आपण चुकत तर नाही ना...?

धनश्री बागूल
बुधवार, 21 जून 2017

मी आणि माझी मित्रमंडळी आम्ही रोज खेळायचो, पडायचो. अंगावर कुठंही खरचटलं नाही, असं कधीच व्हायचं नाही. त्यामुळं हे 'ओव्हर केअरिंग' आहे, असं प्रकर्षानं मला वाटलं. मुलं आहेत ती, पडणारच, त्यात काय इतकं? अशा धडपडण्याला, पडायला परवानगी हवीच.

परवा सहजच मैत्रिणीकडं जाताना अचानक बाहेर मैदानावर खेळणाऱ्या मुलांकडं लक्ष गेलं. उगीच गंमत म्हणून बघता बघता एकदम जाणवलं, की तिथं प्रत्येक मुलासोबत कुणीतरी परिवारातील मोठी व्यक्ती आहेच. फक्त बरोबर होतं असं नाही, तर प्रत्येकजण आपल्या मुलांना अनेक सूचना करीत होते. अरे.. हळू पळ, लागेल, दगड आहेत तिकडे, जपून, वाळूत सायकल घसरेल वगैरे. मला जरा आश्‍चर्यच वाटलं आणि मग आपलं बालपण आठवलं. ते दिवस आठवताना आजचं दृश्‍य पाहून असं वाटलं, की आपण काही चुकत तर नाही ना...?

माझं बालपण जळगावच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये गेलं. सुटीत मात्र आजीच्या गावाला म्हणजेच घोडगावला जायचे. तसे हे लहान गाव. दोन्ही ठिकाणी बालपण घालवताना मात्र मी अशी दृश्‍यं पाहिल्याचं आठवत तरी नाही. या सगळ्यांना बघता आम्हाला वाऱ्यावर सोडलं होतं, असं म्हटलं तरी हरकत नाही. मी आणि माझी मित्रमंडळी आम्ही रोज खेळायचो, पडायचो. अंगावर कुठंही खरचटलं नाही, असं कधीच व्हायचं नाही. त्यामुळं हे 'ओव्हर केअरिंग' आहे, असं प्रकर्षानं मला वाटलं. मुलं आहेत ती, पडणारच, त्यात काय इतकं? अशा धडपडण्याला, पडायला परवानगी हवीच. उलट सावकाश, सावकाश म्हणून कशाला सांगत बसायचं? आणि मग विचार करता करता अचानक आजची ही मुलं किती संरक्षित कोशात वाढतं आहेत, किती सो कॉल्ड प्रोटेक्‍टिव जगात वाढतं आहेत, असे जाणवायला लागलं. हा बदल लक्षात आला, जाणवला आणि मनाला कुठं तरी खुपला सुद्धा. मग एक एक गोष्टी आठवायला लागल्या.

बघा ना, आपण म्हणतो आजची पिढी हुशार होत चालली आहे. नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची क्षमता सुधारत चालली आहे. सारं मान्य आहे. पण हीच पिढी मैदानी खेळ खेळायला मागत नाही. कॉम्प्युटर गेम्स जास्त खेळते. काही खेळायचं असेल तर ते ऑनलाइन खेळत बसते. जमिनीवर बसायला सांगितलं, तर त्यांच्याकडून 'कपडे खराब होतील, ईऽऽ मातीत बसायचं? असं काहीतरी ऐकायला मिळतं. लहान मुलांचे ग्रुप आपापले खेळताना पाहणंसुद्धा दुर्लभ झालंय आजकाल. मला फार गंमत वाटते, जेव्हा शाळेच्या व्हॅनचा अथवा रिक्षाचा आवाज ऐकून आपल्या मुलाला गेटपासून घरी न्यायला कोणीतरी आई किंवा आजी थांबलेली असते. एक- दोन जिने चढून घरी का नाही येऊ शकत ती मुलं... खरंच इतकं काहीतरी विचित्र वाटायला लागलं. अशानं आपणच उगीच या मुलांना आपल्यावर अवलंबून नाही का ठेवत आहोत? त्यांना स्वतंत्रपणे गोष्टी करू द्यायच्या, त्यातनं चुकायला, शिकायला मुभा द्यायची, की सतत अवतीभवती राहून असं परावलंबी करायचं?

मातीची कसली आलीय घाण? उगीच बदलत्या जीवनशैलीच्या नावाखाली आपण काय काय कल्पना या मुलांना शिकवतोय ? जमिनीवर मांडी घालून बसणं, इतर लोकांमध्ये मिसळणं, मैदानावर खेळणं, आपापलं दुकानात जाणं, शाळेतनं घरी येणं, अशा अनेक गोष्टींपासून आपणच त्यांना लांब ठेवतो आहोत, नाही का? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. आपण काही चुकत तर नाही ना...?

Web Title: dhanashri bagul writes parenting children care play ground lifestyle