
‘सर्व काही आलबेल आहे, छान चाललं आहे, कशाला उगाच...’ अशी सुरक्षित राहण्याची वृत्ती मनाशी जोपासली तर प्रगती खुंटलीच म्हणून समजा.
पुढील प्रवासही ‘उम्मीदों से भरा...’
- प्रदीप चंपानेरकर
‘सर्व काही आलबेल आहे, छान चाललं आहे, कशाला उगाच...’ अशी सुरक्षित राहण्याची वृत्ती मनाशी जोपासली तर प्रगती खुंटलीच म्हणून समजा. सुरक्षित कप्प्यातून बाहेर पडण्याची मनाची तयारी असल्याशिवाय हातून काही दखलपात्र, समाजाच्या दृष्टीने काही उल्लेखनीय घडणं दुरापास्तच.
एखादी संकल्पना डोक्यात यावी, रेंगाळत राहावी आणि नंतर तिच्या शक्यतेचा अंदाज मनातल्या मनात घेत राहणं, हे साहजिक आहे; परंतु त्या संकल्पनेची आर्थिक गणितं कागदावर पुन:पुन्हा मांडत राहिलं, तर त्या संकल्पनेतलं चैतन्य हरवून उरणार ती फक्त रुक्ष आकडेमोड...
आणि एकदा का, चैतन्य हरपलं तर, ती अवस्था अनेक वेळा तुम्हाला ‘कप्प्या’तून बाहेर पडायचं धाडस करू देत नाही. याचा अर्थ असा नव्हे की, कुणी बेहिशेबी राहावं. संकल्पनेतला प्रकल्प तडीस नेण्याजोगी किमान उपलब्धी, साधनं आपल्या आवाक्यात येतील की नाही, त्याचप्रमाणे आर्थिक ठोकताळे काय सांगतात, यांचा किमान अंदाज घेणं आवश्यकच असतं.
असे घेतलेले ठोकताळे अनुकूल ठरूनही काही वेळा मनातल्या संकल्पनांचं अस्तित्व राहतं ते मनात बांधलेल्या इमल्यांपुरतं. परंतु, ‘यांनी घडवलं सहस्रक’ या मागील लेखात उल्लेखलेल्या ग्रंथाबाबत सर्व काही जमून आलं आणि ती संकल्पना मनातल्या इमल्यापुरती राहिली नाही... ग्रंथरूपात प्रत्यक्षात आली, जाणकारांची दाद मिळवती झाली, सर्वसामान्यांतही लोकप्रिय झाली.
याच यशाने प्रेरित होऊन आम्ही काही वर्षांनी ‘असा घडला भारत’ हे अधिक मोठं साहस करू धजलो. साथीला ‘टीम’ तीच... सहस्रकाची! अर्थात युनिक फीचर्स व आनंद अवधानी लेखन-संयोजक-संकलक, तर मिलिंद चंपानेरकर व सुहास कुलकर्णी संपादक.
हा पट निश्चितच आव्हानात्मक होता. घटनांची निवड, त्यात समाविष्ट करायचे मुद्दे, त्या-त्या घटनेसाठी योग्य लेखकाची निवड असं सर्व नियोजन पातळीवरचं काम २००६ च्या सुरुवातीला सुरू झालं. ५५ तज्ज्ञ लेखकांची निवड केली गेली, तर अनेक घटनांच्या लेखनाची जबाबदारी संपादकांनी स्वतःवरच घेतली.
तेव्हा त्या शेकडो टिपांचं लेखन, ५५ लेखकांकडून आलेल्या शेकडो टिपांचं संस्करण, एकंदर ग्रंथातील लेखांचं सुसूत्रीकरण... अशा विविध पातळ्यांवर दोन्ही संपादकांनी दिलेलं योगदान उल्लेखनीय म्हणावं असंच होतं. घटनांच्या अशा नोंदींव्यतिरिक्त ग्रंथाला विविध पैलूंची जोड देऊन हा ग्रंथ परिपूर्णतेच्या पलीकडे नेण्याचा माझा अट्टहास होता, त्यासाठी दुसऱ्या बाजूला मीही खिंड लढवत होतो.
एकंदरीत, हा ग्रंथ म्हणजे दस्तावेजीकरणाचा उत्तम नमुना ठरावा. सात वर्षांच्या विचारपूर्वक परिश्रमानंतर ९२४ मोठ्या आकाराच्या पानांचा साकार झालेला ग्रंथ २०१३ मध्ये २३ जानेवारीला प्रकाशित झाला तो विचारवंत, अभ्यासक आणि अनेक जाणकार व जिज्ञासूंच्या साक्षीने. आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे, राष्ट्रीय पातळीवरचा संपूर्ण भारतभरातून एकाच प्रकाशनगृहाला दिला जाणारा ‘पब्लिशर ऑफ द इयर’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार २०१४ मध्ये ‘रोहन’ला प्रदान झाला.
या ग्रंथाचं काम सुरू असताना २००९ सालच्या मध्यात एक मोठी सकारात्मक घटना घडली. माझा मुलगा रोहन, ‘रोहन प्रकाशना’त दाखल झाला. वास्तविक रोहन शिक्षणाने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर. डिजिटल क्षेत्राच्या कॉर्पोरेट जगतात पाच वर्षं काम केल्यानंतर, उत्स्फूर्तपणे त्याने रोहन प्रकाशन हेच त्याचं पुढचं करिअर मानलं.
त्वरितच त्याने कामकाजाचं संगणकीकरण, वेबसाइटचं आधुनिकीकरण ही कामं धडाक्यात केली, त्याचप्रमाणे दर वर्षाला प्रकाशित पुस्तकांची संख्या वाढवण्याचं धोरण आखलं. त्यामुळे पुढे विषय-वैविध्य व मूळ अवकाश-विस्ताराचं धोरण अधिक वेगाने साकार होत गेलं.
सुरुवातीच्या काळातील त्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’... सत्यजित राय लिखित गुप्तहेर फेलूदा ही पुस्तकं बंगालमध्ये अतिशय लोकप्रिय. रोहनला वाटलं, ही पुस्तकं मराठीत अनुवादित करून घ्यावीत. फेलूदाच्या एकूण ३५ कथा. त्या एकूण वीस पुस्तकांत टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या.
त्याची मुखपृष्ठं तपस गुहा या बंगाली चित्रकाराकडूनच करून घेतली. खास आकर्षक वेष्टनात ३ संच केले. या सर्व ‘फॅन्टॅस्टिक फेलूदां’ना मराठीजनांनी चांगल्यापैकी आपलंसं करून घेतलं. या प्रकल्पामागे रोहनचा उद्देश होता तो कुमार गटातील मुला-मुलींना सकस आणि रंजक असं दोन्ही गुणसंपन्न असलेलं काही वाचायला द्यायचा, तो उद्देश चांगल्या प्रकारे सफल झाला.
‘फेलूदा’ या प्रकल्पापाठोपाठ ‘व्योमकेश बक्षी’ रहस्यकथांच्या पुस्तकांची मालिका रोहनच्या पुढाकाराने प्रसिद्ध झाली, तीही संचाच्या स्वरूपात. या दोन्ही प्रकल्पांच्या निमित्ताने रहस्यकथा, गुप्तहेरकथा यांची मराठीत चांगली भर पडली.
हे दोन्ही प्रकल्प पूर्णपणे अशोक जैन यांच्या ओघवत्या अनुवादाने साकारले गेले, या गोष्टीचा इथे विशेष उल्लेख करतो. कारण पक्षाघाताने त्रस्त असूनही, अशोकने अनुवादाचे हे प्रस्ताव एक आव्हान म्हणून स्वीकारले.
संपादनाची जबाबदारी आजवर पुरुषोत्तम धाक्रस आणि मिलिंद चंपानेरकर सांभाळत होते. काही पुस्तकांचं संपादन मी स्वतःही करत होतो; परंतु आता पुस्तकांची संख्या आणि विषय-विविधता वाढत होती. प्रत्येक हस्तलिखितावर योग्य संस्कार होणं, हे प्रकाशनाचं वैशिष्ट्य कायम ठेवून त्याला अधिक परिमाणं जोडायची होती.
त्यात ‘रोहन’कडे विचारार्थ येणाऱ्या प्रस्तावांचा ओघही वाढला होता. तेव्हा संपादकीय विभाग बळकट करण्याच्या रोहनच्या आग्रहाशी मीही सहमत झालो. वर्ष-दीड वर्षाच्या अंतराने अनुजा जगताप, प्रणव सखदेव, नीता कुलकर्णी हे तीन तरुण रोहन प्रकाशनात संपादक म्हणून सहभागी झाले.
नव्याने दाखल होणारे संपादक तरुण पिढीतले असावेत, त्यामुळे जुन्या-नव्याचा चांगला संयोग होईल, यावर माझं आणि रोहनचं एकमत होतं. तरुण रक्ताला वाव देणं हे या सर्वांमागचं कालसुसंगत धोरण म्हणजे बदलाची नवी पहाटच म्हणावी. संपादक विभागात रुजू झालेल्या तिघांची वैशिष्ट्यंही वेगवेगळी आहेत. रोहन प्रकाशनाचं विषय-वैविध्याचं वैशिष्ट्य जपण्याच्या धोरणाला तिघांत असलेले भिन्न गुण पूरकच ठरतात.
एकंदरीतच रोहन प्रकाशनमधलं वातावरण मोकळं व खेळीमेळीचं. इकडची कार्यसंस्कृतीच वेगळी, त्यामुळे कार्यालयातील सर्वच सहकारी मनापासून व जबाबदारीने काम करत असतात. त्याच वातावरणात संपादकांशीही मोकळेपणे चर्चा होतात. या सर्वच चर्चांमधून असेल किंवा विकसित केलेल्या मोकळ्या वातावरणामुळे असेल, अनेक नव्या कल्पनांचा उदय रोहन प्रकाशनात होत आला आहे.
एक म्हणजे ‘रोहन साहित्य मैफल’ या मासिकाचा उदय. याच दरम्यान ‘टीम रोहन’मध्ये लेआउट आर्टिस्ट प्राची एक्केचं आगमन झालं. इतर ‘प्रमोशन’च्या कामांव्यतिरिक्त ती या अंकांचं लेआउटिंग एकहाती पार पाडत असते. आणखी एक संकल्पना म्हणजे विषयांनुसार निर्माण केलेल्या विविध मुद्रा.
विविध मुद्रांची ही मूळ संकल्पना रोहनची; पण ती विकसित केली सर्वांनी मिळून. म्हणजे कुमार गटातील मुलांसाठी अभिप्रेत असलेल्या पुस्तकांसाठी ‘किशोर वाचन’ ही मुद्रा; सामाजिक जाणिवांतून प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांसाठी ‘समाजरंग’ ही मुद्रा; चरित्र-आत्मचरित्र, अनुभव कथनांसाठी ‘व्यक्तिरंग’; आणि सर्व प्रकारच्या ललित लेखनासाठी, कथा-कादंबऱ्यांसाठी ‘मोहर’ ही खास मुद्रा.
रोहन प्रकाशनात गेल्या पाच-सात वर्षांत मोठा बदल कोणता झाला असेल, तर ‘मोहर’ मुद्रेअंतर्गत प्रकाशित होत असलेलं ललित लेखन, कथा-कादंबऱ्या. यामुळे प्रतिभावान ज्येष्ठ व तरुण लेखक ‘रोहन’ला जोडले गेले. त्यांच्या पुस्तकांसाठी प्रतिभावान चित्रकार आशयघन मुखपृष्ठ साकारतात, त्यामुळे ही पुस्तकं लक्षवेधीही ठरतात.
‘रोहन’द्वारे अशी विविध प्रकारची साहित्यनिर्मिती होऊन तिची संख्या आता जवळपास ६५० झाली आहे. ती सर्व पुस्तकं वेगवेगळ्या पद्धतीने समाज उन्नत करत असतात, समाजभान निर्माण करत असतात. या प्रत्येक विषयाला पुस्तकरूप देताना वेगळा विचार करावा लागतो. प्रत्येक पुस्तकाची निर्मिती-मागणी वेगळी असू शकते.
अगदी हस्तलिखित स्वीकारण्याच्या प्रक्रियेपासून त्याच्या संपादनापर्यंत, पुस्तकाचा आकार ठरवण्यापासून ते आतला लेआउट ठरवेपर्यंत, मुखपृष्ठापासून टायपोग्राफी ठरवेपर्यंत, शीर्षकापासून मलपृष्ठावरील मजकुरापर्यंत, कागदाच्या निवडीपासून बाइंडिंगचा प्रकार ठरवेपर्यंत....
प्रत्येक गोष्टीमागे एक दृष्टिकोन व विचार हवा. निर्मितीच्या या सर्व घटकांत सुसूत्रता, एकजिनसीपणा असावा लागतो... आणि ही सर्व कसरत सांभाळण्यातच प्रकाशकाचा कस लागत असतो, त्याच्यातील सर्जनशीलतेला वाव मिळत असतो.
रोहन प्रकाशनाच्या सुरुवातीच्या प्रतिमेला गेल्या तीन दशकांत वेगवेगळे पैलू प्राप्त होऊन प्रतिमाबदल झाला. ठरवल्याप्रमाणे अवकाश-विस्तार होणंही सुरू आहे. आजच्या डिजिटल युगाला अनुसरूनही तो विस्तार भविष्यात होत राहील.
रोहन प्रकाशनात पुढची पिढी अर्थात रोहन गेली चौदा वर्षं उमेदीने काम करतो आहे, उत्साहाने नवनवे प्रयोग करतो आहे, हे लक्षात घेता चाळिशी गाठलेल्या रोहन प्रकाशनाचा पुढील प्रवासही ‘उम्मीदोंसे भरा’ व आश्वासक असाच असेल, नाही का?
‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली; पण तरुण पिढीला स्वातंत्र्योत्तर भारताचा प्रवास कोण सांगणार?’ असा या प्रकल्पामागचा ‘वन लायनर’ विचार. ग्रंथाच्या संकल्पनेवर तपशिलात चर्चा करण्यासाठी माझ्या संपादकद्वयीसोबत बैठकी होऊ लागल्या.
स्वतंत्र भारताची पायाभूत घडण ते औद्योगिक-विकास; राजकारण ते क्रीडाक्षेत्र; समाजकारण ते चित्रपटक्षेत्र... ग्रंथाचा असा सर्वसमावेशक पट ठेवायचा व या प्रवासाचा धांडोळा घ्यायचा तो घटना-घडामोडींच्या माध्यमातून, घटनांचे तपशील देऊन, त्याची पार्श्वभूमी सांगून वस्तुनिष्ठपणे त्याचं चित्रण करायचं. वर्षागणिक घटना-घडामोडी सांगून दशकवार विभाग करायचे. चर्चेअंती ढोबळमानाने ग्रंथाची अशी रचना ठरली.