ये मोह मोह के धागे...

आयुष्य आनंदात-समाधानात कसं जगायचं याबद्दल आपण बोलत असतो. माझ्या मते, आनंदी-समाधानी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी आवश्‍यक असतात : उत्तम करिअर, उत्तम आरोग्य व चांगले नातेबंध.
ये मोह मोह के धागे...
Summary

आयुष्य आनंदात-समाधानात कसं जगायचं याबद्दल आपण बोलत असतो. माझ्या मते, आनंदी-समाधानी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी आवश्‍यक असतात : उत्तम करिअर, उत्तम आरोग्य व चांगले नातेबंध.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो!

आयुष्य आनंदात-समाधानात कसं जगायचं याबद्दल आपण बोलत असतो. माझ्या मते, आनंदी-समाधानी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी आवश्‍यक असतात : उत्तम करिअर, उत्तम आरोग्य व चांगले नातेबंध.

आज आपण यांतल्या तिसऱ्या गोष्टीबद्दल म्हणजेच ‘चांगले नातेबंध’ या विषयावर बोलणार आहोत.

नातेबंध ही अशी गोष्ट आहे जी तुमच्यासाठी आवश्‍यक असते; पण हीच गोष्ट तुम्हाला उद्‌ध्वस्तही करू शकते.

नातेबंध वेगवेगळ्या प्रकारचे असतात; पण मुख्यत्वे त्यांची विभागणी तीन प्रकारांत होते : १) तुमचं कुटुंब...हे खूप महत्त्वाचं असतं, २) मित्र...हेही अर्थातच महत्त्वाचे असतात व ३) तुमचे प्रेमबंध... हा सर्वांत महत्त्वाचा नातेबंध असतो असं म्हणता येईल. तुमची गर्लफ्रेंड, किंवा बॉयफ्रेंड, किंवा कदाचित तुम्ही ‘सिंगल’ही असाल; पण कधीतरी आपल्याला कुणीतरी ‘आपलं’ भेटावं असं प्रत्येकाला वाटत असतं. नातेबंधाचे हे तिन्ही प्रकार वेगवेगळे असले तरी हे सर्व मिळून तुमच्या आयुष्यातलं ‘नातेबंध’ हे प्रकरण लिहितात. हे तिन्ही नातेबंध आयुष्यात तुमचं भरण-पोषण करतात, तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात, त्याचबरोबर ते तुम्हाला उद्‌ध्वस्तही करू शकतात. ते कसं ते आपण पाहू या.

मित्रांनो, नातेबंधांमध्ये भावनिक घटक असतात. तिथं कुठलं तर्कशास्त्र कामी येत नाही. करिअरच्या संदर्भात मी तुम्हाला तर्कशुद्ध सल्ला देऊ शकतो. अमक्‍या विषयाचा अभ्यास करा...इतके तास अभ्यास करा...अमुक परीक्षा पास व्हा...अमका ‘जॉब’ स्वीकारा हे सांगू शकतो. आरोग्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगू शकतो, की तुम्ही व्यायाम करा...आहाराचं नियोजन करा; पण नातेबंधांमध्ये तसं सांगता येत नाही. तिथं तर्कशास्त्र प्रत्येक वेळी कामी येईलच असं नाही. आणि ही जी गोष्ट आहे - बिनशर्त प्रेम - ती तर अगदीच दुर्मिळ असते. प्रेम कधीच बिनशर्त नसतं. जास्तीत जास्त तुमचे आई-वडील तेवढे तुमच्यावर बिनशर्त प्रेम करू शकतात. बाकी मात्र इतर कुणाच्याही प्रेमात अटी, अपेक्षा असतातच.

आपल्याला हे नातेबंध का हवे असतात? मुळात त्यांची गरजच काय असते? ज्या लोकांना आपण आवडतो ते लोक, आपल्याला आवडणारे लोक...हे सगळे आपल्याला आपल्या आयुष्यात का हवे असतात? त्याची काय गरज असते? मला वाटतं, आपल्याला नातेबंध हवेहवेसे वाटण्याचं मुख्य कारण म्हणजे, त्यामुळे आपल्याला ‘माणूस’ असल्यासारखं वाटतं. ‘मॅन इज अ सोशल ॲनिमल’ असं म्हटलं जातं. माणूस या प्रजातीची ती गरज असते...कुणाशी तरी बंध जुळवण्याची, कुणाशी तरी जोडलं जाण्याची. आपल्याला प्रेम हवं असतं. अंतिमतः सगळे प्रेमाच्याच शोधात असतात.

मी हा लेख लिहिण्याचं कारणसुद्धा, मला तुमचं प्रेम हवं आहे, हे असू शकेल. आपल्या सर्वांना प्रेम हवं असतं...आपल्याला भावबंध हवे असतात, आधार हवा असतो. आपण ‘सोशल ॲनिमल’ आहोत. तुम्ही आयुष्यात खूप कर्तृत्व गाजवलंत, भरपूर पगार मिळवलात, ‘टॉप’वर पोहोचलात; पण जर तुम्ही एकटे असाल तर त्या यशाला, अशा आयुष्याला काय अर्थ आहे?

त्यामुळे आपल्यासाठी नातेबंध आवश्‍यक असतात असं म्हणावं लागेल. विशेषतः प्रेमबंध. या नातेबंधाइतकं सुंदर दुसरं काहीही नाही असं लोक म्हणतात. या नातेबंधावर किती सिनेमे बनले आहेत, किती कथा लिहिल्या गेल्या आहेत! मीसुद्धा लिहिल्या आहेत. खासकरून तुम्ही प्रेमात पडता तेव्हा सुरुवातीच्या ‘नया नया प्यार’वाल्या काळात तर आपल्याला फार विलक्षण अनुभव येतो! जगातल्या कुठल्याही अनुभवाची त्याच्याशी तुलना होत नाही.

या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला नातेबंध हवेहवेसे वाटतात; पण त्यामध्ये तुमच्या भावना ‘खर्च’ होतात. जेव्हा कुठल्याही गोष्टीशी तुमच्या भावना जोडल्या जातात तेव्हा एक प्रकारे तुमची ऊर्जा खर्च होते. तुम्ही एखादा नातेबंध जोडता तेव्हा त्यात तुमचा विश्‍वासही गुंफला जातो. तुम्ही कुठल्याही प्रकारचं नातं जोडा, त्यात विश्‍वासाचा एक धागा असतोच; पण मनुष्यप्राणी नेहमी त्या विश्‍वासाला पात्र असतोच असं नाही.

त्याचबरोबर नातेबंधासोबत अपेक्षाही येतात. जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा वाईट वाटतं. कधी समोरचा माणूस तुमच्या अपेक्षा पूर्ण करत नाही, तर कधी तुम्ही एखाद्याच्या अपेक्षा पूर्ण करत नाही. अशा वेळी माणसाला नैराश्‍य येतं, दुःख होतं, प्रेरणा हरवते. नातेबंध माणसाला कितीही हवेहवेसे वाटत असले, तरी ते तुम्हाला खाली खेचू शकतात.

मग हे नातेबंध चांगले म्हणायचे की वाईट?

ते दोन्ही असतात - चांगलेही आणि वाईटही.

मला सांगा, अन्न चांगलं की वाईट?

ते आपल्यासाठी चांगलंच असतं; पण जर तुम्ही ते प्रमाणाबाहेर चापत असाल तर ते चांगलं नाही.

झोपणं चांगलं की वाईट?

तुम्हाला जेवढी आवश्‍यक आहे तेवढी झोप तुमच्यासाठी चांगली आहे; पण जर तुम्ही जास्त झोपत असाल तर ते अपायकारक ठरेल. नातेबंधाचंही असंच असतं - ते चांगलेही असतात, तसेच ते वाईटही ठरू शकतात. त्यांमध्ये समतोल साधणं, ते मर्यादेत ठेवणं फार महत्त्वाचं असतं. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, आयुष्यात पुढं जायचं असेल, करिअर घडवायचं असेल तर तुम्हाला नातेबंधांचा समतोल साधण्याची युक्ती माहीत असणं आवश्‍यक आहे...योग्य समतोल साधण्याची.

त्यासाठी तुम्हाला ‘जास्त’ म्हणजे किती हे ठरवावं लागेल. प्रेमात तुम्ही एकटेच जीव टाकत आहात... लोकांसाठी एकतर्फी काही करत आहात, करतच राहत आहात...पण त्याची कुणाला कदरच नाही अशी अवस्था असेल तर हा समतोल कुठंतरी बिघडतोय असं म्हणावं लागेल. याचा काही ‘फॉर्म्युला’ वगैरे नसतो. म्हणजे तुम्ही या नात्यासाठी अमुक इतका वेळ द्या, असं सांगता येणार नाही. या गोष्टी माणूस चुकांमधून शिकत असतो. प्रत्येक माणसाची ‘सिस्टिम’ वेगळी असते, त्याचे प्राधान्याचे विषय वेगळे असतात. तुम्ही चुकता-धडपडता-शिकता...

पण या सगळ्यात तुम्ही स्वतःला प्रथम प्राधान्य द्या. नातेबंध हे अर्थातच महत्त्वाचे असतात; पण त्याआधी तुम्ही स्वतःचा विचार करा. स्वतःला प्रथम-प्राधान्य द्या. मला आनंदी व्हायचं आहे अशी धारणा ठेवा. मला सगळ्या जगाला खूश ठेवायचं आहे...मला माझ्या माणसांना खूश ठेवायचं आहे...मित्र, कुटुंबीय, गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड सगळ्यासगळ्यांना खूश ठेवायचं आहे हे ठीक आहे...पण त्याआधी तुम्ही स्वतःचा विचार करा, स्वतःची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या आनंदाचा विचार करा. तुम्ही स्वतः आनंदी-समाधानी नसाल, तर तुम्ही दुसऱ्यालाही आनंदी करू शकत नाही.

नातेबंधांचा समतोल राखताना मी खूश आहे की नाही हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. नातेबंधांमध्ये हे जे ‘जीव ओवाळून टाकणं’ वगैरे असतं ना... ‘मर मिटना’ वगैरे त्यामुळे अनेकांची आयुष्यं उद्‌ध्वस्त झाली आहेत. आपण ऐकतो की, भावांसाठी काही बहिणी त्यांच्या वाटणीच्या मालमत्तेवर पाणी सोडतात. हे ‘मर मिटना’ लैला-मजनूवालं नसतं; पण हे त्यांनी नातेबंधासाठी केलेलं असतं. मात्र, त्यांना जे आर्थिक स्थैर्य लाभू शकलं असतं ते त्यामुळे त्या गमावतात. काहीजण ‘मी अमुक व्यक्तीला सोडून जाऊ शकत नाही’ असं म्हणून आपल्या करिअरची वाट बंद करून घेतात.

आयुष्याच्या प्रवासात हे योग्य ठरत नाही. मी असं म्हणत नाही, की तुम्ही फक्त स्वतःपुरतं पाहा...हिमालयातल्या एकाकी साधूसारखे बना...माझा जगाशी काहीएक संबंध नाहीये अशी धारणा बाळगा...नाही, असं अजिबात नाही.

नातेबंध भावनिक असतात, खूप रोमांचक असतात; पण ते धबधब्यासारखे असतात. त्याखाली भिजणं अर्थातच आनंददायी असतं; पण तिथून तुमचा पाय जरासा जरी घसरला की तुम्ही खाली कोसळून कपाळमोक्ष नक्की असतो.

नातेबंधांचंही असंच असतं. ते तुम्ही धबधब्यासारखे ‘एंजॉय’ करा. तुमचे मित्र, तुमचे आई-वडील...अशा साऱ्यांसाठी काही करण्याचा आनंद जरूर घ्या. त्यांच्यासोबत ‘एंजॉय’ करा, त्यांना वेळ द्या; पण त्यासाठी तुमची ध्येये, तुमचं सुख पणाला लावू नका. ज्या क्षणी ते घडेल, त्या क्षणी तुमचा तोल जाईल आणि हे नातेबंध तुम्हाला उद्‌ध्वस्त करतील.

कारण, याला काही सीमाच नसते. तुम्ही लोकांसाठी खपत असाल, तर ती चांगली गोष्ट आहे; पण तुम्हाला कधी कुणी असं म्हणणार नाहीये, की ‘हो, हो, तू माझ्यासाठी खूप काही केलंस. आता पुरे हं.’

उलट ते म्हणतील, ‘व्वा! छान! आणखी कर...’, ‘हा माझ्यासाठी किती करतो!’ असं म्हणतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी खपत राहाल; पण या सगळ्यात तुमच्या आयुष्याचं काय?

म्हणून तुम्ही इतरांसाठी नव्हे, तर स्वतःसाठी जगा. जेव्हा तुम्ही आनंदी व्हाल, आयुष्यात समाधानी असाल, तेव्हा तुम्ही इतरांसाठी थोडंफार करू शकाल; पण आधी स्वतःचा विचार करा.

मित्रांनो, नातेबंधांनी तुम्हाला कधी दुःख दिलं आहे किंवा उद्‌ध्वस्त केलं आहे का? त्यांनी तुमच्या आयुष्यातले सहा महिने गिळून टाकले आहेत का? ब्रेकअपनंतर तुमचं आयुष्य पूर्ववत् व्हायला वर्षभर लागलं आहे का?

मी माझ्या ‘गर्ल इन रूम नं. १०५’ या पुस्तकात याबद्दल लिहिलं आहे. खरं तर ही ‘मर्डर मिस्ट्री’ आहे; पण मी तिला ‘अनलव्ह स्टोरी’ म्हणतो. कारण, त्यातला हीरो ‘लव्ह’ कसं करायचं हे तर शिकतोच; पण तो ‘अनलव्ह’ कसं करायचं हेही शिकतो. एवढंच नव्हे तर तो, कुणावरही प्रमाणाबाहेर प्रेम करू नये हेही शिकतो.

तुम्हीही जसं ‘लव्ह’ करायला शिकलं पाहिजे, तसंच ‘अनलव्ह’ करायलाही शिकलं पाहिजे. नातेबंध रोमांचक असतात; पण आयुष्यात त्यांचा समतोल हरवला तर ते तुम्हाला उद्‌ध्वस्त करू शकतात हे लक्षात ठेवा.

(सदराचे लेखक हे तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com