ले ले मजा ले!

मी ‘करिअर’ या विषयावर माझ्या व्याख्यानांमध्ये नेहमी बरंच बोलत असतो; पण बाकी आयुष्यात मौज...धमाल... गंमत या गोष्टींचं काय? हे नसेल तर आयुष्यात काही मजा नाही, होय ना? आज आपण याबद्दलच बोलणार आहोत.
Enjoy
EnjoySakal
Summary

मी ‘करिअर’ या विषयावर माझ्या व्याख्यानांमध्ये नेहमी बरंच बोलत असतो; पण बाकी आयुष्यात मौज...धमाल... गंमत या गोष्टींचं काय? हे नसेल तर आयुष्यात काही मजा नाही, होय ना? आज आपण याबद्दलच बोलणार आहोत.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो!

मी ‘करिअर’ या विषयावर माझ्या व्याख्यानांमध्ये नेहमी बरंच बोलत असतो; पण बाकी आयुष्यात मौज...धमाल... गंमत या गोष्टींचं काय? हे नसेल तर आयुष्यात काही मजा नाही, होय ना? आज आपण याबद्दलच बोलणार आहोत.

मी माझ्या ‘मोटिव्हेशनल’ व्याख्यानांमध्ये यश, करिअर याबद्दल खूप काही सांगत असतो...लोकांना अक्षरशः ‘पकवत’ असतो; पण आयुष्यात ‘फन’, ‘मौजमस्ती’ यांचं काय? आयुष्य म्हणजे फक्त काम करत राहणं, यशस्वी होणं एवढंच असतं का?

नक्कीच नाही.

आयुष्यात ‘फन’, मौज, मजा या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. मी पुस्तकं लिहितो ती त्यासाठीच. मी सिनेमे लिहितो ते त्यासाठीच. माझे सिनेमे मनोरंजनासाठीच असतात. मी मनोरंजनक्षेत्रातच आहे. आपल्या आयुष्यात मौजमजेला स्थान असायलाच हवं असं मला वाटतं; पण आपल्याकडे करिअरबद्दलच जास्त बोललं जातं. फक्त काम करत राहा. मेहनत करा, असं सांगितलं जातं. मात्र आयुष्यात मजा, गंमत या गोष्टींनाही स्थान आहे...नक्कीच आहे!

मित्रांनो, मी जेव्हा यश, करिअर या गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा ते एक ‘साधन’ किंवा ‘माध्यम’ असतं, त्यापेक्षाही मोठी असलेली एक गोष्ट साध्य करण्याचं. ती गोष्ट म्हणजे आनंद...खुशी. मला सांगा, तुमच्या आयुष्यात जर आनंद, समाधान नसेल तर तुम्ही मिळवलेल्या यशाचा काय उपयोग आहे?

यश आणि आनंद, समाधान हे समानार्थी शब्द नाहीत. या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मला वाटतं, आयुष्यात यश ही आवश्‍यक गोष्ट आहे, नक्कीच आहे आणि आयुष्यात सुखी होण्यासाठी काही प्रमाणात यश मिळणं गरजेचंही असतं; पण यश म्हणजे सर्वस्व नव्हे. तुम्ही यशस्वी झालात की तुम्ही सुखी-समाधानी होता असं नाही.

त्यामुळेच आपण बऱ्याचदा यशस्वी लोक नाखूश असलेले पाहतो. त्यातले काही जण अमली पदार्थांचा आधार घेताना दिसतात. काही जण निराशाग्रस्त असतात. यावरून लक्षात येईल की यश मिळालं म्हणजे माणूस सुखी होतोच असं नाही.

मात्र, त्याच वेळी आणखी एक मुद्दाही असतो - यश नसेल तर आयुष्यात आनंद फुलणं अवघडच असतं, त्यामुळे आयुष्यात यश मिळणं, काही प्रमाणात तरी मिळणं, गरजेचं असतं आणि आयुष्यात यशाखेरीज इतरही काही गोष्टी महत्त्वाच्या असतात - उत्तम आरोग्य, उत्तम नातेसंबंध अशांसारख्या गोष्टी...आणि त्याजोडीनं आयुष्यात नियमित ‘फन’ असणंही फार आवश्‍यक असतं. नाहीतर आयुष्य किती नीरस, कंटाळवाणं होईल!

तुमच्या आयुष्यात काही गंमतच नसेल, तुम्हाला कसली प्रेरणाच उरली नसेल तर तुम्हाला दीर्घकालीन यश मिळण्यातही अडथळे येतील. असं दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनतही दीर्घ काळ करावी लागते. महिनोन्‌ महिने, वर्षानुवर्षं परिश्रम करावे लागतात; पण जर तुम्ही फक्त काम, काम आणि कामच करत राहिलात, फक्त परिश्रमच करत राहिलात आणि त्यात कसलीही मौज-मजा, धमाल, आनंद नसेल तर तुम्ही ते काम सोडून द्याल. म्हणजे तुम्हाला यशही मिळणार नाही.

आपल्याला असं म्हणता येईल की, आयुष्यात मौज-मजा ही खुशी मिळवण्यासाठी, आयुष्य ‘एन्जॉय’ करण्यासाठी आवश्‍यक आहेच; शिवाय, आपल्याला यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत घेण्यास उद्युक्त करण्यासाठीही ती आवश्‍यक आहे.

अशा प्रकारे ‘फन’, मौज-मजा ही आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट नक्कीच आहे. मी आयुष्यात नेहमी मौज-मजा करण्याचा प्रयत्न करतो. मी आयआयटीमध्ये असतानासुद्धा मजा करायचो. तिथं गेल्यावर बरेच विद्यार्थी फक्त अभ्यास एके अभ्यास करतात...फक्त अभ्यास. तुम्हाला ‘टॉपर’ होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, भरपूर कष्ट घ्यावे लागतात. मीसुद्धा अभ्यास करायचो, भरपूर मेहनत घ्यायचो; पण त्याबरोबरच मजाही करायचो. तुम्ही माझ्या तिथल्या मित्रांना विचारलंत तर ते सांगतील, ‘हो, हा कॉलेजमध्ये असताना मस्त धमाल करायचा!’

मी तिथं असताना तर मजा करायचोच; पण मला माझ्या ‘बॅंकिंग लाईफ’मध्येही मजा करायची असे. बहुधा त्यातूनच माझ्या लेखनाची सुरुवात झाली असावी. त्यादरम्यान मी कॉलेजचे दिवस ‘मिस’ करत होतो. मला त्या दिवसांबद्दल लिहावंसं वाटत होतं...

अशा प्रकारे मी माझ्या आयुष्यात ‘फन’, धमाल, मजा या गोष्टींना कायम स्थान दिलं आहे. कामाच्या बाबतीत सांगायचं तर मी भरपूर मेहनत करतो; पण मी पूर्णतः ‘वर्कोहोलिक’ मात्र नाहीये. कधीकधी मला वाटतं, मी आणखी मेहनत घेतली असती, आणखी काम केलं असतं तर यापेक्षा जास्त यशस्वी झालो असतो; पण आयुष्यात मिळालेल्या यशाच्या आनंदाची चव तर चाखायला हवी ना... ते ‘एन्जॉय’ करायला हवं ना?

आयुष्यात मजासुद्धा करायलाच पाहिजे. त्यामुळे माझं हे नेहमीच धोरण राहिलं आहे. माझ्या मते, आयुष्यात मजा महत्त्वाची असते आणि तुम्हीसुद्धा ती केली पाहिजे; पण मजा करताना दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा - आपल्याला अर्थातच फक्त मौज-मजा करायची नाहीये आणि दुसरं म्हणजे, या मौज-मजेलाही दर्जा, गुणवत्ता म्हणजेच एक ‘क्वालिटी’ असते. लक्षात घ्या, मौज-मजेचे दोन प्रकार असतात - ‘हाय क्वालिटी फन’ आणि ‘लो क्वालिटी फन’, म्हणजेच उच्च गुणवत्ता असलेली मौज-मजा आणि कमी गुणवत्ता असलेली मौज-मजा.

आता, ‘हाय क्वालिटी फन’ म्हणजे काय?

तर अशी मौज-मजा, जिच्यामुळे तुम्ही पूर्णतः ताजेतवाने होता, जिच्यामुळे तुमचं उत्तम पोषण होतं, जी तुम्हाला ‘रिफ्रेश’ झाल्याची जाणीव देते... ‘हां यार, मजे आ गये!’ अशा प्रकारची.

आणि दुसरा प्रकार म्हणजे, ज्यात मजा आली असं वाटतं; पण सरतेशेवटी रितेपणाची भावना येते. उदाहरणच सांगायचं तर, तुम्ही मोबाईलवर असंच ‘स्क्रोल’ करत, निरुद्देश काहीतरी बघत असता...टिकटॉक, इन्स्टा-रील्स वगैरे. यादरम्यान एखाद्या वेळी तुम्हाला हसू येतं. तुम्ही तुम्हाला आवडलेलं एखादं ‘मीम’ तुमच्या मित्रांना ‘फॉरवर्ड’ करता. असेच तीन तास जातात... तुम्हाला रितं रितं वाटू लागतं. यात तुम्हाला ‘मजे’चा ‘फील’ येतो का?

हो, येतो; पण ती ‘लो क्वालिटी फन’ असते!

त्यापेक्षा तुम्ही ‘हाय क्वालिटी फन’ अनुभवा.

‘हाय क्वालिटी फन’ म्हणजे काय?

उदाहरणच सांगायचं तर, वाचन.

तुम्ही पुस्तकं वाचा. अर्थातच, तुम्ही तुम्हाला ज्यात आनंद मिळतो ते साहित्य वाचा. ‘माझी पुस्तकं वाचा’ किंवा ‘अमुक एक वाचा’ असं मी म्हणणार नाही. तुम्ही लेख वाचा, तुम्हाला ज्या विषयात रस असेल अशा विषयावरचं साहित्य वाचा; पण वाचा. ‘स्क्रीन’वर कार्यक्रम पाहण्याऐवजी वाचन करा...भरपूर पुस्तकं वाचा.

आणखी एक गोष्ट करता येईल व ती म्हणजे, पायी फिरायला जा. सोफ्यावर पडून राहण्याऐवजी मस्तपैकी फिरायला जा. भरपूर चाला.

मी काही खूप मोठमोठ्या गोष्टी सांगत नाहीय.

तुम्ही मित्रांमध्ये, इतर लोकांमध्ये मिसळा. त्यांच्याशी परस्परसंवाद घडू द्या. तुम्ही ‘स्क्रीन’वरचा वेळ कमी करा. ते तुमच्या डोळ्यांसाठी व मेंदूसाठीही चांगलं नाही. सध्याच्या कोरोनाकाळात निर्बंधांमुळे ‘ग्रुप ॲक्‍टिव्हिटीज्’ करणं खूप अवघड झालं आहे; पण किमान तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधू शकता.

लोकांना ‘फन’ वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, खाणं! भारतीय लोक खवय्ये असतात आणि छानसं खाणं हा त्यांना मौज-मजेचा महत्त्वाचा भाग वाटत असतो.

यामध्येही पुन्हा ‘हाय क्वालिटी’ आणि ‘लो क्वालिटी’ हा मुद्दा असतोच. तुम्ही काय खाता...‘हाय क्वालिटी’चे पदार्थ खाता की ‘लो क्वालिटी’चे पदार्थ खाता? तुम्ही कधीतरी ‘ट्रीट’ म्हणून हवं ते खाऊ शकता; पण तुम्ही जंक फूड, चिप्स, भुजिया, कोक असे पदार्थ खात-पीत असाल व त्यात तुम्हाला मजा वाटत असेल तर ते मात्र चांगलं नाही. असे पदार्थ तुमच्यासाठी भयंकर ठरतील. अशा खाण्यामुळे तुम्हाला छान, ऊर्जासंपन्न असं कधीही वाटणार नाही. तुम्हाला सुस्तावल्यासारखं होईल. अशा पदार्थांमुळे तुम्हाला काही सेकंदांसाठी छान चव मिळाल्यासारखं वाटेल; पण त्यामुळे मजा वाटणार नाही...ही ‘लो क्वालिटी फन’ आहे अशी तुमची नंतर भावना होईल.

तुम्ही खा; पण चांगलं खा. तुम्ही छानसा ज्यूस प्या. तुम्ही ‘ट्रीट’ म्हणून अधिक आरोग्यदायी पदार्थ खा. पाकीटबंद पदार्थ खाऊ नका. काही महिने पुड्यात बंद असणारे पदार्थ (मग त्यांची जाहिरात कितीही छान असली तरी आणि ते पदार्थ कितीही मसालेदार, ‘चटपटे’ वगैरे असले तरीही) खाणं ही ‘लो क्वालिटी फन’ आहे. हे खाणं मला हितकर वाटत नाही; पण याचा अर्थ, असे पदार्थ कधीच खायचे नाहीत, असा नाही.

मग यात समतोल कसा साधायचा?

तर तुम्ही जी मजा अनुभवणार असाल तीमधील दोन-तृतीयांश गोष्टी तरी ‘हाय क्वालिटी’च्या असायला हव्यात. बाकी, एक-तृतीयांश ‘लो क्वालिटी’च्या चालू शकतील. म्हणजे, या एक-तृतीयांशमध्ये तुम्ही बिछान्यात पडून राहा, फोन बघत बघत चिप्सचा फन्ना उडवा...ठीक आहे; पण हे प्रमाण फक्त एक-तृतीयांश इतकंच मर्यादित असायला हवं. तुम्ही सकाळी उठल्यापासून ७० टक्के वेळ काम करा. उरलेल्या ३० टक्‍क्‍यांमध्ये मजेला स्थान द्या. त्यातसुद्धा २० टक्के ‘हाय क्वालिटी फन’ आणि १० टक्के ‘लो क्वालिटी फन’साठी असं सूत्र ठेवा. हा काही निश्‍चित असा ‘फॉर्म्युला’ वगैरे नाही. मला इतकंच सांगायचं आहे की, आपल्या आयुष्यातला बराचसा वेळ करिअर घडवण्यात आणि यश मिळवण्यात जातो. काही लोक त्यासाठी सगळाच्या सगळा, म्हणजे १०० टक्के, वेळ देतात; पण मला ७० : ३० हे प्रमाण योग्य वाटतं. कामासाठी ७० टक्के वेळ ठेवल्यानंतर उरलेल्या ३० टक्‍क्‍यांमध्ये मौज-मजा करा...त्या वेळात तुम्हाला खरोखर ‘रिफ्रेश’ वाटेल असं काहीतरी करा, निसर्गाच्या सान्निध्यात जा, मित्रांबरोबर छानशा खाण्याचा आस्वाद घ्या, व्यायाम करा, ‘ग्रुप कॉल’ करा, एखाद्या विषयावर चर्चा करा, पुस्तकं वाचा, त्याबद्दल चर्चा करा, ‘बुक-क्‍लब’ स्थापन करा...चांगल्या गोष्टी करा.

यात कधीतरी ‘लो क्वालिटी फन’लाही हरकत नाही. कधी कधी आपल्याला त्या प्रकारची मजासुद्धा अनुभवावीशी वाटते. मीसुद्धा कंटाळा आल्यावर कधी कधी ‘रील्स’ बघतो; पण एकूण विचार केला तर, काम आणि मौज-मजेचं प्रमाण ७० : ३० राखलं तर आणि त्यातसुद्धा ‘हाय क्वालिटी फन’ व ‘लो क्वालिटी फन’चं प्रमाण २०: १० असं राखलं तर उत्तम समतोल साधला जाईल. आयुष्यात तुम्ही यशस्वी व्हाल, मजाही अनुभवाल आणि सुखीही व्हाल.

टेक केअर!

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com