'मैं तो खुद से प्यार जताऊं'

स्वतःवर प्रेम करणं या विषयावर इतकं चर्वितचर्वण झालेलं आहे, की या विषयावर कुणी काही सांगू लागलं की लोकांना वाटतं...आता पुन्हा आणखी एक लेख...पुन्हा तेच तेच...सेल्फ-लव्ह, सेल्फ-केअर वगैरे वगैरे...
'मैं तो खुद से प्यार जताऊं'
Summary

स्वतःवर प्रेम करणं या विषयावर इतकं चर्वितचर्वण झालेलं आहे, की या विषयावर कुणी काही सांगू लागलं की लोकांना वाटतं...आता पुन्हा आणखी एक लेख...पुन्हा तेच तेच...सेल्फ-लव्ह, सेल्फ-केअर वगैरे वगैरे...

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

‘साधं-सोपं-सहज’ हे तीन शब्द लिहायला-म्हणायला खूप सोपे आहेत...पण या त्रयीची अंमलबजावणी खूप कठीण...हा कठीणपणाच दूर सारून ही त्रयी आपल्या रोजच्या जगण्यात कशी आणता येईल ते कधी हलक्याफुलक्या शैलीत, कधी हसत-खेळत, कधी तत्त्वज्ञानाची जराशी डूब देत या सदरातून जाणून घेणार आहोत.

नमस्कार मित्रांनो!

स्वतःवर प्रेम कसं करायचं याबद्दल आज आपण बोलू या.

स्वतःवर प्रेम करणं या विषयावर इतकं चर्वितचर्वण झालेलं आहे, की या विषयावर कुणी काही सांगू लागलं की लोकांना वाटतं...आता पुन्हा आणखी एक लेख...पुन्हा तेच तेच...सेल्फ-लव्ह, सेल्फ-केअर वगैरे वगैरे...पण स्वतःवर प्रेम करायचं याचा अर्थ काय, त्यासाठी आपण नेमकं काय करायचं, ‘स्वतःवर प्रेम’ ही गोष्ट नेमकी काय असते हेच बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. ‘शीला की जवानी’ या गाण्यात ओळ आहे बघा ‘मैं तो खुद से प्यार जताऊँ...’ तसं काही असतं का हे? लोकांच्या मनात याबद्दल गोंधळ असतो.

हा विषय खरोखर खूप महत्त्वाचा आहे. मी गेली पंधरा वर्षं अनेक ‘मोटिव्हेशनल’ व्याख्यानं दिली आहेत. यासंदर्भात अनेक व्हिडिओ तयार केले आहेत. या विषयाचा बराच अभ्यास केला आहे. लोकांमध्ये प्रेरणा कशामुळे जागते याचं निरीक्षण केलं आहे व कोणत्या गोष्टी त्यासाठी मारक ठरतात हेही अभ्यासलं आहे. या सगळ्यादरम्यान माझ्या असं लक्षात आलं, की तुम्ही आयुष्य जगत असताना स्वतःवर प्रेम करता का हा मुद्दा विचारात घेणं अतिशय महत्त्वाचं व आवश्‍यक आहे.

स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं? आपण स्वतःचा एखादा फोटो घेऊन तो प्रेमभरानं कुरवाळायचा, त्याचे पापे घ्यायचे? किंवा आरशात स्वतःकडेच पाहून ‘मेरी जान...किती छान!’ असं म्हणायचं? आपण असं करतो का?

अर्थातच नाही.

हे तुम्ही इतर कुणाच्या बाबतीत किंवा तुमच्या गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडच्या बाबतीत करू शकता; पण स्वतःच्या बाबतीत असं कुणी करत नाही.

‘स्वतःवर प्रेम करणं’ या संकल्पनेवर आधारलेल्या बऱ्याच ‘स्लोगन’ आहेत. ‘जब वी मेट’मधल्यासारखं ‘मैं अपनी फेवरेट हूँ’ यासारख्या; पण मूळ मुद्दा उरतोच - स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं?

माझ्याबाबतीत सांगायचं तर आधी मी स्वतःवर प्रेम करत नव्हतो. मला ‘मी’ आवडत नव्हतो. मी तुम्हाला विचारलं, की तुम्ही स्वतःवर प्रेम करता का, तर कदाचित तुम्हीही गोंधळून जाल. मी तुम्हाला विचारलं, ‘तुम्हाला’ ‘तुम्ही’ आवडता का?’ तर तुमच्यापैकी काहीजण ‘हो’ असं उत्तर देतील आणि काही जण चक्क ‘नाही’ किंवा ‘माहीत नाही’ असं उत्तर देतील.

आणखी एक प्रश्‍न विचारतो, ‘समजा तुम्ही कुणी दुसरी व्यक्ती आहात, तर तुम्ही तुम्हाला ‘डेट’ कराल का?’

तुम्ही या प्रश्‍नाचं प्रामाणिकपणे उत्तर दिलंत तर तुम्ही म्हणाल, ‘कदाचित करेन...मे बी.’

तुम्ही असंही म्हणाल, ‘मला त्यापेक्षा चांगली व्यक्ती भेटू शकते...नक्की सांगता येणार नाही...’

पण ‘मी ‘मलाच’ डेट करेन, माझ्यापेक्षा चांगलं कुणी असूच शकत नाही. आय ॲम सो कूल...आय ॲम सो फन...सो नाईस, त्यामुळे मी स्वतःलाच डेट करीन ना!’ असं उत्तर येत नाही.

मी या मुद्द्याचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं, की ‘मी नक्कीच ‘मला’च डेट करीन’ असं उत्तर न येण्याचं कारण म्हणजे, आपल्याला असं उत्तर द्यायला कधी कुणी उद्युक्त केलेलं नसतं. आपल्याला नेहमी सांगितलं जातं, की ‘तुम्ही इतरांवर प्रेम करा. तुम्ही इतरांसाठी काही तरी करा. तुम्हाला इतरांकडून पसंतीची पावती मिळायला हवी. तुम्ही चांगले आहात की नाही हे तुम्हाला बाकीचे लोक सांगतील.’

माझ्याबाबतीत हे घडलेलं आहे. हे सर्वांच्याच बाबतीत घडतं; पण स्त्रियांच्या बाबतीत हे जास्त प्रमाणात घडतं. त्या इतरांसाठी खूप काही करत आलेल्या असतात. एकेकाळी मी इतरांकडून मान्यता...त्यांची पसंती मिळवण्यासाठी अतिशय आग्रही असायचो. लोकांना मी आवडावो, ‘मी चांगला आहे’ असं त्यांनी म्हणावं, प्रेम करण्याजोगा आहे असं म्हणावं असं मला आत्यंतिकतेनं वाटायचं. माझे वाचक, माझे श्रोते, कुटुंबीय, मित्रपरिवार या सगळ्यांनी ‘मी चांगला आहे’ असं म्हणावं अशी माझी इच्छा असे आणि माझ्यासाठी ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट होती. त्यामुळे माझ्या दृष्टीनं त्यांना प्रथम प्राधान्य असे...

‘मी स्वतः’ हा माझ्या प्रथम प्राधान्याचा विषय नव्हता. बऱ्याच लोकांचं आयुष्य अशाच प्रकारे जातं. तुमचं आयुष्यही अशाच प्रकारे सुरू असेल...तुम्हीही इतरांसाठी जगत असाल, सगळं इतरांसाठी करत असाल. आयुष्य इतरांसाठीच जगायचं असतं, असं आपण ऐकत आलेलो असतो. आपण समाजात ही कल्पना ‘सेलिब्रेट’ करत असतो, की आई-वडील म्हणजेच सर्वस्व...बहीण-भाऊ म्हणजेच सर्वस्व...पत्नी म्हणजेच सर्वस्व...नवरा म्हणजेच सर्वस्व... आणि आईसाठी तिची मुलं म्हणजे तिचं सर्वस्व असतंच असतं.

यामध्ये तुम्ही कुठं असता...? कुठंच नाही...! तुम्ही कुणीच नसता. तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ नसतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवंय याला काडीचं महत्त्व नसतं. तुमची काय स्वप्नं आहेत याला महत्त्व नसतं; पण तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी, सुखी-समाधानी आहात का हा प्रश्‍न जराही महत्त्वाचा नाही का? त्याला काहीही अर्थ नाही का?

आपण इतरांसाठी जगलं पाहिजे हे बरोबर आहे; पण जर तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नसलात तर तुम्ही इतरांसाठी जगू शकाल का, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे आणि त्याचं उत्तर आहे - ‘नाही.’

जर तुम्ही स्वतः आनंदी नसाल, सुखी-समाधानी नसाल तर तुम्ही इतर लोकांना आनंद देऊ शकत नाही. मी नोकरी सोडणार होतो, त्यादरम्यान मी एका थेरपिस्टकडे गेलो होतो.

ते मला म्हणाले होते, ‘आधी तुम्ही तुमचा ऑक्‍सिजन-मास्क लावा. मग इतरांचा ऑक्‍सिजन-मास्क लावा.’

विमानप्रवासादरम्यान जर काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर एक नियम असतो - सर्वप्रथम स्वतःचा ऑक्‍सिजन-मास्क लावा आणि मग कुटुंबाचा....

हे किती योग्य आहे पाहा...कारण, जर तुम्हाला स्वतःलाच श्‍वासोच्छ्वास घेता आला नाही तर तुम्ही तुमच्या कुटुंबाचं संरक्षण कसं काय करणार? त्यामुळे तुम्ही इतरांसाठी जरूर जगा; पण त्याआधी तुम्ही स्वतःसाठी जगलं पाहिजे. मित्रांनो, खरंच सांगतो, तुमच्या मदतीला कुणीही येणार नाही...तुमच्या मदतीला कुणीही येत नाही.

‘अरे, तू खूश दिसत नाहीयेस. चल, मी तुला खूश करतो,’ असं म्हणून कुणीही तुमच्या मदतीला येत नाही. जे कुणी तुमच्या मदतीला येतात त्यांचीही मदत वरवरचीच असते. कारण, त्यांना स्वतःचं आयुष्य असतं. ते तुमच्यासाठी किती करू शकणार?

तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचं आहे, तुम्हाला आनंदात जगायचं आहे, तुम्हाला आरोग्यसंपन्न व्हायचं आहे.

मी माझ्या व्याख्यानांत नेहमी सांगतो, ‘तुम्ही आयुष्यात तीन गोष्टींचा मुख्यत्वे विचार करायला हवा - करिअर, आरोग्य आणि नातेसंबंध. या तिन्ही आघाड्यांवर जे काही करायचं आहे ते तुम्हालाच करावं लागणार आहे. तुम्ही स्वतःला प्रथम प्राधान्य देणं आवश्‍यक आहे. तुम्ही ते करायलाच हवं. लोक म्हणतील, ‘आमच्यासाठी तुझ्याकडे वेळच नाहीये.’

तर ‘हो, नाहीये वेळ. मी त्यांना वेळ देण्याचा प्रयत्न करीन; पण सर्वांत आधी मी ‘माझा’ विचार करीन.

काही जण म्हणतील, ‘हा फारसं खात नाही. हा अमुक खात नाही, तमुक खात नाही. मग पार्टी कशी करायची?’

म्हणू देत.

लोक म्हणतील, ‘तुझे इतके उद्योग सुरू असतात, तुला व्हिडिओ करायचे असतात, व्यायाम करायचा असतो, तुला तुझी कामं करायची असतात, तुला आमच्यासाठी वेळ नसतो.’

ओके...म्हणा खुशाल! मी काय करू? मी स्वतःसाठी जगू इच्छितो. तसंच तुम्हीही स्वतःसाठी जगावं असं मला वाटतं. तुम्हाला आयुष्यात काही साध्य करायचं असेल, कुठली ‘मंझिल’ गाठायची असेल तर तुम्हाला ‘स्वार्थी’ व्हावंच लागेल आणि मी याला स्वार्थीपणा असंही म्हणणार नाही. कारण, जर तुम्ही सर्वांत आधी स्वतःला ऑक्‍सिजन-मास्क लावलात तर त्याला स्वार्थीपणा कसं म्हणायचं?

‘तो बघा, किती स्वार्थी माणूस आहे, श्‍वास घेतोय बघा!’ असं कुणी म्हणू शकेल का?

तुमच्या इच्छा-आकांक्षा, तुमचं सुख महत्त्वाचं नाहीये का?

आयुष्यात ज्या गोष्टी मिळवता यायला हव्यात त्या मिळवाव्यात असं तुम्हाला मनापासून वाटतं, त्याला काही महत्त्व नाहीये...? की फक्त तुमची नाती महत्त्वाची आहेत? तुमचे लोक, तुमचा बॉस, तुमची कंपनी, सगळं जग तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे; पण तुम्ही स्वतःच तुमच्यासाठी महत्त्वाचे नाही?

आपल्याला जगण्यासाठी जसा श्‍वास आवश्यक असतो, अशाच प्रकारे आपली स्वप्नं, आपल्या इच्छा-आकांक्षा का आवश्‍यक वाटत नाहीत? या गोष्टीही प्राणवायूइतक्‍याच महत्त्वाच्या व अत्यावश्‍यक नाहीत का? तुम्ही जर आधी स्वतःचा विचार केलात आणि त्यानंतर इतरांचा विचार केलात तर ते चुकीचं आहे का? तुम्ही स्वतःला प्रथम प्राधान्य देणं गैर आहे का?

आपण चूक-बरोबर हा मुद्दा बाजूला ठेवू या; पण मी अशा प्रकारे जगतो. तुम्हाला आयुष्यात आनंदी, सुखी, समाधानी व्हायचं असेल तर कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर तुम्हाला हे अनुसरावंच लागेल. मी तुम्हाला प्रेरित करू शकतो...चला, उठा. आळशीपणा करू नका. फोन बाजूला ठेवून द्या. फोनच्या आहारी जाऊ नका,’ अशा प्रकारच्या व्यावहारिक ‘टिप्स’ देऊ शकतो; पण मुळात तुम्ही स्वतःवर प्रेम करणं आवश्‍यक आहे.

तुम्ही स्वतःला सांगायला हवं, ‘हे बघ, मला ‘मी’ खूप आवडतो. हा ‘मी’ मला व्यवस्थित जपायचा आहे. मला त्याला नीट सांभाळायचं आहे, त्याची देखभाल करायची आहे, तो ‘डिमांडिंग’ आहे. त्याला काही गोष्टी लागतात, त्या गोष्टी मी त्याला देणार आणि मगच बाकीच्यांकडं वळणार. सर्वात आधी मी ‘माझा’ आहे. मी बाकीच्यांचाही आहे; पण सर्वप्रथम मी ‘माझा’ आहे. माझं स्वतःवर प्रेम आहे.’

ही भावना, ही जाणीव म्हणजेच स्वतःवर प्रेम करणं! मी खास आहे. अद्भुत आहे. अमेझिंग...! आणि मला माझी काळजी घ्यायलाच हवी ही जाणीव महत्त्वाची आहे.

पूर्वी मी जेव्हा स्वतःचा विचार करत नसे, स्वतःला जपत नसे, तेव्हा मी सुखी नसायचो. हा लेख वाचणाऱ्या तुमच्यापैकी अनेक जणांना हा विचार जवळचा वाटला असेल, हे तुमच्याच मनातल्या विचारांचं प्रतिबिंब वाटलं असेल. तुम्ही आजवर लोकांसाठी खूप काही करत आला असाल, अजूनही करत असाल; पण लोकांना त्याची कदर नसते. ते स्वतःच्या आयुष्यात मश्गुल असतात. अशा लोकांसाठी तुम्ही धावून धावून करत राहणं हे समुद्रात पाणी ओतण्यासारखं असतं. समुद्र इतका मोठा असतो की त्या पाण्यानं त्याला काहीही फरक पडत नाही. तो म्हणेल, ‘मला एका बादलीनं काय फरक पडतो...ओत, आणखी ओत...’

पण तीच एक बादली तुम्ही तुमच्या आयुष्यात ओतलीत तर मात्र तुमच्या दृष्टीनं खूप फरक पडेल. तुमचं आयुष्य सुधारेल. त्यामुळे तुम्ही स्वतःला प्रथम प्राधान्य द्या. स्वतःची काळजी घ्या...स्वतःवर प्रेम करा.

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com