इंडस्ट्रीतील बदलांचे केले स्वागत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

कम बॅक मॉम - चैत्राली गुप्ते, अभिनेत्री
मला एक मुलगी आहे. तिचं नाव शुभवी. ती आता १३ वर्षांची आहे. शुभवी झाल्यानंतर मी जवळजवळ दोन वर्षांचा गॅप घेतला होता. बाळ झाल्यावर कमीत कमी दोन वर्षं तरी मी त्याच्यासाठी देणार, हे मी प्रेग्नन्ट असतानाच ठरवलं होतं. त्या वेळी मी कुठंही काम केलं नाही आणि माझा संपूर्ण वेळ मी शुभवीसाठी दिला. दोन वर्षं इंडस्ट्रीपासून लांब राहिल्यानंतर मला पुन्हा पहिल्यापासून कामाला सुरवात करावी लागली. पुन्हा लोकांना कामासाठी फोन करावे लागले. वयाच्या अठराव्या वर्षी मी अभिनय करायला सुरवात केली होती, त्यानंतर सलग सहा वर्षे मी इंडस्ट्रीमध्ये काम केलं. त्या सहा वर्षांत मला कधीही कोणत्याही ऑडिशन किंवा लुक टेस्ट देण्याची गरज भासली नाही.

कारण लोकांनी माझं काम पाहिलं होतं आणि मला मालिकांसाठी समोरूनच फोन येत होते. प्रेग्नन्सीमध्ये मी दोन वर्षं गॅप घेतल्यामुळं पुन्हा काम सुरू करताना मला बऱ्याच ऑडिशन द्याव्या लागल्या. या दोन वर्षांच्या गॅपमध्ये इंडस्ट्रीमध्ये फार बदल झाले होते. तेव्हा मनात विचार आला, की मी पुन्हा एकदा नव्यानं कामाला सुरवात करतेच आहे, तर हिंदी इंडस्ट्रीमध्येही प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळं मी मराठीबरोबरच हिंदी इंडस्ट्रीमध्येही प्रयत्न करत होते. प्रेग्नन्सीनंतर मी मराठी इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केलं ते ‘कळत नकळत’ या मालिकेतून. त्यानंतर ‘स्वप्नांच्या पलीकडे’ या मालिकेतदेखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. मी छोट्या-छोट्या भूमिका करू लागले. कारण शुभवी लहान असल्यानं मालिकांसाठी मला महिन्यातले २५ दिवस पूर्णपणे वेळ देता येत नव्हता.

त्यामुळं छोट्या; पण चांगल्या आणि लक्षात राहण्यासारख्या भूमिका मी केल्या. माझं काम प्रेक्षकांना आवडत होतं. त्यानंतर मला हिंदीमधून चांगल्या ऑफर येऊ लागल्या. हिंदीमध्ये मी ‘वीर शिवाजी’ ही पहिली मालिका केली. कामाला सुरवात केल्यानंतर माझे आई-वडील, सासू-सासरे आणि पतीनं मला खूप सपोर्ट केल्यानं या सगळ्यामध्ये मी मानसिकरीत्या कुठंही खचले नाही. मी काम करत असताना माझी मुलगी माझ्या आई-वडिलांसोबत पुण्यात असायची. त्यामुळं शुभवीला भेटण्याची इच्छा होईल तेव्हा, मला तिला भेटायला पुण्याला जावं लागायचं. शुभवी तिच्या वयाच्या आठव्या वर्षापर्यंत पुण्यात होती. त्यामुळं त्या वेळी मला फुल लेन्थ भूमिका स्वीकारणं जमलं नाही. 

कमबॅकनंतर इंडस्ट्रीमध्ये बरेच बदल झाल्यानं मुख्य भूमिकेसाठी १८-१९ वर्षांच्या मुलींची निवड केली जायची. इंडस्ट्रीच्या बदलत्या रूपाप्रमाणं मला माझ्या वयाच्या भूमिका मिळत गेल्या. शुभवीला माझं चित्रीकरण पाहण्यासाठी सेटवर यायला खूप आवडतं. तिला मला टीव्हीवर काम करताना पाहून फार आनंद होतो. प्रेग्नन्सीमध्ये माझ्याही शरीरयष्टीमध्ये थोडेफार बदल झाले होते. सहा महिने मी स्वतःकडं जास्त लक्ष दिलं नाही. माझं जास्त लक्ष बाळकडंच असायचं. सहा महिन्यांनंतर मी स्वतःला मेंटेन करायला सुरवात केली. मला जिम करायला आवडत नाही. त्यामुळं मी स्वतःला मेंटेन करायला होम वर्कआउट, वॉक आणि डाएट सुरू केलं. मी एका वर्षात जवळजवळ १२ ते १५ किलो वजन कमी केलं. याचा मला नंतर बराच फायदा झाला. शुभवीला शॉपिंग करायला खूप आवडतं. मला सुटी असते, तेव्हा मी तिला घेऊन शॉपिंगला जाते, आम्ही खूप फिरतो आणि मजा करतो. 
(शब्दांकन - स्नेहल सांबरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cum Back Mom Chaitrali Gupte maitrin supplement sakal pune today