...सेहत के लिए तू तो हानिकारक है!

एक चॅलेंज आहे. स्वीकारणार? तुमचा मोबाईल-फोन घ्या. त्यावर ‘स्क्रीन-टाईम’ ॲप उघडा. त्यात ‘स्क्रीन-टाईम’ किंवा ‘फोन-यूज’मध्ये जाऊन तुमचा सरासरी ‘स्क्रीन-टाईम’ किती आहे.
Screen Time App
Screen Time AppSakal
Summary

एक चॅलेंज आहे. स्वीकारणार? तुमचा मोबाईल-फोन घ्या. त्यावर ‘स्क्रीन-टाईम’ ॲप उघडा. त्यात ‘स्क्रीन-टाईम’ किंवा ‘फोन-यूज’मध्ये जाऊन तुमचा सरासरी ‘स्क्रीन-टाईम’ किती आहे.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो!

एक चॅलेंज आहे. स्वीकारणार? तुमचा मोबाईल-फोन घ्या. त्यावर ‘स्क्रीन-टाईम’ ॲप उघडा. त्यात ‘स्क्रीन-टाईम’ किंवा ‘फोन-यूज’मध्ये जाऊन तुमचा सरासरी ‘स्क्रीन-टाईम’ किती आहे, म्हणजेच तुम्ही किती वेळ मोबाईल वापरता, ते बघा.

चला, मी माझा ‘स्क्रीन-टाईम’ किती आहे ते बघतो. मी काही अभिमानानं वगैरे सांगत नाहीये; पण माझा ‘स्क्रीन-टाईम’ चांगला भरपूर आहे... पाच तास. आता माझ्या मोबाईलवर हा आकडा दिसतोय. म्हणजे मी दिवसातले पाच तास फोन वापरत असतो. झोपेच्या वेळात मी अर्थातच मोबाईल बघत नाही; पण माझ्या जागेपणीच्या वेळातले पाच तास फोनवर जातात...इतका वेळ माझे डोळे फोनच्या स्क्रीनला चिकटलेले असतात.

हिंमत असेल तर हे ‘चॅलेंज’ स्वीकारा!

तुम्ही तुमचा ‘स्क्रीन-टाईम’ असाच अंदाजे सांगू नका. तुम्ही किती वेळ फोन वापरता हे तुमचा फोन सांगेल.

माझे दररोज मोबाईलवर पाच तास खर्च होतात. मी मुख्यत्वे व्हॉट्‌सॲप, यूट्यूब आणि ब्राऊजर ही ‘ॲप्स’ वापरतो. माझ्या मोबाईलवापराचं मी समर्थन करू शकतो - माझ्यासाठी व तुमच्यासाठीही. मी व्हॉट्‌सॲपवर कॉल करतो, लोकांशी बोलतो. माझ्या कामाशी संबंधित बोलणंही व्हॉट्‌सॲपवरच होतं. शिवाय, सध्या मी यूट्यूबवर व्हिडिओ करतोय, त्यामुळे मला ते तर पाहावंच लागतं. तसं मी ‘अपलोड’ करणं वगैरे गोष्टी लॅपटॉपवरून करतो, तरी मला यूट्यूबसाठी मोबाईल पाहावाच लागतो. अरे हो! मी लॅपटॉपवरचा वेळ विसरलोच! माझा फक्त मोबाईल-फोनवर पाच तास वेळ खर्च होतो. त्यात लॅपटॉपवरचा वेळ मिळवला तर.... बाप रे... माझा स्क्रीन-टाईम खूपच जास्त आहे हे लक्षात आलं. म्हणजेच, इतके तास मी ‘स्क्रीन’समोर असतो.

दिवसाला चोवीस तास असतात. त्यातले आठ तास तुम्ही झोपता. आंघोळ, आवरून तयार होणं, नाश्‍ता-जेवण यासाठी दोन तास. या अपरिहार्य गोष्टी असतात. अगदी मूलभूत. म्हणजे, चोवीस तासांतले दहा तास गेले. उरलेल्या चौदा तासांपैकी तुमचे पाच तास जर ‘स्क्रीन-टाईम’सारख्या गोष्टीत खर्च होत असतील (जसे माझे होत आहेत) तर ते भयंकर आहे. याचा अर्थ आयुष्याचे तीन भाग केले तर, त्यातला एक भाग म्हणजे, एक-तृतीयांश आयुष्य यामध्ये खर्च होत आहे.

आणि समजा तुमचा ‘स्क्रीन-टाईम’ याहीपेक्षा जास्त असेल (बऱ्याच तरुणांचा पाच तासांपेक्षा जास्त वेळ यात खर्च होतो हे मला माहीत आहे. सात, आठ, नऊच काय, यावर दिवसातले दहा तास खर्च करणारे लोकसुद्धा आहेत!) तर ते कबूल करा. तुम्ही ते नाही कबूल केलं तरी मला ते माहीत आहे. याचाच अर्थ, काही जणांच्या बाबतीत त्यांचा जागेपणीचा निम्मा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ या गोष्टीत खर्च होतो.

आता कदाचित तुमचे ‘झूम’ क्‍लासेस असतील, शाळा-कॉलेजचे ‘ऑनलाइन’ क्‍लासेस असतील तर ती गोष्ट वेगळी. अशा वेळी तुम्ही ‘वीकेंड’ला म्हणजे शनिवार-रविवारी तुमचा ‘स्क्रीन-टाईम’ किती असतो ते पाहा. त्यावरून तुम्हाला तुमचा किती वेळ ‘स्क्रीन’समोर जातो ते कळेल.

मग यावर उपाय काय? मोबाईल-फोन फेकून द्यायचा? तो तर आपण फेकून देऊ शकत नाही. सध्या त्यावर मुलांचे क्‍लासेस होतात. त्यावर ‘मॅप’ लावून तुम्ही रस्ता शोधता. ऑनलाइन ऑर्डर देता, उबर/ ओला यासाठीही तुम्हाला मोबाईल लागतो, त्यामुळे मोबाईल-फोन फेकून देणं हे काही आपल्याला शक्‍य नाही. आपण त्याच्यापासून पूर्ण सुटका करून घेऊ शकत नाही. कारण, मोबाईल-फोन ही आता आपली गरज आहे; पण त्यावर दिवसाचे पाच पाच तास घालवणं हे अती आहे आणि हा वेळ काही एकदाच खर्च होतो किंवा आठवड्याभरात एवढा वेळ खर्च होतो असं नाहीये. हा एवढा वेळ रोज खर्च होतो...हे माझं स्वगत चाललंय; पण हे सगळं तुम्हालाही लागू होतं.

तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला वेळ आवश्‍यक असतो. तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर, तुम्हाला काम करायचं असेल तर, अभ्यास करायचा असेल तर, सर्जनशील काही करायचं असेल तर, तुम्हाला चार लोकांत मिसळायचं असेल तर, एवढंच काय पण; तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर...या सगळ्यासाठी वेळ आवश्‍यक असतो आणि जर तुमच्यापाशी (या चौदा तासांतून पाच तास वजा केल्यावर उरणारे) नऊच तास उरले तर इतक्‍या सगळ्या गोष्टींसाठी हा वेळ खूप अपुरा आहे. खासकरून, कुठलं मोठं ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीनं. एवढ्या वेळात तुमचा व्यायामही होईल, निवांतपणही अनुभवता येईल, अभ्यासही होईल, मोठमोठ्या परीक्षांची तयारीही होईल... हे शक्‍य नाही. तुम्ही वेळेचं व्यवस्थापन कितीही उत्तमरीत्या करा, कितीही चांगले ‘मोटिव्हेशनल व्हिडिओ’ बघा, जर तुम्ही रोज तुमच्या आयुष्यातला इतका वेळ अक्षरशः उचलून फेकून देत असाल, तर तुम्ही आयुष्यात फार मोठं काही करू शकणार नाही.

जर अशी अवस्था असेल तर काही तरी करायला हवं. काही तरी मार्ग काढायलाच हवा. ते अतिशय गरजेचं आहे. ‘स्क्रीन’वर तुमचा जो वेळ खर्च होत असेल त्यावर तुम्ही मर्यादा आणायला हवी. हा वेळ पन्नास टक्‍क्‍यांनी कमी करणं हे तुम्ही ध्येय ठेवा. आता माझा हा वेळ पाच तास आहे; तो अडीच तासांवर आणणं हे माझं ध्येय आहे. हे लगेच एका दिवसात साध्य होणार नाही.

तुम्ही असा प्रयत्न केलात तर तो अपयशी ठरेल आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी अवस्था होईल. त्यामुळे तुम्ही हा वेळ एकदम कमी न करता तो दर आठवड्याला १० टक्‍क्‍यांनी कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवा. जर तुमचा ‘स्क्रीन-टाईम’ ८ तास असेल तर तो ७.२ वर आणा. त्याच्या पुढच्या आठवड्यात तो ६.४ वर आणा. जर तुमचा ‘स्क्रीन-टाईम’ पाच तास असेल तर पुढच्या आठवड्यात तो ४.५ वर आणा...अशा प्रकारे दर आठवड्यात हा वेळ १०-११ टक्‍क्‍यांनी कमी करत करत ५० टक्‍क्‍यांवर पोहोचा. यादरम्यान तुम्ही सर्वाधिक वापरली जाणारी ॲप्स बघा. तुमचा वेळ कशात जास्त खर्च होतोय हे तुमच्या लक्षात येईल. त्यात कुठं कात्री लावली तर चालू शकेल हे तुमच्या लक्षात येईल. काही फोनमध्ये तर तुम्ही मर्यादाही आखून घेऊ शकता. अमुक ॲप अमुक वेळापेक्षा जास्त वापरता येणार नाही अशा प्रकारची; पण याबाबतीत तुम्हाला मनोमन निर्धार करावा लागेल. हा मोबाईल-फोन तुमचं आयुष्य अक्षरशः ‘सक्’ करतोय...संपवतोय आणि तेसुद्धा तुमच्या आयुष्यातील सर्वांत कार्यक्षम काळात...ज्या काळात तुमच्या हातून काही तरी चांगलं घडू शकेल अशा काळात. तुमच्यापैकी बरेच जण तरुण आहेत. आयुष्यातला हा सर्वांत ‘प्रॉडक्‍टिव्ह’ काळ गमावणं तुम्हाला परवडणारं नाही. यामध्ये तुमचा वेळ तर वाया जातोच; शिवाय, यावर ज्या ‘ॲक्‍टिव्हिटीज्’ होतात - म्हणजे रील्स, छोटे छोटे व्हिडिओ, इकडच्या तिकडच्या फालतू गोष्टी हे सगळं तुमच्या मेंदूची वाट लावतं. त्याचा तल्लखपणा हरवतो, तो बोथट होतो... थोडक्‍यात ‘दिमाग का भरता बन जाता है’! तुमच्या मेंदूवर जर या गोष्टी अविरतपणे धाडधाड आदळत राहिल्या तर दुसरं काय होणार?

मग तुमचा उत्साह पूर्णतः हरवतो. तुम्हाला एक कंटाळवाणी भावना घेरून टाकते. आपण दिवसभर जागचं हललेलो नाही, तरीही शीण आलाय असं वाटतं. तुम्ही प्रत्यक्ष जरी काही केलेलं नसलं तरी तुमच्या मेंदूवर माहितीचे घणावर घण अव्याहत पडत असतात. त्यामुळे ‘दिमाग का भरता’ होतो आणि तुम्ही थकून जाता. हे काही चांगलं नाही.

जसं धूम्रपान आयुष्य कमी करतं - एक सिगारेट ओढली की आयुष्य पाच मिनिटांनी कमी होतं असं म्हणतात (याचं मोजमाप कसं करतात कोण जाणे, पण असं म्हणतात). सिगारेटच्या पाकिटावर तर ‘चेतावनी’ दिलेली असते -‘धूम्रपान करू नका, त्यामुळे कर्करोग होऊ शकतो.’ लहान मुलांनी धूम्रपान करण्याचा तर विषयच नाही. ड्रग्ज् अवैधच आहेत. त्यांचं सेवन कुणीच करू शकत नाही. त्यामुळेही तुमचं आयुष्य कमी होतं. त्यावर निर्बंध आहेत.

पण ‘स्क्रीन टाईम’मुळेसुद्धा तुमचं आयुष्य कमी होतं. त्यामुळे तुमचं आयुष्य वाया जातं. यासाठी तुम्ही आयुष्यातला एक-तृतीयांश वेळ देता. त्यासाठी तुम्हाला कुणी ‘चेतावनी’ देत नाही किंवा त्यावर कसले निर्बंध नसतात. तुम्ही मोबाईल खिशात घेऊन फिरू शकता, लहान मुलंसुद्धा तो बरोबर बाळगू शकतात, यावर कशी मर्यादा आणायची?

यावरचा उपाय म्हणजे स्वतःवर ताबा...आत्मसंयम...स्वतःच स्वतःला मर्यादा घालणं... स्वतःच स्वतःवर निर्बंध घालणं.

समजा, तुमच्या घरी स्वयंपाकघरात आत्ता पाच-दहा किलो साखर असेल; मग इतकी साखर आहे म्हणून काही तुम्ही दिवसभर साखरेचे तोबरे भरत नाही. ‘चला खाऊ या, चला खाऊ या’ असं म्हणून तुम्ही साखर खात सुटत नाही. का बरं? कारण तुम्हाला माहीत आहे की, साखर कितीही मधुर असली तरी ती तुमच्या तब्येतीसाठी चांगली नाही. साखर छान लागतीय म्हणून तुम्ही ती दुधात घातली...कणकेत घातली असं करत नाही. तिच्या वापराचं काहीतरी प्रमाण ठेवता. तसंच ‘स्क्रीन-टाईम’, ‘फोन-टाईम’ यालाही काहीतरी प्रमाण ठेवलं पाहिजे. त्याचा अतिरेक आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे.

त्यामुळे, तुम्ही हे ‘स्क्रीन टाईम चॅलेंज’ स्वीकारा. आपण दर आठवड्यात किती तास ‘स्क्रीन’समोर घालवतो हे प्रामाणिकपणे बघा. जर तुम्ही हे केलंत तरच काही बदल घडू शकेल. हे ‘चॅलेंज’ स्वीकारण्यासाठी धाडस पाहिजे. ते धाडस दाखवा. हे सोपं नाहीये; पण ते करा आणि स्वतःचं आयुष्य सावरा. टेक केअर!

(सदराचे लेखक हे तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com