रमणीय रेवदंडा

राज्यकर्ते बदलले तरी वास्तू टिकतात, त्यामुळे रेवदंड्याच्या किनाऱ्यावरील सद्यस्थितीत आढळणाऱ्या वास्तू पोर्तुगीजकाळातील व त्या शैलीचा प्रभाव
current architecture on banks of Revdanda influenced by Portuguese  history
current architecture on banks of Revdanda influenced by Portuguese historysakal

अंजली कलमदानी

अनेक राज्यकर्त्यांनी निरनिराळ्या कालखंडात ही ठिकाणं काबीज करण्यासाठी लढाया केल्या आणि स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्या त्या शैलीचा वास्तुरूपी ठसा स्वतःच्या कारकीर्दीत उमटवला.

राज्यकर्ते बदलले तरी वास्तू टिकतात, त्यामुळे रेवदंड्याच्या किनाऱ्यावरील सद्यस्थितीत आढळणाऱ्या वास्तू पोर्तुगीजकाळातील व त्या शैलीचा प्रभाव असणाऱ्या आहेत. महाराष्ट्राच्या रमणीय पश्चिम किनाऱ्यावर आहे रेवदंडा.

अलिबागच्या दक्षिणेला १७ किलोमीटरवर रेवदंडा भरगच्च वनराजीत विसावला आहे. कोकणात रेवदंड्याचा उल्लेख चौल-रेवदंडा असा एकत्रित केला जातो. ही दोन्ही स्वतंत्र गावं असली तरी ऐतिहासिक घटनांच्या बाबतीतही त्यांचा उल्लेख एकत्रितरीत्या आढळतो.

रायगड जिल्ह्याच्या गॅझेटिअरमधील नोंदीवरून सन १३० पासून ते १७६८ पर्यंत चौल हे ऐतिहासिक घटनांचं व व्यापाराचं प्रसिद्ध बंदर होतं. प्राचीन काळी या भागाला चंपावती व रेवतीक्षेत्र असं म्हणत असावेत.

चंपावती व रेवती या नावानं गुजरातमध्ये श्रीकृष्णाचं राज्य होतं. त्या पौराणिक काळाशी स्थानिक लोक चौलचा संबंध जोडतात. पश्चिम किनाऱ्यावरील अशा सौंदर्यपूर्ण व समृद्ध जागांवर परकीय राज्यकर्त्यांची नजर पडली नसती तरच नवल.

‘कोकणात शिलाहारांचा राजपुत्र झुंज हा राज्य करत आहे,’ असं अरब प्रवासी मसूदी यानं सन ९१५ मध्ये नमूद केलं आहे. सन ९७० मध्ये तिथं हिंदूंशिवाय मुसलमानही मोठ्या संख्येनं होते, तसंच नारळ, कांदे, तांदूळ इत्यादींचं अमाप उत्पन्न होत असे असा उल्लेख काही प्रवाशांनी केला आहे.

सन १५०५ मध्ये पोर्तुगीज हे चौल इथं आले व त्यांनी मुसलमानांचा पाडाव करून हळूहळू आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. या काळात काही राजवटींनी पोर्तुगीजांशी जुळवून घेतलं, तर काहींनी विरोध केला. मात्र, १५०९ नंतर पोर्तुगीजांनी आपला प्रभाव पूर्णतः सिद्ध केला.

सन १७३९ मध्ये वसई मराठ्यांच्या ताब्यात गेल्यावर, पुढं आपला टिकाव लागणार नाही, हे जाणून पोर्तुगीजांनी आगरकोट ब्रिटिशांना दिला. सन १७४० मध्ये तह होऊन चौल प्रदेश मराठ्यांना मिळाला व पोर्तुगीज गोव्याला गेले.

पोर्तुगीज, निजामशहा, आदिलशहा, सिद्दी, फ्रेंच, ब्रिटिश यांनी आलटून-पालटून लढाया करत चौल-रेवदंड्यावर आपापलं वर्चस्व गाजवलं. कारण, चौल-रेवदंड्याला व्यापारामुळे लाभलेली समृद्धी, नैसर्गिक सौंदर्य आणि वैशिष्ट्यपूर्ण असा समुद्रकिनारा. रेवदंड्याचा उल्लेख इतिहासात ‘लोअर चेऊल’, ‘नॉर्थ चेऊल’ किंवा ‘पोर्तुगीज चेऊल’ (चौल) असा आढळतो.

त्या काळी सुरत व गोव्यादरम्यान चौल हे मोठं व्यापारीकेंद्र होतं. तत्कालीन पर्शिया, अरेबिया इथं समुद्रमार्गे नारळ, सुती कापड, रेशीम जात असे व तिथून खजूर, घोडे आयात होत असत. एका डच प्रवाशानं चौलचा उल्लेख ‘तटबंदी असलेलं व्यापारासाठीचं प्रसिद्ध शहर’ असा केला आहे. खंबायत, सिंध, बंगाल मस्कत इथल्या व्यापारांना हे शहर परिचित असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

तिथले श्रीमंत व्यापारी हिरे-माणकांचा व्यापार करत व चीनहून रेशीम आयात करून त्याचे झगे, नक्षीदार बिछाने तयार करत. सन १५८६ मध्ये व्हेनिसहून आलेला प्रवासी सिडर फ्रेडरिक यानं रेवदंड्याला ‘सर्व बाजूंनी भक्कम सुरक्षित भिंत असलेलं पोर्तुगीज शहर’ असं म्हटलेलं आहे. या वर्णनावरून लक्षात येतं की एकेकाळी इथं व्यापाराची गजबज होती.

एकेकाळी समृद्धीनं गजबजलेला रेवदंड्याचा किनारा सध्या मात्र भग्नावशेष सांभाळत शांत झाला आहे. पोर्तुगीज आगरकोट तटबंदीमध्ये वसलेलं गाव अजूनही अस्तित्वात आहे. इथल्या भग्न इमारतीच्या आवारात सहज फेरफटका मारला तर चिनी मातीच्या भांड्यांचे तुकडे आजही सहज सापडतात. भक्कम तटबंदीच्या आगरकोटात अनेक इमारती पोर्तुगीजांच्या काळी होत्या.

घडीव दगडांच्या इमारतींमध्ये सेनाधिकारी राहत. इथं दोन शस्त्रागारं होती. किल्ल्याला पंधरा बाजू व ११ बुरुज असल्याची नोंद आहे. असंख्य तोफा व श्रीमंत वस्तीसाठी विशेष सुरक्षित तट व तोफांची सोय होती. पोर्तुगीजकाळातील फॅक्टरी किंवा उंच चौकोनी बुरुज अजूनही अस्तित्वात आहेत. त्या काळी उंच इमारती बांधल्या जात याचा पुरावा अजूनही शिल्लक आहे.

भक्कम व सुरेख घडीव चिऱ्यांनी योग्य प्रमाणबद्धता राखून बांधलेल्या इमारतीचे अवशेष पाहताना प्रगत बांधकामतंत्राची जाणीव होते. सेंट झेविअर चॅपेलचा भव्यपणा व रेखीवपणा अवशेषांमधून प्रतीत होतो. दगडांमधील भव्य कमानी, त्यांवरील कलाकुसर वास्तुकलेतील समृद्धता दर्शवते.

तटबंदीच्या कमानी अजूनही सुस्थितीत असून त्यावर पोर्तुगीज-बोधचिन्हं आहेत. व्यापारामुळे आलेल्या समृद्धीचा अंदाज त्या काळी उभारलेल्या वास्तूच्या भव्यतेमधून, बांधकामशैलीवरून व तंत्रावरून बांधता येतो. चॅपेलच्या कमानी बांधताना वॉल्ट पद्धतीचा अवलंब करून खांबविरहित भव्य दालनाची रचना केल्याचं दिसून येतं.

आगरकोटात आज अस्तित्वात असलेल्या घराबाहेर लोखंडी गोळे पाहून आश्चर्य वाटतं; परंतु इतिहासाच्या पानांत डोकावल्यावर ‘आगरकोटात चौथ्या गुजरात बुरुजावर १८ दगडी गोळा फेकणारी कॅमल तोफ व ६५ पाऊंड लोखंडी गोळा फेकणारी तोफ होती, सातव्या बुरुजावर ४० पाऊंड वजनाचे गोळे फेकणारी गरुड तोफ व ५० पाऊंड वजनाचे गोळे फेकणाऱ्या दोन तोफा होत्या’ अशी तोफांबद्दलची सविस्तर वर्णनं आढळून येतात.

पोर्तुगीज-इमारतीखेरीज मंदिरं, मशीद, चर्च अशा अनेक इमारती व शिलालेख या भागात आहेत; पण दुर्दैवानं हा परिसर अतिशय दुर्लक्षित, निर्मनुष्य आहे. पुरातत्त्व खात्याच्या पाट्या त्यांची मालकी प्रस्थापित करतात; परंतु एका कालखंडाचा इतिहास सांगणारा, वास्तुकलेतील वैशिष्ट्यपूर्ण विविधता दाखवणारा हा परिसर जतन करावा याची काळजी कुणालाच नाही.

नवनवीन पर्यटनस्थळं विकसित करण्यासाठी सरकारकडून निधी दिला जातो. त्यामध्ये पर्यटकांच्या सुविधांना प्राधान्य दिलं जातं; परंतु पर्यटनाचाच भाग असणारी अशी अनेक ठिकाणं मूलभूत सुरक्षेपासून व संवर्धनापासून वंचित राहतात. हा वारसा दुर्लक्षित राहिल्यामुळे कालांतरानं नाहीसा होईल व एका कालखंडाचा इतिहास फक्त गॅझेटिअरच्या पानांमधून वाचण्यापुरता राहील.

शतकं पुढं सरकतात...राजवटी बदलतात...परंतु राजवटींचा वारसा वास्तुरूपानं शिल्लक राहतो. त्याच्या उर्वरित भागाचं जतन-संवर्धन झालं तर इतिहासाशी संदर्भ जोडणं व त्या काळातील जीवनशैलीचा अंदाज बांधणं शक्य होतं. रेवदंड्याच्या इतिहासाला व वास्तुकलेला काळाचे अनेक पदर आहेत. त्यांचं योग्य विवेचन करणारं केंद्र तिथं असणं आवश्यक आहे.

कोकणाकडे सध्या पर्यटनाचा ओघ वाढतो आहे; पण हे पर्यटन फक्त समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी व नारळी-पोफळीचं नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी विकसित झालं तर तिथली अलौकिक वास्तुसौंदर्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचणार नाही व त्याच्या अनुभवाचा आनंदही घेता येणार नाही. रमणीय रेवदंड्याचं वास्तुरूपी सौंदर्य आणि पर्यायानं एकेकाळचे उर्वरित सांस्कृतिक धागेदोरे जपले गेले तर पर्यटनाचा आनंदही द्विगुणित होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com