‘तेरा इमोशनल अत्याचार...!’

माणसानं किती भावनाशील असावं? याबाबतीतली एक थिअरी अशी असते की, भावनाशील वगैरे अजिबात राहू नका...पूर्णतः तर्कशुद्ध राहा.
Chetan Bhagat writes on  what human role in Emotional atrocities
Chetan Bhagat writes on what human role in Emotional atrocitiessakal

- चेतन भगत

माणसानं किती भावनाशील असावं? याबाबतीतली एक थिअरी अशी असते की, भावनाशील वगैरे अजिबात राहू नका...पूर्णतः तर्कशुद्ध राहा. आपला नफा-नुकसान याबाबतीत दक्ष राहा. भावनिक वगैरे होऊ नका. फक्त आपल्यापुरतं बघा. व्यवहारी दृष्टिकोन ठेवा. जगण्याची ही पद्धत अत्यंत चांगली असते. कारण, भावनाशीलतेमुळे तुमच्या वाट्याला फक्त दुःखच येतं...त्यामुळे तुमचं मन दुखावलं जातं.

ही थिअरी योग्यच आहे. भावनाशीलता हे दुःखाचं कारण असतंच...बरोबरच आहे. ‘जब दिल टूटता है’ तेव्हा त्याच्याइतकी वेदना दुसऱ्या कशानंही होत नाही असं म्हणतात. समजा, अगदी तुमचं ‘दिलबिल टूटलं’ नाही; पण एखाद्या मित्रानं तुमचं मन दुखावलं किंवा एखादी छोटीशी गोष्ट घडली, एखाद्यानं तुमच्या मेसेजला उत्तर दिलं नाही, एखाद्या मित्रानं डिनर ठेवलं; पण त्यानं तुम्हाला बोलावलं नाही...असं काहीही. अशा कुठल्याही गोष्टीनं तुमचं मन दुखावलं जातं. काही वेळा तुम्ही काही माणसं गमावता...काही वेळा ते तुम्हाला कायमचे सोडून जातात, अशा वेळी खरंच खूप दुःख होतं.

भावना अक्षरशः तुमच्या मेंदूचा ताबा घेऊ शकतात. मग अशा वेळी प्रश्न पडतो, माणसानं कितपत भावनाशील असलं पाहिजे? माणसानं भावनिक असू नये असं माझं म्हणणं नाहीये...म्हणजे सगळ्या भावना वगैरे झुगारून द्या, अगदी कठोर-दगडी बना असं मी सांगत नाहीये. ही काही जगण्याची पद्धत नाही...कारण, मूलतः आपण भावनाशील प्राणी आहोत.

आपल्या हार्डवेअरमध्ये...आपलं जे फर्मवेअर आहे त्यामध्ये, भावना ‘बसवलेल्या’ आहेत. तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीच्या बळावर भावना बाजूला सारू शकता. ‘मी कुठल्याही नातेसंबंधात भावनिक होणार नाही,’ असं स्वतःला बजावू शकता; पण असं करत असताना तुम्ही तुमच्या हार्डवेअरशी लढत असता...सॉफ्टवेअरशीही लढत असता. तुम्ही तुमच्या डोक्यात कॉम्प्युटर-प्रोग्रॅम लिहिता की, मी भावनांना बळी पडणार नाही; पण तुमचं हार्डवेअर तुम्हाला सांगत असतं की, तुला भावना असल्याच पाहिजेत. आता सॉफ्टवेअरच्या मदतीनं हार्डवेअरवर मात करता येऊ शकते; पण त्यासाठी खूप मेहनत लागते.

माझ्या हेही लक्षात आलं आहे की, काही लोक जास्त भावनाशील असतात. आयुष्यात भावनांना महत्त्व द्यायचंच नाही असं करता येत नाही. तुम्ही अशा प्रकारे जगू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, भावनिकतेमुळं तुम्हाला दुःख होत असलं तरी त्यामुळे तुम्हाला खूप आनंदही मिळतो, तुम्हाला दुसऱ्या कशानंही इतकी खुशी मिळत नाही ही अगदी खरी गोष्ट आहे... ऑनेस्ट ट्रूथ.

मला अशी बरीच माणसं माहीत आहेत, जी यशस्वी आहेत, सुप्रसिद्ध आहेत, गडगंज पैसेवाली आहेत; पण ‘ॲट द एंड ऑफ द डे’ ही माणसं जेव्हा त्यांच्या मित्रमंडळींसोबत, कुटुंबीयांसोबत, त्यांच्या प्रियजनांसोबत असतात तेव्हा सर्वाधिक आनंदी असतात हे मी पाहिलं आहे. जेव्हा ही माणसं त्यांच्या जिवलगांसोबत ‘सेलिब्रेट’ करत असतात तेव्हा ती अत्यंत खूश असतात. कारण, त्यात भावना गुंतलेल्या असतात. मी कधी असा श्रीमंत माणूस पाहिलेला नाही (कदाचित अशी काही माणसं असतीलही) की जो अगदी एकटाच एन्जॉय करतोय, त्याच्याकडे असलेल्या गोष्टींसोबत एन्जॉय करतोय. तुमच्याबरोबर आणखी लोक असतात तेव्हाच तुम्हाला या गोष्टींचा आनंद घेता येतो. तुम्ही एकटे एन्जॉय करू शकता, नाही असं नाही. सध्या मी स्वतःची सोबत एन्जॉय करतो; पण त्याचं कारण मी लेखक आहे हे आहे. मला एकटं असताना चिंतन करता येतं, कल्पना सुचतात; पण जेव्हा मी काहीतरी ‘सेलिब्रेट’ करत असतो त्या वेळी मला माझं कुटुंब, मित्रमंडळी हवी असतात. मला जवळचे लोक हवे असतात. माझे या सगळ्यांशी भावबंध जुळलेले आहेत.

मग मी भावनाशील आहे का? नाही. आता तितका नाही. पूर्वी मी खूपच भावनाशील होतो. आता तितका राहिलो नाही; पण ‘कोण होतास तू...काय झालास तू...’ असं वाटण्याइतका ‘दगडी’ही झालेलो नाही. मला वाटतं, तुम्ही याबाबतीत एक सीमारेषा आखून घ्यायला हवी आणि भावनांवर नियंत्रण ठेवायला हवं. कारण, या भावना तुम्हाला उद्‍ध्वस्त करू शकतात; पण याचा अर्थ, तुम्ही सगळ्या भाव-भावना एका पेटीत घालून कुलूप लावा आणि किल्ली कुठं तरी फेकून द्या, असा नाही. आपल्याला असं करायचं नाहीये. आयुष्यातून भावना काढूनच टाकायच्या नाहीयेत. आयुष्यात भावना गरजेच्या असतात; कारण, त्या आनंदाचा खूप मोठा स्रोत असतात आणि आयुष्य भरभरून जगण्यासाठी असतं, एन्जॉय करण्यासाठी असतं, त्यासाठी भावना गरजेच्या असतात. जेव्हा आम्ही एखादा सिनेमा तयार करतो किंवा मी एखादी कथा लिहितो तेव्हा माझ्या मनात नेहमी विचार असतो की, लोक जेव्हा हे वाचतील तेव्हा ते याच्याशी भावनिकदृष्ट्या ‘कनेक्ट’ होतील का?

माझ्या ‘फोर हंड्रेड डेज्’ या पुस्तकात एक आई तिच्या हरवलेल्या लहान मुलीला शोधत असते. या कथासूत्राशी कुणीही ‘कनेक्ट’ होऊ शकेल. एखाद्याचं मूल हरवलं तर त्याची अवस्था काय होत असेल हे कुणीही समजू शकेल. त्यामुळे अशी कथा मनाला भिडते. जर मी कथेला भावनांचा स्पर्श घडवला नाही तर ती कथा वाचकांच्या मनाला भिडणार नाही. केशव हा डिटेक्टिव्ह तिच्या मुलीला शोधण्याच्या कामगिरीवर असतो; पण त्याला तिच्याबद्दल आकर्षण वाटू लागतं. त्याच्या मनात तिच्याबद्दल भावना निर्माण होतात...यामुळे ही कथा शंभरपट अधिक इंटरेस्टिंग होते. हीच कथा जर तर्कशुद्धपणे मांडली...म्हणजे तुम्ही या मुलीचा कशा प्रकारे शोध घेता, ‘क्लू’ कसे मिळवता...अशा प्रकारे सगळं तर्कशुद्ध...तर्कशुद्ध मांडत गेलं तर ते ‘चेतन भगत बुक’ असणार नाही...ती कथा भावपूर्ण बनणार नाही...‘सुपरहिट’ होणार नाही. कारण, त्या कथेला भावनेचा स्पर्श असणार नाही.

भावना आवश्यकच असतात; पण भावनांमुळे तुमचं आयुष्यच उद्‍ध्वस्त होईल, इतकंही स्थान त्यांना आयुष्यात देऊ नका. मग तुमच्या आयुष्यात भावनांचं स्थान किती असावं? तर हे प्रत्येकानं आपापलं ठरवायचं असतं. हे ठरवण्याचा एक साधा नियम आहे - या भावनांचा तुम्हाला उपयोग होतोय की त्यामुळे तुम्हाला अपाय होतोय हे लक्षात घेणं.

आता हे कसं ओळखायचं?

तुम्ही आयुष्यात जी ध्येयं ठरवली आहेत त्या दिशेनं तुमची वाटचाल सुरू आहे का? जर तुमच्या आयुष्यात भावनांनाही स्थान असेल आणि तुमची तुमच्या ध्येयाच्या दिशेनं वाटचालही सुरू असेल तर तुमच्या भावना व्यवस्थित नियंत्रणात आहेत, असं म्हणता येईल; पण जर तुम्ही इतके भावनाविवश होत असाल की, तुमची तुमच्या ध्येयांच्या दिशेनं वाटचालच होत नाहीये, (आणि ही ध्येयं तुम्ही स्वतःच ठरवलेली असतात...तुमच्या ‘तर्कशुद्ध मेंदू’नं ठरवलेली असतात!) तर मात्र समस्या निर्माण होतील.

समजा, तुमची टेस्ट आहे म्हणून तुम्ही अभ्यास करायचं ठरवलं आहे; पण तुमचे मित्र म्हणतात, ‘अभ्यास गेला उडत...चल सिनेमाला जाऊ या.’ आणि तुम्ही भावनिकदृष्ट्या इतके कमजोर आहात की, तुम्ही अभ्यास करायचं सोडून त्यांच्यासोबत सिनेमाला जाता...

पहिली गोष्ट म्हणजे, तुमचा हा निर्णय सर्वस्वी चुकीचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे, हे सगळं भावविवशतेमुळे घडतंय. आता या भावना तुमचं आयुष्य चालवू लागल्या आहेत. हे असं घडू देऊ नका. तुमच्या आयुष्याची सूत्रं भावनांच्या हाती देऊ नका.

समजा, तुम्ही विमानातून निघाला आहात, तिथं वैमानिकाच्या मदतीला सहवैमानिक असतो. तो वैमानिकाला उत्तम प्रकारे मदत करू शकतो; पण आयुष्यात भावना सहवैमानिक होऊ शकत नाहीत. त्या तुम्हाला नेऊ शकतात; पण आयुष्याचं विमान योग्य दिशेनं जाण्यासाठी ‘तर्कशुद्ध पायलट’चीच गरज असते.

भावना या आयुष्यातील संगीतासारख्या असतात; पण जर हे संगीत तुम्ही ‘फुल व्हॉल्यूम’वर लावलंत तर तुम्हाला घरात काम करणं शक्य होईल का? अर्थातच नाही.

तुम्ही अशा प्रकारे विचार करून बघा. जर आयुष्यात तुमची ध्येयं साध्य होत असतील तर भावनांना स्थान देता येईल. त्या तुमची मनःस्थिती प्रफुल्लित करतात. हा ‘प्रवास’ सुखकर करतात हे खरंच आहे!

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड यांनी एकमेकांना भेटण्याच्या बाबतीत असंच असतं. तुम्ही तुमच्या ध्येयमार्गावर योग्य प्रकारे राहून, नंतर तिला-त्याला भेटत असाल तर ठीक आहे...फाईन, पण जर तुम्हाला जिमला जायचं असताना, ती-तो नाराज होईल म्हणून तुम्ही जिमला दांडी मारत असाल तर ते योग्य नाही. इथं भावना तुमचं आयुष्य चालवत आहेत, असंच म्हणावं लागेल. त्यामुळे यादरम्यानची सीमारेषा निश्चित करा. भावना म्हणजेच सर्वस्व...प्यार में मर जाना...मिट जाना...इतकंही बरं नव्हे. यामध्ये संतुलन राखा.

भावना हा आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतो; पण तो तुमच्या ध्येयांच्या आड येण्याइतका प्रबळ होऊ देऊ नका.टेक केअर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com