सध्या इंटरनेट हेच जगण्याचे साधन

umesh thate
umesh thate

ऑस्ट्रेलियात वैयक्तिक स्वातंत्र्याविषयी लोक अतिशय जागरूक असले, तरी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तेथील सरकारने कडक पावले उचलली आहेत. त्याविषयी सांगताहेत मूळचे पुण्याचे सध्या ऑस्ट्रेलियात सिडनी येथे अत्यावश्‍यक सेवेत असलेले उमेश थत्ते.

मी ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये मॅकवेरी फिल्ड भागात राहतो. येथेही लॉकडाऊन आहे; पण भारतापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने. इथे वैयक्तिक स्वातंत्र्य, हक्क याविषयी लोक अतिशय जागरूक आहेत. पण सरकारने अतिशय कडक पावले उचलली आहेत. ठराविक कारणाशिवाय कोणी घराबाहेर पडू शकत नाहीत. विनाकारण फिरताना आढळले तर सहा महिने कैद, 11 हजार डॉलर दंड, म्हणजे इथल्या मध्यमवर्गीय माणसाचे एक वर्षाचे सेव्हिंग...! पण रोजच्या गरजेच्या वस्तू आणण्यासाठी, कामावर जाण्यासाठी किंवा काही आजारी व्यक्तींना व्यायाम गरजेचा असतो, अशांसाठी घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. पण तुम्ही दोघे जाऊन शकत नाही, गेला तर किमान दीड ते दोन मीटरचे अंतर आवश्‍यक, अन्यथा जागेवरच दंड...!

एकूणच दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले आहे. काही वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. टॉयलेट टिश्‍यू पेपर, हॅंड सॅनिटायझर, साबण, साखर, मीठ या गोष्टी बाजारातून जवळपास गायबच झाल्या आहेत. थोड्या दिवसांत कदाचित हे सुरळीत होईल. पण अडचण ही आहे की, भारत किंवा उत्तर गोलार्धातील जे देश आहेत, तेथे उन्हाळा सुरू होतोय आणि तापमानाचे माणसांसाठी चांगले परिणाम विषाणूवर होत असतील, तर दक्षिण गोलार्धात उलट परिस्थिती आहे. कारण येथे हिवाळा सुरू होतोय. त्यामुळे जास्त सावध राहणे आवश्‍यक आहे.

ऑस्ट्रेलियात सध्या सुमारे साडेपाच हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू आहेत. सरकारने खासगी वैद्यकीय यंत्रणांबरोबर करार केले आहेत. एरवी इथली खासगी रुग्णालये खूप महागडी आहेत. दिवसाचा चार्ज रुपयांमध्ये किमान 60 ते 70 हजार इतका आहेत. सध्या सरकारी यंत्रणा पुरेशी दिसते आहे, पण रुग्ण वाढले तर मात्र ताण येईल. रुग्णालय कर्मचारी, पोलिस त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. येथील शीख, भारतीय समुदाय पुढाकार घेत, त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करत आहे, ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

वीकएंडला ऑस्ट्रेलियन माणूस घरात कमी आणि बाहेरच जास्त असतो. इंटरनेटमुळे नव्या पिढीबाबत ही परिस्थिती थोडी बदलली आहे. तरीसुद्धा एरवी वीकएंडला मैदाने भरलेली दिसतात. आता लोक घरात कोंडून आहेत. त्यातून नैराश्‍य किंवा इतर मानसिक प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सध्या इंटरनेट वरदानच म्हणावे लागेल. इथली घरे प्रशस्त असतात. त्यामुळे घरातल्या घरातही काही करमणुकीची साधने उपलब्ध करता येऊ शकतात. माझ्या घरात मी गाडी बाहेर लावून गॅरेजमध्ये टेनिस टेबलचे टेबल टाकले आहे. खेळून वेळ घालवता येतो. व्यायाम म्हणूनही ते गरजेचे आहे. कुटुंबासह नेटवर सिनेमा, नाटके पाहणे सुरू आहे. बरेच जण सध्या हेच करताहेत. आपल्याला भाषेतील सिनेमा, नाटके पाहात आहेत. इंटरनेट हे सध्या जगायचे आवश्‍यक साधन झाले आहे, हे नक्की!

कोरोनाच्या प्रसारामुळे बऱयाच राज्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. अन्य ठिकाणच्या शाळा औपचारिकरित्या सुरू आहेत. बऱ्याच मुलांना घरून शिक्षण घेण्याची परवानगी आहे. अत्यावश्‍यक सेवा सुरू आहेत. वाहतूक सुरू आहे. मी सिडनी ट्रेनस्‌मध्ये काम करतो. तो अत्यावश्‍यक सेवेचा भाग असल्याने मला कामावर जावे लागते. पण जिथे शक्‍य आहे, तिथे वर्क फ्रॉम होमची सवलत आहे.

सध्या ऊनपावसाचा खेळ सुरू आहे. मधेमधे ऊन पडत असल्याने मळभ दूर होऊन वातावरण प्रसन्न होते. कोरोनाचे मळभही लवकरच दूर होईल, अशी आशा आहे.
(शब्दांकन : नयना निर्गुण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com