esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : आषाढ शुद्ध १, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी ६.५८, चंद्रास्त रात्री ८.३३, चंद्रदर्शन, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, भारतीय सौर आषाढ २० शके १९४३.

दिनविशेष -

जागतिक लोकसंख्या दिन

१६६७ - अंबरच्या राजघराण्यातील मिर्झाराजे जयसिंह यांचे निधन. शिवाजी महाराजांविरुद्ध पाठविलेल्या मोगल फौजेचे ते सेनापती होते.

१८८९ - प्रसिद्ध कादंबरीकार नारायण हरी आपटे यांचा जन्म. ‘सुखाचा मूलमंत्र’, ‘पहाटेपूर्वीचा काळोख’, ‘उमज पडेल तर’, ‘ एकटी’ या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबऱ्या होत.

१९२१ - ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात यांचा जन्म. त्यांनी दहा कादंबऱ्या, बारा कथासंग्रह, पाच ललित लेख संग्रह व काही वैचारिक लेखसंग्रह लिहिले. महाराष्ट्रात विद्यापीठे स्थापन होऊन १४३ वर्षे झाल्यानंतर दलित समाजातील पहिले कुलगुरू होण्याचा मान त्यांना मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू होते.

१९३० - विख्यात क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी ३०९ धावा करून विक्रम प्रस्थापित केला.

१९५७ - इस्लाम धर्माच्या शिया पंथातील ‘निझारी इस्रायली’ या एका उपपंथाचे प्रमुख प्रिन्स आगाखान (तिसरे) सुलतान सर मुहंमद शाह यांचे स्वित्झर्लंडमध्ये निधन. त्यांच्याच पुणे येथील प्रासादात ब्रिटिशांनी महात्मा गांधींना स्थानबद्ध केले होते. पुढे आगाखान यांनी हा महाल गांधी स्मारकासाठी दिला.

१९७९ - अमेरिकेची ‘स्कायलॅब’ ही अंतराळातील प्रचंड प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमाराला ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला हिंदी महासागरात कोसळली. तिचे सुमारे एक हजार अवशेष ऑस्ट्रेलियात विविध ठिकाणी पडले, मात्र कोठेही प्राणहानी झाली नाही. ते अवशेष उत्तर अमेरिकेत व आग्नेय कॅनडा या दाट लोकवस्तीच्या भागात पडू नयेत, यासाठी दुपारी एक वाजून ५५ मिनिटांनी तिची दिशा बदलण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळविले.

१९९२ - ज्येष्ठ पत्रकार व अर्थतज्ज्ञ गोविंद मंगेश लाड यांचे निधन. मुंबई मराठी पत्रकार संघाचे ते पहिले विश्वस्त होत.

१९९४ - रणांगणातील असामान्य कामगिरीबद्दलचा ‘परमवीरचक्र’ हा सर्वोच्च सन्मान मिळविणारे मेजर (निवृत्त) रामराव राघोबा राणे यांचे निधन. हा गौरव मिळविणारे ‘बाँबे सॅपर्स’चे आणि महाराष्ट्रातील ते एकमेव लष्करी अधिकारी होते.

१९९४ - दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर.

१९९७ - कोल्हापुरातील ज्येष्ठ कुस्तीगीर आणि हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविलेले मल्ल के. डी. माणगावे यांचे निधन.

२००३ - लोकप्रिय लेखक व रहस्यकथाकार सुहास शिरवळकर यांचे निधन. ‘पहाटवारा’, ‘झूम’, ‘मधुचंद्र’, ‘हमखास’, ‘जाता-येता’, ‘क्षितिज’, ‘कल्पांत’, ‘कळप’ यांसारख्या त्यांच्या ७१ कादंबऱ्यांना व ११ कथासंग्रहांना वाचकांकडून सतत मागणी असते.

२००३ - ज्येष्ठ साहित्यिक, ‘तमस’कार भीष्म साहनी यांचे निधन. त्यांच्या ‘तमस’ या कादंबरीवर आधारित दूरदर्शनवरील मालिका खूप गाजली होती. या कादंबरीचा १९८८ मध्ये इंग्रजीत अनुवाद झाला. त्यानंतर या कलाकृतीची जगभरातील वाचकांकडून प्रशंसा करण्यात आली.

२००३ - अठरा महिन्यांच्या खंडानंतर भारत व पाकिस्तान दरम्यान बससेवा पूर्ववत सुरू झाली.

२००४ - उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे पॅंथर नामाभिधान प्राप्त झालेले चंदू बोर्डे यांचा पूना क्‍लबतर्फे गौरव. या क्‍लबच्या पॅव्हेलियनला बोर्डे यांचे नाव देऊन सुनील गावसकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

दिनमान -

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृषभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : काहींना अचानक धनलाभ. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणाल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल.

सिंह : दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

तूळ : मनोबल वाढविणारी घटना घडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

धनू : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

मकर : उत्साह, उमेद वाढेल. आरोग्य चांगले राहील.

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

loading image