहिलं कलम होतं.

पुढचा मुद्दा होता आरोग्याचा. मला त्या दृष्टीनं काहीतरी करावंच लागणार होतं.

मला कशात आनंद मिळणार आहे याबद्दल मला माझ्या कुटुंबाशी बोलावं लागणार होतं.

मी स्वतःला प्राधान्य देणं गरजेचं होतं.

अशा प्रकारे तुम्हालाही तुमची यादी तयार करावी लागेल.

- मी अभ्यासाला लागणं गरजेचं आहे.

- मला वेगवेगळ्या शहरांत जायचं आहे.

- मला आई-वडिलांच्या घरातून बाहेर पडायचं आहे.

- मला माझ्या उपजीविकेची व्यवस्था करायची आहे.

ही यादी पाहिल्यावर तुम्ही म्हणाल, ‘बघा, मी म्हटलंच होतं, केवढी मोठी यादी होईल...’

तुम्हाला थोडं घाबरल्यासारखंही होईल; पण प्रयत्न सोडू नका.

समजा, तुमच्या यादीत एकच कलम आहे (आणि तो प्रश्‍न तुम्हाला सोडवायचा आहे). ते कलम म्हणजे, तुम्हाला नोकरी शोधायची आहे.

आता त्यापुढची पायरी काय असेल?

तुम्हाला हा प्रश्‍न सोडवण्याच्या संपूर्ण ‘प्लॅन’ची गरज नाहीये. तुम्ही फक्त त्यापुढची पायरी काय असेल याचा विचार करा.

ही पायरी काय असू शकेल तर, तुमचा ‘सीव्ही’ तयार करणं, ‘लिंक्‍‍ड् इन’ अकाउंट सुरू करणं, चार-पाच जणांना फोन करणं, व्हॉट्‌सॲप मेसेज करणं इत्यादी. त्यानंतर पायरीकडे वळा...

आता पुढचा मुद्दा. उदाहरणार्थ, माझी तब्येत बिघडतेय. तब्येतीच्या तक्रारी सुरू आहेत. आता त्यापुढची पायरी - मी फिरायला जायला सुरुवात करीन. त्यापुढची पायरी, मी उद्यापासून फिरायला जाईन...

आता त्यापुढचा मुद्दा. उदाहरणार्थ, माझे वडील माझ्यावर सतत ओरडत असतात. त्यांना मी निवडलेलं करिअर पसंत नाहीये.

त्यापुढची पायरी - येत्या वीकेंडला त्यांना ‘काफी शॉप’मध्ये घेऊन जा, त्यांच्याशी बोला...

असं करता करता, तुमच्याकडे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांची यादी व त्यातल्या प्रत्येक मुद्द्यापुढं त्यासंदर्भातील पुढील पायऱ्या असा आराखडा तयार होईल. ज्या क्षणी तुमच्या लक्षात येईल की, गोष्टी तुमच्या ‘कंट्रोल’मध्ये आहेत, या ‘पायऱ्या’ तुमच्या हातात आहेत, त्या क्षणी तुमच्या सगळ्या चिंता-काळज्या कमी होतील.

‘माझ्यासमोर हा प्रश्‍न आहे; पण गोष्टी माझ्या ‘कंट्रोल’मध्ये नाहीत, मी काहीच करू शकत नाही,’ असं वाटणं ही फार मोठी समस्या असते; पण जर तुम्हाला वाटलं की, मी प्रश्‍न सोडवण्याच्या दृष्टीनं काही पावलं टाकू शकतो, तर तुम्हाला हायसं वाटतं. तुमच्या यादीत सात मुद्दे असतील तर हे मुद्दे तुम्हाला घाबरवतात; पण सात मुद्द्यांपुढच्या सात पायऱ्या तुमच्या मनात आशेचा किरण जागवतात.

त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही या सर्वच्या सर्व पायऱ्या पार करण्याचा प्रयत्न करा. या सगळ्या पायऱ्या एकाच दिवसात पूर्ण झाल्या पाहिजेत असं नाही. समजा, तुम्हाला सात पायऱ्या पार करायच्या असतील, तर त्यातल्या तीन पायऱ्या आज पार होतील, तीन दुसऱ्या दिवशी पार होतील.

तुम्ही रोज या सातही मुद्द्यांच्या पुढच्या पायऱ्या पार करायचा प्रयत्न करा. जेव्हा यातली एक पायरी पार होईल तेव्हा त्याच्या पुढची पायरी काय आहे याचा विचार करा - म्हणजे, तुम्ही नोकरीसाठी एखाद्याला मेसेज केला असेल तर त्यापुढची पायरी - त्याला फोन करा. समजा, त्या ठिकाणी तुम्हाला नकार मिळाला, तर त्यापुढची पायरी...

असं करता करता, ही छोटी छोटी पावलं, छोट्या छोट्या पायऱ्या ‘ऍड अप’ होत जातील आणि तुमच्या समस्यांतून मार्ग निघायला सुरुवात होईल, समस्यांची तीव्रता कमी होऊ लागेल. तुमच्या सगळ्या समस्या सुटतील असं नाही; पण तुमची अवस्था पुष्कळ सुधारेल.

हे सगळं काही एका दिवसात साध्य सोईल असं नाही. तुमच्या सात समस्यांपैकी चार समस्या पूर्ण सुटतील, दोन अंशतः सुटतील, एखादी समस्या तशीच उरेल. एक-दोन समस्या नव्यानं निर्माण होतील. दॅट इज लाईफ! पण आता तुम्ही सुधारणेच्या दिशेनं निघालेले असाल, स्वतःला प्राधान्य देत असाल, दरीतून बाहेर निघण्याच्या वाटेवर असाल, तुम्ही स्वतःला ज्या नरकात ढकललेलं असेल, त्यातून बाहेर पडण्याच्या वाटेवर असाल...आणि या सगळ्याची सुरुवात पुढची पायरी पार करण्याद्वारे होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कशा व्हायच्या याची चिंता करत बसू नका. तुमच्यासमोरच्या प्रश्‍नांची यादी तयार करा आणि पुढचं पाऊल उचला...मग त्याच्या त्यापुढचं! टेक केअर!

(सदराचे लेखक हे तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com