अपने लिए जिओ ना...

तुम्हाला एक सांगतो, आयुष्यात लोकांना ‘इम्प्रेस’ करणं बंद करा. मी ही गोष्ट शिकलोय, चुका करत करत शिकलोय.
Friendship
FriendshipSakal
Summary

तुम्हाला एक सांगतो, आयुष्यात लोकांना ‘इम्प्रेस’ करणं बंद करा. मी ही गोष्ट शिकलोय, चुका करत करत शिकलोय.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो!

तुम्हाला एक सांगतो, आयुष्यात लोकांना ‘इम्प्रेस’ करणं बंद करा. मी ही गोष्ट शिकलोय, चुका करत करत शिकलोय. एक घोडचूक आपण सगळेच करत असतो, ती म्हणजे आपण लोकांना ‘इम्प्रेस’ करायचा प्रयत्न करणं...म्हणजेच, लोकांकडून शिक्कामोर्तब करून घेणं... एक ‘व्हॅलिडेशन’ अगदी आपण कुणाला ‘इम्प्रेस’ करायला गेलो नाही तरी आपल्याला वाटत असतं की लोकांनी म्हणावं, ‘अरे हां! याचं बरोबर आहे. हा ‘सही बंदा’ आहे. हा योग्यच वागतोय. हा चांगला माणूस आहे...‘कमाल का’ माणूस आहे...विशेषतः मुलांच्या बाबतीत सांगायचं तर मुलांना वाटत असतं की, हा मुलगा किती चांगला आहे, असं मुलींनी म्हणावं...व्हॉट अ मॅन...कूल गाय!’

तशी आपल्याला ही स्तुती मुलांकडूनही हवीच असते; पण विरुद्धलिंगी व्यक्तीकडून ती आपल्याला अधिक हवी असते. मुलींच्या बाबतीतही हे असंच असतं. ‘तू छान दिसतीयेस...तू हुशार आहेस, अभ्यासात तुझी छान प्रगती आहे....’ असं कुणीतरी म्हणावं असं त्यांनाही वाटत असतं.

‘तुझं करिअर छान आहे...तुझी नोकरी चांगली आहे...तुझी सोशल मीडियावरची फीड्स मस्तच असतात...’ असं कुणीतरी म्हणावं असं आपल्याला वाटत असतं. आपल्यामुळे लोक ‘इम्प्रेस’ व्हावेत, त्यांनी आपली स्तुती करावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते आणि जेव्हा आपल्याला लोकांकडून ही पसंतीची पावती - तिला ‘ॲप्रूव्हल’ म्हणा, ‘व्हॅलिडेशन’ म्हणा, ‘इम्प्रेस होणं’ म्हणा किंवा ‘स्तुती’ म्हणा - मिळते, तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं. आपल्याला आपल्या आयुष्याचं सार्थक झालं असं वाटतं.

आपल्या घरी पाहुणे येतात. आपण त्यांच्यासाठी स्वयंपाक करतो तेव्हा आपल्याला पाहुण्यांनी ‘अरे वा! छान झालंय,’ असं म्हणावं असं वाटत असतं.

‘तुमचं घर खूप सुंदर आहे...तुम्ही संगळं किती प्रेमानं करता...तुमचं कुटुंब किती छान आहे...तुमची मुलं किती चांगली आहेत...’ असं इतर लोकांनी म्हणावं अशी आपली इच्छा असते.

करिअरच्या आघाडीवरसुद्धा आपल्याला वाटत असतं की, ऑफिसमध्ये लोकांनी म्हणावं, ‘हा माणूस चांगला आहे...याला काम चांगलं जमतं.’ पण तुम्हाला सांगू का, हे सगळं अगदी बकवास असतं. मी आयुष्यातली अनेक वर्षे खर्ची घालून हे वास्तव शिकलो आहे.

जर तुम्ही हा लेख नीट वाचून, तो समजून घेतलात तर कदाचित तुमच्या आयुष्यातली काही वर्षे तरी वाचू शकतील. वाया जाणार नाहीत. तुम्ही आयुष्यात जे काही करत असाल ते स्वतःसाठीच करा. आता तुम्ही म्हणाल की, हे सगळं मी स्वतःसाठीच तर करतोय. प्रगती करतोय ती स्वतःसाठी करतोय...अभ्यास करतोय तो स्वतःसाठी करतोय...पण समजा, तुम्ही एखाद्या प्रवेशपरीक्षेची तयारी करत आहात आणि तुम्ही असा विचार करत असाल की, माझे आई-बाबा माझ्यावर खूष असले पाहिजेत किंवा तुम्हाला नोकरीत चांगल्या पदावर पोहोचायचं आहे व भक्कम पगारावर मिळवायचा आहे; कारण, शेजारच्या गुप्ताजींनी म्हणावं की ‘अरे वा! शर्माजी के बेटे ने तो कमाल कर दिया लाईफ में!’ किंवा समजा, तुम्हाला वाटत असेल की, आपण जिमला जावं व शरीरसौष्ठव प्राप्त करावं, म्हणजे मी कॉलेजला किंवा ऑफिसला जाईन तेव्हा मुली मागं वळून बघतील आणि म्हणतील, ‘अरे वा! इस ने तो बॉडी बदल ली...!’

तुमच्या मनात असे विचार असतील तर ते अगदी स्वाभाविक आहेत. आपल्या प्रगतीची लोकांनी दखल घ्यावी असं वाटण्यात गैर काय आहे (खरं तर, आपण प्रगती करत असल्याचा हा पुरावाच असतो) असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण, याचा अर्थ तुम्ही इतरांसाठीच जगत आहात. हां...आता काहीच न करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी करत आहात, हे खूपच चांगलं म्हणता येई; पण जर ते करण्यामागे लोकांना खूश करणं, त्यांचं ‘व्हॅलिडेशन’ मिळवणं हा मूलभूत उद्देश असेल तर तो योग्य नाही.

कारण, यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्देश कधीही गवसणार नाही...जे आयुष्य जगण्यासाठी तुम्ही घडलेला आहात तसं आयुष्य तुम्ही कधीही जगू शकणार नाही; पण आपण सगळेजण हेच करत असतो. आपण असं का वागतो? (आणि आपण असं वागतोय हे आपल्याला कळतही नाही.)

मी आयआयटीला का गेलो होतो कोण जाणे! आपल्याला चांगली नोकरी मिळेल, उत्तम कॉलेजमध्ये चांगली डिग्री घेता येईल अशीच धारणा असणार हे नक्की; पण त्यामागं कुठं तरी नक्कीच हाही विचार असेल की, मी माझ्या कुटुंबाला इम्‍प्रेस करू शकेन...आईला खूश करून शकेन, माझ्या भावंडांना - आते-मामे-चुलत वगैरे - खूश करू शकेन...

एक उदाहरण सांगतो, माझी पुस्तकं बाजारात आली. मी खूप भाग्यवान आहे. माझी पुस्तकं देशभर सर्वत्र वाचली जातात. रेल्वे स्टेशनवर छोट्या छोट्या गावांपासून ते मेट्रो सिटीजपर्यंत सगळीकडे माझी पुस्तकं वाचली जातात, त्याचा मला बराच फायदाही झाला आहे. भारतात लोक लेखकांची नावं घेताना पहिल्यांदा माझं नाव घेतील; पण त्याचा एक विचित्र परिणाम असा आहे की, आपल्याकडचा जो उच्चभ्रू बुद्धिवंत गट आहे (बौद्धिकदृष्ट्या उच्चभ्रू...आर्थिकदृष्ट्या किंवा इतर कोणत्या बाबतीत नव्हे), जो स्वतःला जास्त शिकलेला वगैरे मानतो, त्या लोकांची माझ्या लेखनाबद्दल किंवा माझ्याबद्दल कायम ‘अरे, हा लेखकच नाहीये...‘मीम्स’ आहे’ असं म्हटलंय, किंवा ‘अरे, तू ‘चेतन भगत’ वाचतोस, काय फालतू आहेस!’ अशी धारणा आहे.

आजपर्यंत एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली नाही व ती म्हणजे, लेखकाचं काम काय असतं? लोकांपर्यंत पोहोचणं हे त्याचं काम असतं की नाही? माझं लेखन जर साधं-सोपं नसतं तर ते लोकांपर्यंत पोहोचू शकलं असतं का? आणि मी माझ्या लेखनाद्वारे लोकांपर्यंत पोहोचलो हा माझा अपराध आहे का?

सुरुवातीला मला लोक हसत होते; पण आता मला या गोष्टीनं अजिबातच फरक पडत नाही. आता मी सत्तेचाळीस वर्षांचा आहे; पण सुरुवातीला, माझं पहिलं पुस्तक आलं तेव्हा मी फक्त एकोणतीस वर्षांचा होतो. त्या वयात तुमची आयडेंटिटी तितकी तयार झालेली नसते. तुमच्यात पुरेसा आत्मविश्वास नसतो. त्या वेळी मला वाटायचं, ‘यार, मला यांना इम्प्रेस करायचं आहे...एक दिवस मी असं पुस्तक लिहीन की हेच इंटलेक्चुअल एलिट्स म्हणतील की, चेतन चांगला आहे.’

यात मी बरीच वर्षे फुकट घालवली, त्यांच्याकडून मान्यतेची मोहोर मिळवण्यासाठी काय काय करत राहिलो. का...मी हे सगळं कशासाठी करत होतो?

तीन-चार वर्षांपूर्वी मला कळून चुकलं की या सगळ्यात काहीही अर्थ नाही. मी लोकांना- इंटलेक्चुअल एलिट्सना - इम्प्रेस करण्यात आयुष्यातला बराच वेळ घालवला; पण आता माझे डोळे उघडले. मला यातली निरर्थकता कळली.

माझ्याकडून फक्त एवढीच चूक झाली असं नाही, माझ्याकडून आणखीही काही चुका झाल्या. मी जेव्हा लेखनासाठी माझं बॅंकिंग करिअर सोडलं तेव्हा माझ्या मनात यायचं, माझे सगळे बॅचमेट्स अजूनही बॅंकेत आहेत (बॅंक म्हणजे, आम्ही सगळेजण इन्व्हेस्टमेंट बॅंकिंगमध्ये होतो) ते भरपूर पैसे कमावत आहेत. तिथं असताना मीही भरपूर कमावत होतो; पण मी ते क्षेत्र सोडलं आणि त्या वेळी मला अर्थातच लेखनात इतके पैसे मिळत नव्हते. तेव्हा मला वाटायचं, ‘मला पैसा मिळवायचा आहे...मला दाखवून द्यायचं आहे की, मी हे क्षेत्र सोडलं असलं तरी मी भरपूर पैसे मिळवू शकतो.’

ही अगदी चुकीची विचारसरणी आहे.

सर्जनशील प्रोफेशनमध्ये तुम्ही असं करू शकत नाही.. तिथं पैसा पैसा करून चालत नाही. पैसाच मिळवायचा असेल तर मी रिअल इस्टेटच्या व्यवसायात उतरायला हवं होतं. आयआयटीचे कोचिंग क्लासेस सुरू करायला हवे होते. या सगळ्यात कदाचित जास्त पैसा मिळाला असता; पण मी तसं केलं नाही. मी निवडलेल्या क्षेत्रात प्रचंड काम सुरू केलं. मी खूप व्याख्यानं द्यायचो. तो माझ्या आयुष्यातला अत्यंत ताणयुक्त काळ होता. मी वर्षभरात पन्नासेक शहरांत व्याख्यानांसाठी जायचो. त्यात माझे शंभर-दीडशे दिवस जात असत. ती व्याख्यानं देणं माझ्यासाठी आनंददायी असायचं; पण या दगदगीचा माझ्या तब्येतीवर परिणाम झाला. माझं वजन वाढलं. हे सगळं नक्कीच चांगलं नव्हतं; कारण, मी हे माझ्या काल्पनिक बॅचमेट्सना इम्प्रेस करण्यासाठी...मीही कुणी आहे, मीही पैसे कमवू शकतो हे दाखवण्यासाठी करत होतो.

काही वर्षांपूर्वी माझ्या लक्षात आलं की मी हे काय करतोय...? आणि मग मी स्वतःसाठी जगायला सुरुवात केली. आता मी स्वतःसाठी जगतो. माझ्या पद्धतीनं काम करतो. मला जेव्हा लिहावंसं वाटतं तेव्हा लिहितो. मी काम करतो, भरपूर काम करतो. मी स्वतःसाठी जगतो म्हणजे दिवसभर आराम करतो असा अर्थ नाही. आता मी जे काही करतो, ते अगदी मनापासून...दिल से करतो. त्यात कुणाला इम्प्रेस करणं हा विचार नसतो.

तुम्ही जर नातेवाईक, गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड, मित्र, नवरा/बायको, सासू-सासरे यांना इम्‍प्रेस करण्यासाठी जगत असाल तर आयुष्य व्यर्थ आहे. मला हे उमगायला दहा वर्षे लागली. मीही मित्रांना इम्प्रेस करण्यासाठी धडपडायचो...पण त्यांना काय फरक पडतो? ते आपापल्या नोकरीत छान आहेत. मी मात्र विनाकारण माझ्या आयुष्यातला वेळ वाया घालवला. आणि, हे सगळे लोक इम्प्रेस वगैरे मुळीच होत नाहीत. तुम्ही ज्यासाठी धडपडता हे व्हॅलिडेशन तुम्हाला मिळत नाही, त्यामुळे तुम्ही जे कराल ते स्वतःसाठी करा.

तुमचं आयुष्यात ध्येय काय आहे, तुम्ही कशासाठी जगत आहात हे लक्षात घ्या. लोकांनी ‘यू आर द मॅन’ म्हणावं यासाठी काहीही करू नका. त्याऐवजी ‘बी द मॅन जस्ट बी!’

तुम्हाला जिमला जायचं असेल तर स्वतःसाठी जा, डाएट करायचं असेल तर स्वतःसाठी करा...शेजारची मोनिका बघेल यासाठी करू नका. जे करायचं ते स्वतःसाठी करा. बाकी, मोनिकाबिनिका सगळं आपोआप होईल. तुम्ही स्वतःसाठी ठरवलेल्या मार्गावरून पुढं जात राहा, लोक आपोआप भेटत जातील, तुम्ही अशा प्रकारे वाटचाल जेव्हा सुरू कराल तेव्हा तुम्ही वेळेचा खऱ्या अर्थानं सदुपयोग कराल. ज्या गोष्टींनी तुम्हाला फरक पडतो, ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यासाठी तुम्ही वेळ द्याल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अधिक आनंदी व्हाल. तुम्ही लोकांना इम्प्रेस करण्याच्या मागं लागलात तर तुमचा आनंदाचा स्तर खाली घसरेल. त्यामुळे आजपासून लोकांना इम्प्रेस करणं बंद करा... बस्, स्वतःसाठी जगा.

टेक केअर!

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com