'दो शेरों के बीच खडा हूँ!' (देवेंद्र फडणवीस)

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
रविवार, 19 ऑगस्ट 2018

अटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली.
प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि माझ्या भावाला त्यांच्या दोन्ही बाजूंना उभं केलं. छायाचित्र काढलं गेलं. आम्ही खूश. खरं तर हवेतच! तेवढ्यात आमचे बाबा तिथं पोचले. अटलजींनीच त्यांना हाक मारली आणि म्हणाले : ""गंगाधररावजी, मैं इन दो शेरों के बीच खडा हूँ!''

अटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली.
प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि माझ्या भावाला त्यांच्या दोन्ही बाजूंना उभं केलं. छायाचित्र काढलं गेलं. आम्ही खूश. खरं तर हवेतच! तेवढ्यात आमचे बाबा तिथं पोचले. अटलजींनीच त्यांना हाक मारली आणि म्हणाले : ""गंगाधररावजी, मैं इन दो शेरों के बीच खडा हूँ!''

सार्वजनिक जीवनात आमच्या पक्षाची, म्हणजेच भारतीय जनता पक्षाची, वाटचाल सुरू झाली ती अत्यंत प्रतिकूल वातावरणात. मी त्या वेळी लहान होतो. आणीबाणीच्या काळात बाबा, माझे वडील कारागृहात होते. आई घराचा कारभार चालवायची. वाट खडतर होती; पण ध्येयावरची निष्ठा किंचितही ढळली नव्हती. ध्येयवेड्यांच्या या काफल्याचे नायक होते अटलबिहारी वाजपेयी. आमचे अटलजी! ते आमचे देव होते...
माझ्या वाढत्या वयातला काळ त्यांच्या ओघवत्या वक्‍तृत्वाच्या छत्रछायेतला होता. त्यांच्या कविता मला लहान वयात पाठ होत्या. मी शाळकरी वयाचा असताना नागपुरात पक्षाचं अधिवेशन होतं. सगळे बडे नेते नागपुरात येणार होते. बाबा अधिवेशनाच्या व्यवस्थेच्या गडबडीत होते. कार्यकर्ते झटत होते. तयारी पूर्ण होत होती. "या संधीचा लाभ घेत अटलजींसमवेत छायाचित्र काढून घ्यायचंच,' असं मी आणि माझ्या भावानं ठरवून टाकलं होतं. त्यासाठी बाबांच्या खूप मागं लागलो; पण ते काही बधेनात. ओळखीचा लाभ घेत अटलजींसमवेत आपल्या मुलांचं छायाचित्र काढून घेण्याचा हट्ट पुरवणं त्यांच्या स्वभावात नव्हतंच. पहिला दिवस तर तसाच गेला. छायाचित्र काही काढून घेता आलं नाही.

"या मार्गानं काही आपलं काम व्हायचं नाही,' हे माझ्या दुसऱ्या दिवशी लक्षात आलं.
मग मी प्रमोद महाजन यांच्याकडं लग्गा लावायला सुरवात केली. त्या काळात पक्षाचा पसारा छोटा होता. साधनं नव्हती. त्यामुळे प्रमोदजी मोठे नेते; पण उतरायचे आमच्याच घरी. ओळख होतीच.
""आम्हाला अटलजींबरोबर छायाचित्र काढून घ्यायचं आहे,'' आम्ही प्रमोदजींना सांगितलं. त्यांनी आमची अटलजींशी ओळख करून दिली आणि "या मुलांना तुमच्याबरोबर छायाचित्र काढून घ्यायचं आहे,' असं त्यांना सांगितलं.
अटलजींनी लगेच आम्हा दोघा भावांना त्यांच्या दोन्ही बाजूंना उभं केलं. छायाचित्र काढलं गेलं. आम्ही खूश. खरं तर हवेतच! तेवढ्यात आमचे बाबा तिथं पोचले. अटलजींनीच त्यांना हाक मारली आणि म्हणाले : ""गंगाधररावजी, मैं इन दो शेरों के बीच खडा हूँ!''
***

नंतर मी पक्षकार्य करू लागलो. जबाबदाऱ्या पार पाडू लागलो. नगरसेवक आलो, महापौर झालो अन्‌ पाठोपाठ आमदारही. प्रसिद्ध छायाचित्रकार विवेक रानडे हा माझा मित्र. त्यानं गंमत म्हणून माझी छायाचित्रं काढली अन्‌ कशी कुणास ठाऊक; पण त्या छायाचित्राची पोस्टर्स कुणीतरी छापून घेतली. मोठमोठ्या जाहिराती नागपुरात झळकू लागल्या. मी अवाक्‌ झालो अन्‌ काही दिवस नागपुरातून गायबही! खूप चर्चा सुरू होती त्या छायाचित्रांची.

सगळं शांत झालं आहे अन्‌ लोक आता त्या जाहिराती विसरले आहेत, अशी खातरजमा करून घेतल्यानंतर मी मतदारसंघात हिंडू लागलो. अचानक एक दिवस अप्पाकाकांचा दिल्लीहून फोन आला. अप्पाकाका म्हणजे एन. एम. घटाटे. हे दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे घटनातज्ज्ञ. अटलजींचे जवळचे मित्र. ते नागपूरचे असल्यानं आमच्या कुटुंबाचेही सुहृद.
अप्पाकाका मला म्हणाले ः ""तू दिल्लीला ये. अटलजींनी बोलावलं आहे.''
नेमकं काय झालं आहे, ते मला काहीच कळेना; पण अटलजींनी बोलावलं होतं, तेव्हा जाणं तर भागच होतं. दिल्लीत पोचलो. अटलजींच्या घरी गेलो. ते म्हणाले : ""आईये, आईये... मॉडेल एमएलएजी! कैसे हो आप?'' झाला प्रकार माझ्या लक्षात आला आणि मी कसनुसा हसलो. त्यांना अभिवादन केलं. ताण हलका करत अटलजी म्हणाले : ""आप एमएलए तो थेही, लेकिन अब मॉडेल भी बन गये!''
मिश्‍किल कोट्या करत अटलजींनी जुन्या आठवणी जागवल्या. त्या वेळी माझ्या बाबांना बरं नव्हतं. आजारपण गुंतागुंतीचं होतं. बाबांना भेटायला अटलजी दोनदा आवर्जून आले होते.
""पोहे करा, मला खूप आवडतात,'' असं पूर्वी एकदा माझ्या आईला सांगून खास मराठी पदार्थांची चव चाखून गेले होते.
***
नंतर नंतर अटलजींच्या भेटी कमी होत गेल्या. ते सार्वजनिक जीवनातून जवळपास निवृत्त झाले होते. मी दिल्लीला गेलो तेव्हा एकदा त्यांच्या निवासस्थानी डोकावलो. विनम्रपणे नतमस्तक झालो. अटलजींनी लावलेल्या पक्षाचा वेलू आता चांगलाच विस्तारला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढवला होता. आता भाजपची सत्ता बहुतांश राज्यांत आहे. अटलजी आता आपल्यात राहिले नाहीत. अटलजींनी पक्षासाठी केलेल्या परिश्रमांची अशा दुःखाच्या प्रसंगी आठवण होते. त्यांची प्रगल्भता, निर्णयक्षमता लक्षात येते आणि थक्‍क व्हायला होतं.

 मृदू आणि कठोर ः दोन पैलू
पाकिस्तानशी मैत्रीचा हात पुढं करणारे, उपखंडात शांततापर्व निर्माण करू पाहणारे कविहृदयी राजकीय नेते होते अटलजी. मात्र, त्यांच्या या सकारात्मक प्रयत्नांना प्रतिसाद देण्याऐवजी शेजारीदेश कुरापती काढत आहेत हे दिसताच कारगिलचं युद्ध छेडत शत्रुपक्षाला नमवणारे धडाडीचे कठोर प्रशासकही होते ते. "आपण मित्र निवडू शकतो; शेजारी नव्हे' अशी परिस्थितीची जाणीव असलेले नेते; पण "राष्ट्र अजेय असावं' याची जाणीव ठेवणारे पंतप्रधानही! अणुचाचणीची सज्जता भारतानं केली होतीच; पण राजकीय निर्णय होत नव्हता. पंतप्रधानपद सांभाळणारे नेते कचरत होते. डॉ. अब्दुल कलाम यांच्यासारख्या ऋषितुल्य शास्त्रज्ञानं अटलजींना भेटून जेव्हा "पोखरण'चा प्रस्ताव त्यांच्यापुढं ठेवला, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता अटलजींनी होकार दिला होता. विदेशी महासत्ता निर्बंध लादतील, याची अजिबात तमा न बाळगता अटलजींनी चाचण्यांना देकार दिला. याबाबत ते अत्यंत स्पष्ट होते, महासत्ता होण्याचा मार्ग त्यांना चोखाळायचा होताच. शंभर कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशावर कोणताही देश फार काळ निर्बंध लादू शकत नाही, याची त्यांना खात्री होती. दोन ते अडीच वर्षांत सगळ्या देशांनी निर्बंध मागं घेतले. अटलजींना सामाजिक वास्तवाचीही जाण होती. पंतप्रधानपदी असताना दारिद्य्रनिर्मूलनाच्या कामावर त्यांनी सर्वाधिक भर दिला होता. "ग्रामसडक योजने'चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी हाती घेतला तेव्हा ते म्हणाले होते ः "रस्त्यावर होणारा खर्च गावागावात समृद्धी आणेल, उत्पन्न वाढेल, अर्थव्यवस्थेला बरकत येईल, या सडकेचा वापर करूनच गावात इमारती उभारल्या जातील, शिक्षण पोचेल, तिथं शिक्षक जातील, दवाखाने उभारले जातील. डॉक्‍टर पोचतील.'

"सुवर्णचतुष्कोण' ही भारताची चारही टोकं जोडण्याची योजना क्रांतिकारी होती.
अटलजींना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. सहकारीपक्षांनाही त्या निवडणुकीत फार यश लाभलं नाही. संयुक्‍त पुरोगामी लोकशाही आघाडी सत्तेत आली. त्या सरकारनं आर्थिक अहवाल प्रकाशित केला तेव्हा, 2007 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात तब्बल सहा कोटी रोजगार निर्माण झाले, हे आकडेवारी देत मान्य केलं होतं.

विशाल हृदयाचा हा नेता आपल्यासोबत असावा, अशी आम्हा सगळ्यांची इच्छा होती. आज भारताचा परमवैभवाचा प्रवास अतिशय वेगानं सुरू आहे. या परमवैभवाचा पाया ज्यांनी रचला ते अशा वेळी आपल्यात हवे होते. मात्र, आज ते आपल्यात नाहीत, हे सत्य स्वीकारताना मन कठोर करावं लागत आहे.
अटल, अढळ, अचल असलेलं हे नेतृत्व भारताच्या दिशादिशांत वास करत राहील, याची मला खात्री आहे!
अटलजींच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली.

(शब्दांकन ः मृणालिनी नानिवडेकर)

Web Title: devendra fadnavis write atal bihari vajpayee article in saptarang