बटर चिकनच्या जन्माची कहाणी सुरु होते पाकिस्तानातून...

नेहा मुळे
शुक्रवार, 14 जून 2019

बटर चिकनसाठी ही आहेत पुण्यातील बेस्ट हॉटेल्स
- हॉटेल रविराज (भांडारकर रोड) 
- सरोवर रेस्टॉरंट (डेक्कन) 
- सन्मान फॅमिली रेस्टॉरंट (कर्वे नगर) 
- टॉप इन टाऊन (डेक्कन) 
- जॉर्ज रेस्टॉरंट (कॅम्प) 
- कलिंगा रेस्टॉरंट (एरंडवणे) 
- एनएच 37 ढाबा (युनिव्हर्सिटी रोड) 
- 1000 ओक्‍स (कॅम्प) 
- ढाबा 1986 दिल्ली (पॅव्हिलियन मॉल, सेनापती बापट रोड) 
- बटर चिकन फॅक्‍टरी (फिनिक्‍स मार्केट सिटी, विमान नगर)

चिकन खाण्याचा विचार करताच प्राधान्य दिलं जातं बटर चिकनला. छोट्या शहरापासून जगभर पसरलेला आणि विशेष म्हणजे बहुतेकांना आवडणारा हा पदार्थ. ज्या भारतीय पदार्थांना जगभर पसंती मिळाली, त्यामध्ये बटर चिकन अग्रगण्य आहे. पण हे बटर चिकन मुळात भारतीय नाहीच असे सांगितलं तर तुम्हाला पटेल का? आपल्या आवडत्या बटर चिकनचा जन्म झालाय पाकिस्तानमधील पेशावरमध्ये.  

बटर चिकनची किंवा हिंदीमध्ये ज्याला मुर्ग माखनी म्हणतात त्याची चव आता लोकांना इतकी आपलीशी झाली आहे की, ती चव घेऊन हे चिकन दुसऱ्या रूपातही मिळतं. टाकोजपासून पिझ्झापर्यंतची अनेक रूपं आपण बटर चिकनच्या चवीत खाऊ शकतो. चिकनमध्ये सर्वांत प्रसिद्ध म्हणून ओळखली जाणारी ही डिश मूळ कशी तयार झाली, याचा रंजक इतिहास खूप कमी जणांना माहीत आहे. 

Butter Chicken

पेशावरमधील एका रेस्टॉरंटमध्ये रोटी बनविण्यासाठी तंदूरचा वापर केला जायचा. दही आणि मसाल्यांमध्ये मॅरिनेट केलेलं चिकन या रोटी तंदूरमध्ये तयार करण्याचा प्रयोग केला गेला. पेशावरमध्ये मोखासिंग लांबा यांच्या रेस्टॉरंटमध्ये हा प्रयोग झाला होता. यातून तंदुरी चिकनचा जन्म झाला. फाळणीनंतर हे रेस्टॉरंट बंद पडलं. तिथं काम करणारे कुंदनलाल जग्गी, कुंदनलाल गुजराल हे फाळणीनंतरच दिल्लीला स्थलांतरित झाले. त्यांनी ठाकूरदास या अजून एका निर्वासित तरुणासोबत दिल्लीत "मोती महल' नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं आणि चिकनच्या पेशावरी डिशचा पुनर्जन्म केला. हे चिकन साठवण्याची योग्य यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती. उरलेल्या तंदुरी चिकनची चव दुसऱ्या दिवशी बदलत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यातून गुजराल यांनी त्या चिकनची चांगली चव कायम ठेवण्यासाठी बटर, टोमॅटो प्युरी, क्रीम आणि काही मसाले मिसळून ग्रेव्ही तयार केली. यातून तयार झालं बटर चिकन. अपघाताने बनलेली डिश असं आपण याला म्हणू शकतो. 

butter chicken

दिल्लीतल्या "मोती महल'मध्ये तयार झालेल्या या बटर चिकनची चव अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांनी चाखली आणि त्यांना आवडलेली चव आपल्या देशातील लोकांपर्यंतही पोचावी म्हणून आपापल्या देशांत नेली. थोडक्‍यात, बटर चिकनची ती जागतिक पातळीवरच्या प्रवासाची सुरवात होती. बटर चिकनच्या या प्रवासाबाबत असं म्हटलं जातं, की पंडित नेहरूंना या चिकनची चव इतकी आवडली की त्यांनी देशांमध्ये आलेल्या परदेशी राजकीय पाहुण्यांसाठी खाद्यपदार्थ बनविण्याची जबाबदारी "मोती महल'कडे दिली. या काळात "मोती महल' बटर चिकनबरोबरच इतर डिशेससाठीही प्रसिद्ध झालं. 

butter chicken

भारतीय खाद्यसंस्कृतीची ओळख म्हणून ज्या पदार्थांना मान्यता आहे, त्यापैकी बटर चिकन हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. दिल्लीपासून जगभर लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेले बटर चिकन पुणेकरांच्याही पसंतीचे आहे. त्याची लक्षात राहणारी चव घ्यायची झाल्यास पुण्यातल्या निवडक रेस्टॉरंटचा विचार करायलाच हवा.

बटर चिकन खाण्यासाठी ही आहेत पुण्यातील बेस्ट हॉटेल्स :
- हॉटेल रविराज (भांडारकर रोड) 
- सरोवर रेस्टॉरंट (डेक्कन) 
- सन्मान फॅमिली रेस्टॉरंट (कर्वे नगर) 
- टॉप इन टाऊन (डेक्कन) 
- जॉर्ज रेस्टॉरंट (कॅम्प) 
- कलिंगा रेस्टॉरंट (एरंडवणे) 
- एनएच 37 ढाबा (युनिव्हर्सिटी रोड) 
- 1000 ओक्‍स (कॅम्प) 
- ढाबा 1986 दिल्ली (पॅव्हिलियन मॉल, सेनापती बापट रोड) 
- बटर चिकन फॅक्‍टरी (फिनिक्‍स मार्केट सिटी, विमान नगर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Did you know butter chicken is originated from peshwar in Pakistan