Loksabha 2019 : 'राज'स्ट्राईकमुळे भाजप घायाळ

धनंजय बिजले
रविवार, 7 एप्रिल 2019

राज नेमके काय साधणार ?
मोदी-शहा यांच्यावर तुफान टीका करून ठाकरे काय साधत आहेत असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. मात्र आपली भाजपविरोधी मते वाया जावू न देता त्याचा राजकीय लाभ घेण्याचा ठाकरे यांचा हा वेगळा प्रयोग आहे. समजा यदा कदाचित त्यांच्या मतांमुळे युतीचे काही उमेदवार पडले तर भविष्यात विधानसभेला ठाकरे यांना मोठा फायदा होणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आजच्या घडीला काही भूमिका घेतली नाही तर राजकीयदृष्ट्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखे होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील स्वतःची स्पेस कायम ठेवण्यासाठी त्यांना कोणती तरी भूमिका घेणे भाग होते. त्यात त्यांनी हा अनोखा प्रयोग केला आहे. भविष्यात त्याचे यश अपय़श दिसून येईल.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील पाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करून भाजपवर जबरदस्त सर्जिकल स्ट्राईक केला. या त्यांच्या हल्ल्याने भाजपला पुरते घायाळ केले असून मुबंईतील भाजप उमेदवारांच्या पोटात गोळाच आला असेल यात शंका नाही. 

मनसेची दिशा ठाकरे यांनी कालच्या मेळाव्यात अधिक सविस्तर व आक्रमकपणे स्पष्ट करून मनसेच्या कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश तर दिलाच आहे. त्याहीपेक्षा विरोधकांनाही खणखणीत उत्तर देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. येत्या काही दिवसांत दहा सभा घेवून राज्यभर प्रचाराचा धडाका लावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या हल्ल्यात भाजप पुरता घायाळ होण्याची चिन्हे आहेत. 

टीव्ही आणि सोशल मिडीयाच्या या काळात सभांना फारशी गर्दी होत नसल्याचे चित्र आहे. वर्धा येथे पंतप्रधान मोदी यांच्या सभेला फारशी गर्दी नव्हती. त्याची उलटसुलट चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर मनसेच्या मेळाव्याला उपस्थित असलेला प्रचंड जनसुमदाय हा राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारा होता यात शंका नाही. 

सभेचे बदलते स्वरूप
ठाकरे यांनी काल तब्बल ९० मिनिटे भाषण केले. त्यात साठ मिनिटे ते मोदी यांच्याविरुद्धच बोलले. यावरून त्यांनी आपली टीका पिनपाईंटेड कशी होईल याची दक्षता घेतल्याचे जाणवले. कालच्या सभेत त्यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या प्रत्येक आश्वासनाचे पुराव्यानिशी वाभाडे काढले. यासाठी त्यांनी आधुनिक तंत्राचा आधार घेतला. सभेचे स्वरूप इतरांपेक्षा वेगळे कसे होईल याकडेही त्यांनी लक्ष दिले आहे. राज ठाकरे यांचे वक्तृत्व वादातीत आहे. आज त्यांच्या तोडीचा प्रभावी वक्ता राज्यात तरी नाही. पण सलग तासभर नुसते बोलत राहिले तर समोरचे तसेच टीव्ही व फेसबुक लाईव्ह वरून भाषण पाहणारे श्रोते कंटाळू शकतात याचे भान ठेवत ठाकरे व्हिडीओ क्लिपचा प्रभावी वापर करत आहेत. एकूणच प्रचाराचे हे नवे तंत्र त्यांनी प्रथमच आणले आहे. यामुळे त्यांच्या टीकेला आधार तर मिळतोच शिवाय सभा एकसुरी बनत नाही. 

मतांवर परिणार किती
राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी नवी नाही. मात्र त्या सभेचे मतांत किती परिवर्तन होणार हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. याही वेळेस तो विचारला जाणार. त्यातच यावेळी त्यांनी आपल्या पक्षाचा एकही उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे ज्यावेळी भाजप-शिवसेनेला मत देवू नका असे आवाहन ज्यावेळी ठाकरे करतात त्यावेळी ही मते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारड्यात टाका असेच त्यांना म्हणायचे असते. त्यामुळे कट्टर मनसे सैनिक असे करणार का? त्यांना ही भूमिका रुचणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. ठाकरे यांनाही याची चांगली कल्पना आहेच. म्हणूनच त्यांनी याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही काँग्रेसला पाठिंबा दिला होता याची आठवण करून दिली. त्याचप्रमाणे भाजप-शिवसेना तरी कुठे एकमेकांचा मनापासून प्रचार करतेय यावर बोट ठेवले. 

आपली ही भूमिका केवळ लोकसभा निवडणुकीपुरती असल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले. या भूमिकेचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला एकदा झाला तर काय बिघडते असा रोकडा सवाल करत समर्थकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याला नक्कीच यश मिळेल अशी शक्यता आता निर्माण होवू लागली आहे.
मुळात अशा प्रकारे भूमिका घेत एखादा पक्ष किंवा नेता रणांगणात उतरjल्याचे महाराष्ट्र प्रथमच अनुभवत आहे.  

मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या शहरी भागांत मनसेची मोठी व्होट बँक आहे. तेथील मनसेची मते भाजप-शिवसेनेने यावेळी गृहीत धरली होती. त्याला आता निम्म्याने तरी नक्कीच खिंडार पडेल अशी भिती युतीच्या नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे युतीच्या त्यातही भाजपच्या उमेदवारांच्या पोटात गोळा आला असेल यात शंकाच नाही. राज यांच्या सांगण्यानुसार त्यांची मते भाजपला विरोधात गेल्यास मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये वेगळा निकाल लागू शकतो. 

आघाडीचा असा फायदा
आज काँग्रेस-राष्ट्रवादीकडे राज्याच्या पातळीवर प्रचंड गर्दी खेचणारा नेता नाही. शिवाय मोदींच्या धोरणावर त्यांच्या नेत्यांनी टीका केली तरी ती अध्यारुतच मानली जाते. अशावेळी राज ठाकरे यांच्या रुपाने आघाडीला हुकमी एक्का मिळाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते जे बोलू शकत नाहीत ते राज ठाकरे विनधास्तपणे व अधिक प्रभावीपणे बोलत आहेत. मग ते बालाकोट हल्ल्याचे पुरावे असो किंवा एफ १६ विमान नक्की पाडले का असा सवाल असो. लोकांच्या मनातील शंकांना राज मोकळी वाट करून देत आहेत. त्यामुळे आघाडीचे काम सोपे होत आहे. प्रकाश आंबेडकर-ओवेसी यांच्या बहुजन वंचित आघाडीमुळे त्यांच्या मतांवर जो परिणाम होणार होता तो राज यांच्यामुळे काही प्रमाणात भरून निघणार आहे हे नक्की. 
 
राज नेमके काय साधणार ?
मोदी-शहा यांच्यावर तुफान टीका करून ठाकरे काय साधत आहेत असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. मात्र आपली भाजपविरोधी मते वाया जावू न देता त्याचा राजकीय लाभ घेण्याचा ठाकरे यांचा हा वेगळा प्रयोग आहे. समजा यदा कदाचित त्यांच्या मतांमुळे युतीचे काही उमेदवार पडले तर भविष्यात विधानसभेला ठाकरे यांना मोठा फायदा होणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आजच्या घडीला काही भूमिका घेतली नाही तर राजकीयदृष्ट्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखे होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील स्वतःची स्पेस कायम ठेवण्यासाठी त्यांना कोणती तरी भूमिका घेणे भाग होते. त्यात त्यांनी हा अनोखा प्रयोग केला आहे. भविष्यात त्याचे यश अपय़श दिसून येईल.

सद्यस्थितीत मात्र राज यांच्या ठाकरे शैलीने भाजपचे नेते घायाळ होत राहतील यात शंका नाही. शिवाय त्यांना प्रत्युत्तर देवूनही भाजपला काही फायदा नाही. कारण त्यांचे उमेदवारच रिंगणात नाहीत. अशा वेळी भाजपची दुहेरी कोंडी करण्याचा राज ठाकरे यांचा होरा असून त्यांना सध्या तरी यशस्वी झाले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Bijale writes about MNS chief Raj Thackeray rally in Mumbai