पश्‍चिम महाराष्ट्रात आघाडी युतीला धोबीपछाड देणार? 

पश्‍चिम महाराष्ट्रात आघाडी युतीला धोबीपछाड देणार? 

पश्‍चिम महाराष्ट्रात भाजप - शिवसेना युतीने "मेगाभरती' करीत वातावरण निर्मिती केली असली, तरी या भागात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. आघाडीच्या नेत्यांनी विशेषतः शरद पवार यांनी या भागात पुन्हा फेरजुळणीला सुरवात केल्याचे दिसून येते. आघाडीने नव्या दमाचे चेहरे रिंगणात उतरविल्यास, अनेक मतदारसंघांत काट्याची लढत होईल. युतीचा मोठा गवगवा झाला असला, तरी आघाडीच युतीला धोबीपछाड देणार का, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. 

मोदी लाट, तत्कालीन आघाडी सरकार विरोधी वातावरण 2014 च्या निवडणुकीत होते. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस परस्परांविरुद्ध लढत असतानाच, आघाडीतील अनेक नेते भाजप अथवा शिवसेनेतर्फे लढले होते. भाजप-शिवसेनाला मतविभागणीचा फायदा झाला. 2014 मध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील एकूण 70 जागांपैकी कॉंग्रेसने दहा, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 19 जागा मिळविल्या. भाजपने पुण्यासह शहरी भागात 13 जागा मिळवित एकूण 24 जागा जिंकल्या. शिवसेनेने कोल्हापुरात बाजी मारल्याने त्यांचे 13 आमदार निवडून आले. अन्य पक्षांनी चार जागा जिंकल्या. 

हा पट्टा तसा साखर कारखानदारीचा पट्टा. येथे प्रत्येक तालुक्‍यांत राजकीय नेतृत्व वेगळे. तेथील राजकारणाचा बाजही वेगळा. त्यामुळे एखादा नेता इकडून तिकडे गेला तरी दुसऱ्या फळीला नेता त्याची जागा घेण्याला तयारीतच असतो. कॉंग्रेसचे चार आणि राष्ट्रवादीचे तीन आमदार सध्या युतीत गेले आहेत. तर, आणखी एक-दोन जण जाण्याच्या तयारीत आहेत. काही माजी आमदार व गेल्या वेळी दुसऱ्या स्थानावरील उमेदवारही भाजप-शिवसेनेत गेले. मात्र, ते सर्वजण युतीतर्फे पुन्हा निवडून येतीलच, असे ठामपणे सांगता येणार नाही. पक्षांतर करणाऱ्या काही नेत्यांचे कारखाने किंवा सहकारी संस्था अडचणीत आल्या होत्या. 

गेल्या वेळच्या चौरंगी लढती आता दुरंगी होणार आहेत. त्यामुळे, मतांचे विभाजन टळताना, गेल्यावेळची विभागलेली मते यंदा कोणाच्या पारड्यात पडणार हा मुद्दाही कळीचा ठरणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता युतीतून आघाडीमध्ये आली आहे. महादेव जानकर यांच्या रासपचाही आता पूर्वीएवढा जोर दिसून येत नाही. त्याचबरोबर पुरामुळे झालेले नुकसान, साखर कारखानदारीपुढील अडचणी यांसह विविध स्थानिक मुद्देही प्रचारात प्रभावी ठरतील. 

कोल्हापूर, सांगलीत टक्कर 
कोल्हापूर जिल्ह्यात दहापैकी शिवसेनेच्या सहा, तर भाजपच्या दोन जागा आहेत. दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे, आता आघाडीला गमावण्यासारखे काही शिल्लक नाही. तेथे आघाडीने स्वाभिमानीच्या साह्याने जोर लावल्यास, काही जागा ते युतीकडून पुन्हा परत घेण्याची शक्‍यता आहे. मेगाभरतीत भाजपमध्ये नेते गेले असले, तरी शिवसेनेचे आमदार असल्याने या नेत्यांना उमेदवारी देताना भाजपला जड जाईल. सांगलीमध्ये आठपैकी चार ठिकाणी भाजप, तर एका जागी शिवसेनेचा आमदार आहे. उर्वरीत तीन जागा टिकविताना आघाडीला अन्य जागांवर हिमतीने लढावे लागेल. कडकनाथ कोंबडी गैरव्यवहार प्रकरण येथे विरोधकांच्या प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. 

साताऱ्यात चुरशीच्या लढती 
सातारा जिल्ह्यांत गेल्या निवडणुकीत भाजपला स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे, त्यांनी यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरे यांना भाजपमध्ये घेतले. मात्र, जिल्ह्यातील आठपैकी पाच आमदार अद्यापही आघाडीत आहेत. त्यामुळे सातारा राखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पूर्ण ताकद पणाला लावणार, हे निश्‍चित. अशा स्थितीत येथील लढती अत्यंत चुरशीच्या ठरणार आहेत. 

नगरमध्ये युतीचा बोलबोला 
नगर जिल्ह्यात गेल्यावेळीच भरती केल्यामुळे, 2014 मध्ये बारापैकी पाच जागा भाजपच्या, तर एक जागा शिवसेनेच्या पारड्यात पडली होती. कॉंग्रेसचे तीनपैकी दोन आमदार, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीनपैकी एक आमदार युतीच्या पक्षांत गेले. मात्र, नगर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्‍यांत वेगवेगळ्या नेत्यांचा दबदबा आहे. रोहीत पवारही यंदा नगर जिल्ह्यातून राजकीय लढाईला प्रारंभ करीत आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, तसेच नुकतेच भाजपमध्ये गेलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचीही कसोटी लागणार आहे. त्यामुळे, नगर जिल्ह्यात आघाडीपेक्षा युतीचा बोलबोला अधिक आहे. 

सोलापूर जिल्ह्यात राजकीय गोंधळ 
सोलापूर जिल्ह्यात बहुतेक विरोधी आमदार सत्तारुढ युतीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते. दोघांना प्रवेश मिळाला. तर, अन्य काही प्रमुख कार्यकर्तेही युतीत गेले. जिल्ह्यातील दोन्ही खासदार युतीचे निवडून आल्याने, या जिल्ह्यात उमेदवार जाहीर झाल्यानंतरच अंदाज बांधता येतील, अशी सध्या गोंधळाची स्थिती आहे. 

पुण्याची शहरी भागात भाजपचे वर्चस्व 
पुणे शहरातील आठही जागा काबिज करीत भाजपने विरोधी पक्षांना नेस्तनाबूत केले. शहरात आताही त्यांचाच जोर असेल. जिल्ह्यातील 21 जागांपैकी 17 जागा आता युती अथवा त्यांच्या मित्रपक्षांकडे आहेत. इंदापूरला कॉंग्रेसने नेते हर्षवर्धन पाटील यांना प्रवेश देत भाजपने राष्ट्रवादीला शह दिला आहे. यावेळी ग्रामीण भागात आघाडी काही जागा युतीकडून परत मिळवू शकेल, अशी स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com