थोडी जागा प्रेमासाठी 

Love
Love

एखाद्या कोपऱ्यात गुलगुलू करणारे ते दोघे जेव्हा दिसतात. आपण त्यांच्यातलं नातं शोधतो. मग ते तरुण-तरुणी असोत, नवरा-बायको किंवा वृद्ध जोडपं. रस्त्याच्या आडोशाला, एखाद्या ईमारतीच्या प्रकाश नसलेल्या कोपऱ्यात, काळोख्या बसस्टॉपच्या मागे बाईकवर किंवा बसस्टॉवपर, एखाद्या अंधाऱ्या आणि कमी वर्दळीच्या रस्त्यावर, झाडांच्या आडोशाला, सिनेमा गृहांच्या खुर्च्यांवर एकमेकांच्या खूप जवळ आलेले कपल पाहिलं की आपल्या भुवया उंचावतात. संस्कृतीच्या नावाचा जागर होते. चार-दोन शिव्या जिभेच्या टोकाला येऊन परत जातात किंवा तिडकीने बाहेर पडतात. पण खरंच हे चूक आहे का? असं उघड्यावर आपल्या भावना व्यक्त करण्याची वेळ त्यांच्यावर येते, कारण त्यांच्यासाठी राखीव जागा नाहीत. हक्काच्या घरातही अशी प्रायव्हसी मिळणार नसते, किंवा घरातले काय म्हणतील या वयात असं भेटताना याची भीती त्यांनाही खात असेल... 

लहान मुलांना खेळायला गार्डन, मैदानं हवी. वृद्धांसाठी जॉगर्स पार्क किंवा नाना-नानी गार्डन आपण करतो. पण मग तरुण वयात असलेल्या या नैसर्गिक भावनेसाठी राखीव जागा का नाही करत? प्रत्येकाला त्याची स्पेस मिळाली पाहिजे हा नवीन फंडा सध्या रुजू पाहतोय. प्रेमी, लग्न ठरलेले किंवा नवीन नवरा- बायको, आयुष्याच्या उतारावर असेलेले पण पुन्हा नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडलेले वृद्ध, धावपळीत बायकोच्या हातात हात घालून चालणं राहून गेलेल्या अथवा बायकोला वा नवऱ्याला घट्ट मिठीत घ्यायची इच्छा असलेल्या काका-काकूंना बागेत मिठीत घ्यायचं असेल तर, आपण त्यांना जागा देणार आहोत का? जागा द्यावी का? 

कारणं काहीही असोत प्रेमाची ही भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना जागा हवीच. या जागा त्यांना दिल्या पाहिजेत असंच तज्ज्ञाचं मत आहे. 
दिलीच पाहिजे नाही का? उघड्यावर ते त्यांची भावना व्यक्त करतात तेव्हा आपण त्यांना असंस्कारी, वाह्यात, विक्षिप्त म्हणतो. अगदी मुलांच्या बगिचात असं जोडपं दिसलं तर मुलांच्या प्रश्नांना उत्तर देताना, किंवा मुलांना ते पाहण्यापासून रोखताना आपल्याला घाम फुटतो. पण प्रेम व्यक्त करणं ही नैसर्गिक भावना असल्याचे सेक्‍सॉलॉजिस्ट राजन भोसले आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे यांचं म्हणणं आहे. 

प्रेम व्यक्त करण्यासाठी भाषा, विचार आणि कृती असे पर्याय आहेत. कृती म्हणजे प्रेमाची अभिव्यक्ती. ही अभिव्यक्ती कविता, संवाद, प्रेमपत्र, सध्या मेसेज, व्हॉट्‌सअॅप या माध्यमातूनही व्यक्त करता येते. मात्र, हल्ली मुलं भाषा आणि साहित्यापासून दुरावत असल्यामुळे त्यांच्याकडे अभिव्यक्तीसाठी कृतीच शिल्लक राहते. यासाठी मुलांना अभिव्यक्ती शिकवली पाहिजे असं ते सांगतात. 

डॉ. देशपांडे यांनी लव्हर्स पार्क असावेत मात्र त्यात काही नियम असावेत अशी भावना व्यक्त केली. तर डॉ. राजन भोसले यांनी त्यांचा किस्सा शेअर केला. अडीच वर्षांपूर्वी त्यांच्या बायकोच्या हातात हात घालून फिरताना त्यांना एका उद्यानामध्ये गार्डने हटकलं. 'ये इधर नाही चलेगा' या वाक्‍यावर ते हबकले. त्यांनी विचारलं 'क्‍या नही चलेगा?' 
हातात हात घालून चालणं हेदेखील गैर वाटावं असं काय आहे, असा प्रश्न डॉ. भोसले विचारतात. 

"अॅमस्टरडॅमसह परदेशात अनेक ठिकाणी असं सर्रास दिसतं. तेव्हा त्याकडे लोक ढुंकूनही पाहत नाहीत. मात्र आपल्याकडे लोक वळूनवळून पाहतात हे चुकीचं आहे. 
पार्क असले पाहिजेत, तसे त्यासाठी नियमही असले पाहिजेत. या भावना व्यक्त करताना त्याला अश्‍लिलतेचं गाल-बोट लागू नये याचं भान असलं पाहिजे. तसंच, पुरुष-स्त्रीबद्दल समानतेची भावना त्यांच्यावर रुजवली गेली पाहिजे. तज्ज्ञांच्या मते या युगुलांवर कारवाई करण्यापेक्षा अशांवर कारवाई करावी जे याला विरोध करतात, आणि तो विरोध व्यक्त करण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबतात." 

समलिंगी चळवळीसाठी काम करणारे कार्यकर्ते पल्लव पाटणकर यांनी प्रेम ही लिंगापलिकडील गोष्ट असल्याचे मत मांडले. तसंच 'दोन भिन्नलिंगी व्यक्ती आपण एकत्र पाहू शकत नाहीत. तर समलिंगी व्यक्तींचं भेटणं किती स्विकारू?' असा प्रश्न विचारत त्यांनी खंत व्यक्त केली. तसंच आपल्याकडे आजपर्यंत असे संबंध स्वीकारले नाहीत तर समलिंगी व्यक्तींना अशा वेगळ्या पार्कचा फारसा उपयोग होणार नाही असे मत त्यांनी मांडले. 

"संविधानाने कलम 19 अंतर्गत दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात प्रेमाचाही समावेश होतो. प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार महत्त्वाचा आहे. लव्हर्स पार्क नसणं हे नागरी समाजासाठी चांगलं लक्षण नाही," असं मत मानवाधिकार चळवळीचे कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केलं. 
नैतिकेचा स्तर किंवा पातळ्या ठरवलेल्या नाहीत. असे सामाजिक नीतीनियम जाहीर करणं हे धर्मांध आणि राजकीय व्यक्ती सर्रास करतात. अशा पद्धतीने घटनाबाह्य केंद्र निर्माण करून मार्गदर्शक सूचना जारी करणं चुकीचं आहे. अशा पद्धतीने नियम आणि संस्कृतीच्या नावाखाली बेकायदेशीर सत्ता केंद्र निर्माण केली जातात. तसंच खोट्या नीतीमूल्यांच्या रक्षणासाठी 'मॉरल पोलिसिंग' करणं हेदेखील चुकीचं असल्याचं ते म्हणाले. याने भावना दाबल्या जाऊन विकृती तयार होते. त्याबरोबरच असं पार्कात येणाऱ्यांनीही स्वातंत्र्य आणि हक्क यांची सांगड घालत प्रेमाची अभिव्यक्ती करणं गरजेचं आहे. 

प्रेम व्यक्त करण्यासाठी राखीव जागा नसावी, असं मत डॉ. आशिष देशपांडे आणि नगररचनाकार सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केलं. 

"परदेशात लोक एकमेकांना मिठीत घेतात, किस करतात, हातात हात घालून चालतात. तेव्हा त्यांच्याकडे ते काहीतरी वेगळं करतात या नजरेतून लोक बघत नाहीत. त्यांना त्यांचा एकांत देतात. 

मुळात आपल्याकडे शहरांमध्ये पार्क कमी आहेत. त्यात असे वेगळे पार्क देणं मुंबईसारख्या शहरात शक्‍य नाही. सार्वजनिक पार्कांमध्ये तरुण-तरुणी, नवरा-बायको, वृद्ध जोडपी, किंवा समलिंगी नातं असणारे असे कोणालाही याच पार्कात मोकळेपणे हातात हात घालून किंवा खांद्यावर हात ठेवून फिरता आलं पाहिजे. त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं आपण टाळलं पाहिजे. आपल्या सभ्यपणे वागण्याच्या 'आयडिया' फारच जुनाट आहेत," असं त्या मोकळेपणे सांगतात. 

मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. मतांचा जोगवा मागताना, मतदार राजाला खूश करताना लोक आमिष दाखवतात. पूर्ण करण्यासाठी धडपडही करतात. पण कोणत्याच राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर या कॉस्मोपॉलिटन तरुणांसाठी हा मुद्दा नाही याची खंत वाटते. प्रेमाचं राजकारण पक्षांनी याआधी केलेलं आहे. शिवसेनेने व्हॅलेंटाईन डेला विरोध केला. तर, कोणी पार्कात एकत्र दिसणाऱ्या जोडप्यांचं जबरदस्ती लग्न लावलं. ही हुकूमशाही झाली. ज्या देशात आणि शहरात तरुणांचा टक्का जास्त आहे. त्या शहरात तरुणांसाठी नाईट लाईफच्या गप्पा आणि हट्ट बाळगणाऱ्या शिवसेनेने हा मुद्दा विचारात घ्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. आपण राणीच्या बागेत आणून पेंग्विन मेले तरी धीराने घेतलं. नाईट लाईफमुळे येणारा सुरक्षेच्या मुद्यासाठी जर आग्रही भूमिका असेल तर अशा पार्कांसाठी सर्वसमावेशक नियम बनवून काहीतरी हटके करण्याची ही चांगली संधी असेल. 

ते प्रेम करतात 
लहान मुलांबरोबर पार्कात गेलात आणि प्रेमी युगुलाला प्रणयक्रीडेत पाहून तुमच्या लहान मुलांनी तुम्हाला प्रश्न विचारला हे काय करतात. तर, त्यांना उत्तर देणं टाळू नका. त्यांना सांगा ते प्रेम करतात. 
पार्क - हवे 
नियम - कपडे काढून सेक्‍स करण्यास परवानगी नसावी.
- डॉ. राजन भोसले, सेक्‍सॉलॉजिस्ट 

प्रेमाच्या अभिव्यक्तीत नियंत्रण हवं 
स्त्री-पुरुष नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत चाललाय. यामुळे प्रेमाची अभिव्यक्ती नियंत्रित असली पाहिजे. लैंगिक समानता, लैंगिक जागृती आणि लैंगिक संवेदनशीलता याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. आपल्याकडे खजुराहोसारख्या लेण्यांमध्ये सेक्‍सबद्दल मोकळ्या विचारांतून शिल्प साकारली आहेत. ही आपली संस्कृती आहे. मात्र बदलत्या काळात त्या संस्कृतीला वेगळं वळण लागू नये म्हणून काही नियम आले. पण अभिव्यक्ती होणंही तितकंच गरजेचं आहे. 
पार्क - हवं 
नियम - सेक्‍सची किंवा अश्‍लिल चाळे करू नयेत.
- डॉ. आशिष देशपांडे, अध्यक्ष, (इंडियन असोसिएशन फॉर स्कूल मेंटल हेल्थ) 

पार्कात वेगळी वागणूक नको 
समलिंगी कपल्सनाही लोकांनी मान्यता दिली पाहिजे. कारण प्रेम हे लिंगाधारीत नसून आत्म्याशी जोडणारी संकल्पना आहे. पार्कात प्रेमींना फक्त बोलण्यासाठी नाही तर एकत्र खेळण्यासाठी, व्यायाम करण्यासाठीची सोय असली पाहिजे. कारण प्रेमी फक्त प्रेम करायला भेटत नाही. कदाचित ही त्यांची अभिव्यक्ती असेल. 
पार्क - हवे 
नियम - सर्वांना समान वागणूक असावी 
- समलिंगी कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com