काश्मिरी तरुणांना 'आवाज' देणार : शाह फैजल

Shah Faesal
Shah Faesal

सन 2002 मध्ये ऐन परिक्षेच्या आदल्या दिवशी शाह फैजलच्या वडिलांची कुपवाडात दहशतवाद्यांनी हत्या केली. परिस्थीतीला तोंड देत तो एमबीबीएस झाला. 2009 मध्ये यूपीएससीत देशात प्रथम आला. काश्मीरचा युथ आयकॉन असलेल्या शाह फैजलने आता दहा वर्षांनंतर प्रशासकीय सेवेचा राजीनामा देवून थेट राजकारणात उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शाह फैजलशी साधलेला संवाद.

प्रश्न – यूपीएससी परिक्षा पास होणे कोट्यवधी तरुणांचे स्वप्न असते. असे असताना यूपीएससीत देशात प्रथम येवूनही चांगले करिअर का सोडलेस?
उत्तर - गेली दहा वर्षे मी प्रशासकीय सेवेत चांगले काम केले. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना माझ्याच भूमीतले हुनहार, हुशार मुले हातात दगड उचलत आहे हे पाहून मी अस्वस्थ होत होतो. संचारबंदी लागू करणे, त्यांना जेलमध्ये टाकणे, लाठीमार करणे यातून प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी राजकीय समस्या सोडवली पाहिजे, मुख्य प्रवाहातील राजकारण बदलण्याची गरज आहे. मुख्य प्रवाहातील राजकीय व्यवस्थेमुळे काश्मीरात पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे तो बदलण्यासाठी मी अखेर नोकरी सोडली.

प्रश्न – सध्या जम्मू – काश्मीरमध्ये अनेक राजकीय पक्ष असताना नव्या पक्षाची स्थापना करण्यामागचे कारण काय?
उत्तर – माझ्यासाठी हे फार मोठे आव्हान आहे. मला जर खासदार किंवा आमदारच व्हायचे असते तर सोपे आहे. कोणत्याही पक्षातर्फे मला निवडणूक सहज जिंकता आली असती. पण मी जेव्हा राजकीय पक्षात जाण्याचा विचार बोलून दाखविला. त्यावेळी राज्यातील युवकांनी त्याला कडाडून विरोध केला. सोशल मिडीयात विरोधासाठी मोठी मोहीमच सुरु झाली. मी कोणत्याही पक्षात गेलो तर पाठिंबा न देण्याची युवकांनी भूमीका घेतली. कारण तरुणाईचा सर्वच राजकीय पक्षांवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे राज्यातील युवा पिढीच्या भावनांचा सन्मान करून मी माझा नवा पक्ष स्थापन करण्याचे ठरविले आहे.

प्रश्न – नवा पक्ष काढणे सोपे नाही. त्यातही काश्मीरमध्ये घराणेशाहीचे राजकारण खोलवर रुजले आहे, अशा वेळी हे धाडसी पाउल वाटत नाही का?
उत्तर –
काश्मीरमध्ये सध्या फार मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. जनतेचा राजकीय व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. राज्यातील तरुण तर मतदानाला बाहेरही पडत नाही. या तरुणांना त्यांची भाषा समजणारा, बोलणारा आवाज हवा आहे. राज्यात आज 50 टक्के लोकसंख्या तिशीच्या आतील आहे. हाताला काम नसल्याने ते हताश आहेत. सध्याच्या राजकीय व्यवस्थेविषयी त्यांच्या मनात प्रचंड असंतोष धुमसत आहे. त्यामुळे पीएचडी मिळवलेला तरुण तसेच शिक्षकदेखील हातात दगड उचलत आहे. या सर्वांचा आवाज मांडण्यासाठी, त्यांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मी विचारपूर्वक हे धाडसी पाउल उचलले आहे. माझा पक्ष लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका लढवेल.

प्रश्न – काश्मिरी युवकांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही असे वाटते का?
उत्तर - कोणालाही युवकांच्या प्रश्नांशी देणेघेणे नाही. मी सामान्य कुटुंबातून आलो आहे. मी खडतर मार्गाने कष्ट करून यश मिळवले आहे. राज्यातील युवकांनी हे सारे पाहिले आहे. तरुणांच्या प्रश्नांशी मी जोडलेला आहे. त्यामुळे युवक मला त्यांच्याशी रिलेट करतात. युवकांमध्ये सध्याच्या राजकीय व्यवस्थेबद्दल खूप राग आहे. ते कोणत्याही पक्षाकडे जात नाहीत. त्यामुळे मी त्यांच्या प्रश्नांबद्दल बोलेन. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी काश्मीरी तरुणांचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तरुणांचा माझ्यावर मोठा विश्वास आहे.

प्रश्न – निवडणुकीसाठी संघटन लागते, पैसा लागतो. हे सारे कसे जुळवणार?
उत्तर - यासाठी मी क्राउड फंडिग सुरु केले. सामान्य लोकांकडे पैसे मागितले. अवघ्या दोन दिवसांत लाखो रुपये जमा झाले. काश्मीरात असे प्रथमच घडतेय. जिथे नेते लोकांना पैसे देतात पण मला गरीब, सामान्य लोकच पैसे देत आहेत. संघटना बांधण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. पण मला कोणतीही घाई नाही. निवडणुका जिंकणे हे माझे मुळ उद्दीष्ट नाही. राज्याची परिस्थीती मला ठीक करायची आहे. माझ्याकडे भरपूर वेळ आहे, संयम आहे, मुख्य म्हणजे माझ्या पाठिमागे युवा पिढी आहे. लोक पैसेही देत आहेत. अजून काय हवे आहे. त्यामुळे मी नक्की यशस्वी होईन. मला जे सोडायचे आहे ते सोडून दिले आहे. मला खासदार, आमदार बनण्यात रस नाही. मला राज्यातील प्रश्नांवर सोल्युशन द्यायचे आहे. 

प्रश्न – नोकरशाहीच देश चालवते असे गमतीने म्हटले जाते. काश्मीरमध्ये तर तशीच परिस्थीती आहे?
उत्तर - नोकरशाही कधीच लोकशाहीला पर्याय असू शकत नाही. लोकशाही मार्गानेच तुम्ही महत्वाचे प्रश्न सोडवू शकता. अर्थात लोकांसाठी करिअर सोडणारा मी काही पहिला व्यक्ती नाही. नेताजी सुभाषचंद्र बोसदेखील प्रशासकीय परिक्षा उत्तीर्ण झाले होते. पण त्यांनीही देशसेवेसाठी नोकरीचा त्याग केला होता. नेताजींच्या मार्गानेच मी जात आहे.  

प्रश्न – आपल्या वडिलांची दहशतवाद्यांनी हत्या केली. मग राजकारणात येण्याने आपल्याला जीवाचा धोका वाटत नाही का?
उत्तर -
कान्फिल्क्ट झोन मध्ये जीवाला धोका असतोच. माझी आई सुरवातीला खूप घाबरली होती. नोकरी सोडतोय हे आईला, पत्नीला समजावून सांगणे मला फार कठीण गेले. माझी पत्नीही शासकीय अधिकारी आहे. तिला समजावून सांगण्यास मला दोन वर्षे लागली. पण लोकांची सेवा करणे हे माझे उद्दीष्ट आहे हे समजल्यानंतर ते राजी झाले.

प्रश्न – राज्यातील प्रश्नांकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता?
उत्तर - राज्यात सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे तो राजकीय आहे. राजकीय पक्षांबद्दल सध्या विश्वासार्हता नाही. दिल्लीशी चर्चा करण्यास सध्याचे राजकीय नेतृत्व कमी पडत आहे. त्यामुळे राज्यात मोठा पेच निर्माण झाला आहे. लोकांचा राजकीय व्यवस्थेवरील विश्वास झपाट्याने उडत चालला आहे. तरुण राजकारणाकडे डुंकूनही पहात नाही. त्यामुळे वाईट लोक निवडून येतात. ते वाईट कामे करतात. त्यातून आणखी वाईट लोक राजकारणात येतात. त्यामुळे जम्मू – काश्मीर एका विचित्र गर्तेत सापडले आहे. त्यातून मार्ग काढण्याची गरज आहे. मुख्य प्रवाहातील राजकारणाचा पोत बदलण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. दुसरी समस्या घटनात्मक आहे. फाळणीनंतर विविध कायदे झाले. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लोकांमध्ये काही कायद्याबाबत नाराजी आहे. हे प्रश्न सोडवायचे असतील तर सर्वाशी चर्चा गरजेची आहे. नॅशनल कान्फरन्स, पीडीपी, हुरियत कॅन्फरन्स अशा सर्वच घटकांशी, पक्षांशी केंद्र सरकारने चर्चा करण्याची गरज आहे. तर राजकीय तसेच ऐतिहासिक प्रश्नांवर तोडगा निघणे शक्य आहे.

प्रश्न – विस्थापित काश्मिरी पंडितांना पुन्हा काश्मीर खोऱ्यात परत बोलवण्याबद्दल कोणीच काही बोलत नाही?
उत्तर - खरे पाहिल्यास पंडितांशिवाय काश्मीर अधुरे आहे. पंडिंताना परत बोलावून त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे, पण सध्याच्या परिस्थीतीत ते तरी येतील का. सध्या येथे असलेल्या नागरिकांचेच जीवन कमालीचे अस्थीर बनले आहे. ते स्थिर केल्यानंतरच पंडितांचे पुनर्वसन शक्य आहे.

प्रश्न – देशातील अन्य लोक काश्मीरकडे कसे पाहतात असे वाटते?
उत्तर -  देशातील सव्वाशे कोटी लोकांना जोपर्यंत वाटत नाही तोवर काश्मिरात शांतता नांदणार नाही. काश्मिरात होणाऱ्या मृत्युवरून राजकारण थांबायला हवे. काश्मिरबाहेरच्या सामान्य भारतीयांना येथील प्रश्नांची काहीच माहिती नसते. त्यांना वाटते ही जवान व दगडफेक करणाऱ्यांमधील लढाई आहे. पण तसे नाही. दोघेही मजबूर आहेत. जवान त्यांची ड्युटी करत आहेत. तर तरुणांमध्ये त्यांचे प्रश्न न सुटल्याने राग आहे. राजकीय नेते त्यांच्याशी बोलत नाहीत. त्यांचे प्रश्न सोडवत नाहीत. त्यामुळे ते कायदा हातात घेत आहेत. हे केंद्र व राज्य अशा दोन्हीकडील राजकीय नेतृत्वाचे अपयश आहे.

प्रश्न – प्रस्थापित राजकीय पक्ष तुम्हाला घाबरले आहेत का?
उत्तर - सध्या तरी नक्कीच नाहीत. प्रत्यक्ष राजकारण फार वेगळे असते. जोवर आम्ही काही करून दाखवत नाहीत तोपर्यंत त्यांना काही फरक पडणार नाही. पण मला काही घाई नाही.

प्रश्न – भारतीयांचा काश्मीरकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा वाटतो?
उत्तर - देशात मध्यमवर्गींयांची संख्या 40 कोटी आहेत. त्यातील अवघे लाखभर लोक काश्मीरमध्ये पर्यटक म्हणून येतात. जर तुमच्या घरातील कोणी आजारी असेल तर तुम्ही त्याला मदत करता ना. मग काश्मीरमध्ये नोकऱ्या नाहीत, उद्योगधंदे नाहीत असे असताना अन्य राज्यातील भारतीय काश्मीरींना मदत करत नाहीत. पर्यटकांवर कधीही हल्ला होत नाही, तरीही लोक येत नाहीत. आपण म्हणतो काश्मीर आमचे आहे आणि आम्ही तेथे जातही नाही. हे कसे काय. हा दृष्टीकोन बदलला पाहिजे.

प्रश्न – देशातील कोणता राजकीय नेता तुम्हाला आवडतो?
उत्तर - अरविंद केजरीवाल यांचे काम मला आवडते. त्यांनी एक लोकचळवळ सुरु केली. लोकांनी त्यांना शिव्या दिल्या. त्यांच्याकडेही पैसे नव्हते, राजकीय पार्श्वभूमी नव्हती, पाठिंबा नव्हता. असे असूनही पारदर्शी कारभारासाठी त्यांनी लोकांपुढे नवा राजकीय पर्याय दिला. जनतेने त्यांना स्वीकारले. केजरीवाल मला नेहमीच प्रोत्साहन देत आले आहेत.  

प्रश्न – आपले आवडते छंद कोणते?
उत्तर - मला संगीत, गाणी ऐकायला फार आवडते, तसेच ट्रेकिंगही करतो. वेस्टर्न, क्लासिकल, सुफी, अरेबिक सर्व प्रकारचे संगीत मी ऐकतो. नुसरत फतेह अली खान, गुलाम अली माझे आवडते गायक आहेत. नव्या पिढीचा अरिजित सिंग हा सध्या माल फार आवडतो.

प्रश्न – आवता लेखक कोण?
उत्तर - मी प्रामुख्याने नान फिक्शन वाचतो. त्यातही विकासात्मक अर्थशास्त्र हा माझ्या आवडीचा विषय आहे. जान राल्स माझे आवडते लेखक असून त्यांचे थेरी आप जस्टीस माझे सर्वात आवडीचे पुस्तक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com