मुलांना पुस्तकांकडे वळवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Children spend most of their time on internet and social media Turn children to read books

सतत कुणा ना कुणाशी आभासी देवाण-घेवाण करत राहणं हेच जगणं होऊन गेलंय.

मुलांना पुस्तकांकडे वळवा!

- डॉ. अनिल राजवंशी

आजकाल मुलांचा बराचसा वेळ इंटरनेटवर आणि समाजमाध्यमांवरच व्यतीत होत आहे. आपल्यासमोर ही एक मोठीच समस्या होऊन बसली आहे. सतत कुणा ना कुणाशी आभासी देवाण-घेवाण करत राहणं हेच जगणं होऊन गेलंय.

दुचाकीवरून जाताना, कार चालवताना, अगदी रस्त्यावरून चालत जातानाही मुलं मोबाईल बघतच असतात. तत्पर प्रतिसाद आणि अविरत संवादसुख लाभलं नाही तर त्यांच्या जिवाची तगमग होते. पाण्याबाहेर काढलेले मासेच जणू!

समाजमाध्यमांवर चालू राहणाऱ्या या अखंड आंतरक्रियांमुळे प्रत्येकाची चिंतन आणि मनन करण्याची सवय मोडू लागली आहे. विद्यार्थी प्रामुख्यानं आता केवळ प्रतिक्रिया देऊ लागलेत. अशी प्रतिक्रियासज्जता महत्त्वाच्या बाबींवर तडकाफडकी निर्णय घ्यायला उपयोगी पडते खरी;

परंतु त्यामागं सखोल विचार नसल्यानं त्यातून अखेरीस भय आणि चिंताच वाट्याला येते. हे भय आणि चिंता व्यक्तीचा आयुष्यभर पिच्छा पुरवते. त्यातून मानसिक गुंते तयार होतात आणि मनावर न मिटणारे व्रण उमटतात.

खरं म्हणजे, अशी कथात्म पुस्तकं वाचत असताना बऱ्याचदा एक चित्रपटच आपल्या मनात सुरू होतो. वाचन हा मुलांची एकाग्रता वाढवण्याचा आणि त्यांची वैचारिक क्षमता प्रबळ करण्याचा सर्वोत्तम उपाय होय.

शाळेत मुलांना चांगली चांगली रंजक पुस्तकं वाचायला लावली पाहिजेत. त्यासाठी शाळेच्या वाचनालयात अशी पुस्तकं उपलब्ध करून द्यायला हवीत. शालेय कामकाजाच्या कालावधीत मोबाईल फोनच्या वापराला सक्त मनाई करायला हवी. शाळेत रोजच्या रोज काही काळ नियमित वाचन केल्यामुळे मुलांना हळूहळू वाचनाचा छंद लागू शकेल.

अनेक मुलं इंटरनेटवर पुस्तकं वाचतात; परंतु असं वाचन डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं आणि त्यातून चिंतनप्रक्रियेलाही फारशी चालना मिळत नाही. आपण वाचत असताना आपलं लक्ष विचलित करणाऱ्या इतरही बऱ्याच गोष्टी इंटरनेटवर येत राहतात.

एकाग्रचित्तानं करावयाच्या वाचनात अशा गोष्टी व्यत्यय आणतात. खरंखुरं पुस्तक वाचताना आपण विनाव्यत्यय सलग वाचू शकतो. म्हणून प्रत्यक्ष पुस्तक वाचण्यालाच प्रोत्साहन द्यायला हवं. शिवाय स्मार्ट फोन, वैयक्तिक संगणक, टीव्ही या प्रकारची सगळीच दृश्य उपकरणं विशिष्ट किरण उत्सर्जित करतात हे आपण पाहतोच.

हे किरण ६० ते १२० हर्टझ् इतक्या फ्रिक्वेन्सीनं चमचमत असतात. कमी-जास्त तीव्रतेनं सतत आपल्यावर आदळणाऱ्या या लहरींचा आपल्या मेंदूवर नेमका काय परिणाम होतो याबाबत आज तरी आपण अनभिज्ञ आहोत. काही शास्त्रज्ञांच्या मते, याचं व्यसन लागू शकतं.

तथापि दीर्घकालीन स्मृती, विचारक्षमता आणि बोधक्षमता यावर अशा किरणोत्सर्जनाचे नेमके कोणते दुष्परिणाम होतात याविषयी अद्याप पुरेसं संशोधन झालेलं नाही. या उपकरणातून होणारं हे किरणोत्सर्जन दृश्य वर्णपटाच्या (Visible Spectrum) निळ्या भागातील असतं. आपले डोळे वर्णपटातील पिवळ्या भागाला सरावलेले आहेत. एकदम असं निळ्याकडे वळणं हेसुद्धा आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला हानिकारक आहे.

प्रत्यक्ष पुस्तक किंवा किंडलसारखं उपकरण किरणोत्सर्जन करत नाही. त्यातील वाचावयाचा मजकूर आपल्याला दिसतो तो त्यावर पडलेल्या प्रकाशाच्या परावर्तनामुळे. कोणतीही वस्तू किंवा मजकूर परावर्तित प्रकाशाद्वारेच नीट पाहता येईल अशीच आपल्या Visual Cortex ची (ज्याच्या आधारे आपण पाहू शकतो तो आपल्या मेंदूचा भाग) घडण झालेली आहे. म्हणूनच पुस्तक वाचणं हेच आपल्या डोळ्यांना अधिक हितावह आहे.

त्यामुळे भारतीय शाळा-महाविद्यालयांसाठी किंडलसारखी; पण कमी किमतीची उपकरणं विकसित करणं हे आयटी क्षेत्रासमोरचं एक मोठं आव्हान आहे. या उपकरणांमध्ये श्राव्य-पुस्तकांचाही अंतर्भाव करणं हे आणखी एक तांत्रिक आव्हान होय. श्राव्य-पुस्तकांमुळे मुलांना पुस्तकांबद्दल अधिक प्रेम वाटू लागेल.

माझ्या लहानपणी माझी आजी मला गोष्टी सांगत असे. त्या मला फार आवडत. उच्चारलेला शब्द, सांगितलेल्या कथा ऐकत राहिल्यानं एकाग्रता वाढते आणि कल्पनाशक्तीही फुलते. साहजिकच सुंदर सुंदर कथा आणि अन्य सुरेख साहित्य किंडलसारख्या उपकरणावर ऐकणं अतिशय उपयुक्त ठरेल.

माझ्या लहानपणी मला मिळालेल्या सर्वोत्तम भेटवस्तू म्हणजे पुस्तकंच. ती वाचण्यात मी पूर्णतः गुंग होऊन जाई. महात्मा गांधी यांचं आत्मचरित्र, पंचतंत्र, महाभारत, जातककथा इत्यादींचा माझ्यावर खूपच प्रभाव पडला होता. जोडीला ‘चांदोबा’चा हिंदी अवतार असलेलं ‘चंदामामा’ हे मासिकही मी नियमित वाचत असे.

ते अतिशय उत्तम मासिक असायचं. त्यात भारतीय पुराणकथा असत. याशिवाय, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या रोमहर्षक कथांनीही मी मंत्रमुग्ध व्हायचो. पुस्तकवाचनाचा नाद एकदा का लागला की आयुष्यभर तो तुमची पाठ सोडत नाही. माझ्या या वाचनप्रेमातूनच वयाच्या केवळ चौदाव्या-पंधराव्या वर्षी माझं आध्यात्मिक वाचनही सुरू झालं.

वाचनाची गोडी काही झटपट लागत नसते. मुलांना पुस्तकवाचनाचा छंद लागावा यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक संधी साधत भेट म्हणून आपण मुलांना पुस्तकं द्यायला हवीत.

भारताचं भवितव्य घडवायचं तर या देशाच्या महान तात्त्विक परंपरांची जाण असलेले बहुश्रुत नागरिक आपण घडवायला हवेत. मुलांना चांगली चांगली पुस्तकं वाचण्याची गोडी लावूनच हे साध्य करता येईल.

मुलांना वाचनाची गोडी लावणं हा त्यांना चिंतनशील बनवण्याचा एक उत्तम उपाय होय. पुस्तकांच्या वाचनामुळे मुलांचे विचार आणि कल्पना सुस्पष्ट होतात आणि त्यांना चिंतनाची सवय लागते. पुस्तकं, विशेषतः गोष्टींची पुस्तकं वाचल्यानं वाचकाची कल्पनाशक्ती विकसित होते.