अध्यात्म, वास्तविकता अन्‌ तणाव व्यवस्थापनाचा त्रिवेणी संगम किल्ले 'सज्जनगड'

Sajjangad fort
Sajjangad fortesakal

लेखक : देवदत्त गोखले

सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी (उर्वशी) नदीच्या खोऱ्यात समर्थ रामदास स्वामींच्या सहवासाने पावन झालेला सज्जनगड म्हणजेच परळी हा दुर्ग उभा आहे. समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami) सज्जनगडावर वास्तव्यास होते. सज्जनगड (Sajjangad) म्हणजे सकारात्मक विचार आणि कंपनांचे निरंतर स्रोत असल्याची अनुभूती इथे भेट दिल्यावर येते. या किल्ल्याने कठीण प्रसंगी मार्ग दाखवण्याचे काम आणि तणाव हाताळण्यास मदत केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) सज्जनगडावर येऊन गेल्याचे उल्लेख आढळतात.

स्वराज्याच्या महायज्ञात अनेक विभूती आपली मते व्यक्त करीत असत. समर्थांना राजकारणाची देखील उत्तम जाण होती. हिंदवी स्वराज्यासंबंधी देखील त्यांनी अनेक सूचना केल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज हे देखील मोठ्या मनाने आणि विचारपूर्वक या सूचनांकडे लक्ष देऊन स्वराज्य वाढविण्यासाठी आणि बळकटीसाठी यांचा उपयोग करीत. छत्रपती संभाजी महाराज देखील सज्जनगडावर येऊन गेल्याची माहिती उपलब्ध आहेच. कठीण प्रसंगाचं व्यवस्थापन आणि सकारात्मक विचार कसा करावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर समर्थांनी छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेलं पत्र. या पत्रात त्यांनी शिवरायांची महती सांगत त्यांचा उल्लेख “यशवंत कीर्तीवंत.. सामर्थ्यवंत वरदवंत... पुण्यवंत आणि नीतिवंत.. जाणता राजा” असा केला होता. या पत्राचा छत्रपती संभाजी महाराजांना एक राज्यकर्ता म्हणून निश्चितच उपयोग झाला असावा, यात शंका नाही.

Sajjangad fort
कल्पक आणि सर्जनशील विचारांचे माहेरघर : किल्ले पन्हाळगड

आपल्या कार्यस्थळी सुद्धा अनेक कठीण प्रसंग येतात. कामाचा ताण असू शकतो. अशा तणावापासून दूर जाण्यापेक्षा तो योग्यप्रकारे हाताळणे महत्त्वाचे आहे. तणाव व्यवस्थापनाचे तंत्र प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे असू शकते. परंतु, ताण असूच नये, असे म्हणणे सुद्धा चुकीचेच आहे. सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे ताण असतात. सकारात्मक ताण आपले काम चांगल्या प्रकारे करण्यासाठी मदत करतो. हाच ताण नकारात्मक होऊ नये, ही काळजी आपण घेतली पाहिजे.
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. समर्थांच्या निर्वाणानंतर संभाजी महाराजांच्या पुढाकारातून भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामाचे मंदिर उभारले गेले. गडावर समर्थशिष्य कल्याण स्वामींचे मंदिर, मारुती आणि गौतमीची मंदिरे, राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती, तसेच मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती,आणि समर्थांची धातूची मूर्ती आहे. भुयारात समर्थांचे समाधिस्थान आहे. गडावर शिरतांना पहिला दरवाजा ‘छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार’ या नावाने ओळखला जातो. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला ‘श्री समर्थ महाद्वार’ असे म्हणतात. आजही हे दरवाजे सूर्यास्तानंतर बंद होतात. गडावर प्रवेश करण्याअगोदर उजवीकडे थोडं पुढे गेल्यावर एक घळ लागते. ही समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. श्रीराम मंदिरालगतच अशोकवन, वेणाबाईचे वृंदावन, ओवऱ्या, अक्काबाईचे वृंदावन, आणि समर्थांचा मठ या वास्तू आहेत. जीर्णोद्धार केलेल्या मठात समर्थांच्या अनेक वस्तू, तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, प्रताप मारुतीची मूर्ती आहे.

सज्जनगडाचे वातावरण आध्यात्मिक लहरींनी भारलेले आहे. काही ठराविक प्रसंगी छत्रपती सज्जनगडावर येऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. इथल्या भेटीमुळे अधिक सकारात्मक विचारांसाठी ऊर्जा प्राप्त होत असल्याचे अनेकांचे अनुभव आहेत. पण सज्जनगड हा केवळ तेथील मंदिरांमुळे अथवा दैनंदिन आध्यात्मिक कृतींमुळे सकारात्मकतेने भारला आहे असे नाही, तर अनेक कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेले विचार आणि दिशा इथे मिळू शकते. समर्थ रामदास स्वामींचे केवळ अध्यात्मावर प्रभुत्व होते असे नाही, तर राजकारणाची देखील त्यांना उत्तम जाण होती.

Sajjangad fort
कर्तव्याची जाणीव आणि निष्ठा गर्जे किल्ले सिंहगडावर!

अनेक अडचणी आणि संकटांवर त्यांनी उपाय सुचविले होते. व्यवहार व आध्यात्मिक शक्ती यांची ते योग्य सांगड घालत. किल्ले सज्जनगड सकारात्मक ऊर्जा आणि कंपनांचा स्रोत असल्यामुळे अध्यात्म, वास्तविकता, अन्‌ तणाव व्यवस्थापनाचा त्रिवेणी संगमच इथे अनुभवायला मिळतो.

(लेखक गोखलेज अॅडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (‘गती’), जळगावचे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com