Krishna Janmashtami : श्रीकृष्णाच्या अगाध लीला!

हेमा उजळंबकर 
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

श्रीकृष्ण कधी बाळ, तर कधी मुरली वाजवणारा, कधी लोणी खाणारा तर कधी घागर फोडणारा, कधी रुक्‍मिणी हरण करणारा तर कधी अर्जुनाला गीता सांगणारा. असा विविध रूपांतला श्रीकृष्ण आजही आपल्यावर आपल्या कृपेचा वर्षाव करतो.

गोकुळाष्टमी : 

देवकी मातेच्या कुशीतून जन्मलेला श्रीकृष्ण नंद यशोदेच्या गोकुळात, गोपगोपींच्या सहवासात मोठा झाला. या श्रीकृष्णाच्या लीला अगाध. या सर्व भागवत पुराणातून आपल्याला ऐकायला मिळतात. मायावी पुतनादी राक्षसीनीपासून सर्वांना वाचवले, गोवर्धन पर्वत करंगुलीवर उचलला, कंसाचे निर्दालन केले, कौरवांचा पराजय केला, पांडवाचा पाठीराखा झाला आणि संपूर्ण विश्‍वात अर्जुनाच्या निमित्ताने भगवतगीतेद्वारे ज्ञान प्रदान केले. अशी ही श्रीकृष्णाची परमपवित्र कथा. आजही घरोघरी श्रीकृष्णाची भक्ती करतात. त्याच्या चरणी लोटांगण घालतात. 

हा श्रीकृष्ण कधी बाळ, तर कधी मुरली वाजवणारा, कधी लोणी खाणारा तर कधी घागर फोडणारा, कधी रुक्‍मिणी हरण करणारा तर कधी अर्जुनाला गीता सांगणारा. असा विविध रूपांतला श्रीकृष्ण आजही आपल्यावर आपल्या कृपेचा वर्षाव करतो. गोपाल श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवनच तर्कापलीकडचे आहे. विश्‍वाचा व्यापक पसारा ज्याने मांडला, विश्‍वाचा गोल ज्याने अधांतरी ठेवला त्याला काही अशक्‍य नाही. हा नटखट बाळकृष्ण गोकुळला जन्माला येताच गोकुळातील समृद्धीला वाढ झाली. तप्त सुवर्णासम कांती असलेला बाळकृष्ण खूपच सुंदर होता. त्याचे सौंदर्य पाहिल्यावर दुसरे काही पाहावयाचे शिल्लकच उरत नाही, असे वर्णन भारतीय संस्कृतीतील ग्रंथांत ऋषी-मुनींनी केलेले आहे. कृष्ण म्हणजे साक्षात मन्मथ. 

krishna

या श्रीकृष्णाची विलक्षण लोकप्रियता गोकुळातील सर्व जनजीवनात होती. कालिया नागमर्दनाचा प्रसंग या दृष्टीने खूपच बोलका आहे. सर्व गोकुळवासीयांना याने वेड लावले होते. एवढ्या अल्पयातच लोकांच्या हृदयात स्थान मिळविणारा गोपाळकृष्ण साहित्य सारस्वतात वर्णिला आहे. याचे महत्त्वाचे कारण स्वतःचे श्रेष्ठत्व विसरून तो सर्वसामान्य लोकांत मिसळून गेला होता. अहं कर्तत्वाचा लोप त्याने केला होता. मी तुमच्यातीलच एक आहे. विशेष कोणी नाही ही भावना त्याने जपली होती. श्रीकृष्णाच्या चारित्र्याने सगळ्यांनाच वेड लावलेय. अगदी संत, कवींपासून, सगळ्यांच्या भक्तीची, साहित्याची प्रेरणा श्रीकृष्ण. याच चारित्र्यातून आपण दोन गोष्टी आपल्या जीवनात आचरणात आणू शकतो.

पहिली गोष्ट म्हणजे अहंकाराला आपल्या जीवनातून दूर फेका. श्रेष्ठत्वाचा गर्व सोडा. त्याचप्रमाणे शरीर निरोगी, निरामय ठेवा. गोपालकृष्णजी लोण्याची चोरी करीत असे त्या चोरीतही पावित्र्य आहे. यशोदेकडे गाऱ्हाणे घेऊन आलेल्या गौळणीच्या तक्रारीत हे जाणवते. "येणे येणे वो श्रीरंगे! नवनीत भक्षीले मासे''. गाऱ्हाणे बंद व्हावेत म्हणून हा गोपाळकृष्ण गाई घेऊन रानात जाई. रानात खूप सवंगडी सोबत असत. खेळून दुपारी भूक लागली की हा कृष्ण सर्वांना आपापल्या शिदोऱ्या सोडण्यास सांगत. यामागचा उद्देश हाच की गरी, श्रीमंत असा भेद न करता सर्वांनी सारखेच खावे. जातीभेदाला महत्त्व न देता गुणकर्माचा विकास करण्याची संकल्पना या गोपाळकृष्णाच्या "काल्यात' आहे. श्री गोपालकृष्णाच्या काल्यातही समाजवादाचे खरे बीज आहे, असे दिसून येते. अनेक वस्तू एकत्र आणणे म्हणजेच "काला' करणे. विविध स्वभावाची, विविध गुणदोषांची माणसे एकत्र येणे म्हणजेच काला होणे. काल्यात गोपाल येणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने भगवंताला त्याच्या नामस्मरणाला जाणले पाहिजे. 

श्रीकृष्ण भक्तीत चिंब चिंब झालेली पदे ही आपल्या अंतरीचा ठाव घेतात आणि भक्तीत प्रवाहित करतात. संत ज्ञानेश्‍वरांचा भक्तिभाव अंतरीच्या उमाळ्यातून उठतो, तर संत तुकाराम, संत एकनाथ, संत कबीर, संत सूरदास, संत नरसी मेहता तर कृष्ण भक्तीत सारे विश्‍व विसरले. मीराबाईच्या श्रीकृष्णावरील अपरंपार भक्तीने तर तिची पदे शब्दाशब्दांतून नुसती निथळतात. 

"तुम बिन मोरी कौन खबर लें! गोवर्धन गिरिधारी! 
मीरा के प्रभू गिरिधर नागर, चरणकमल बलिहारी रे! 
ही प्रभुचरणी अनन्य शरणता, हे प्रभूशी जीवाशिवाचे नाते ही कृष्णावरील परमभक्ती संत मीराबाईची. 

कृष्णाष्टमी ! श्रावण सरींमध्ये, विजेच्या कडकडाटात अंधाऱ्या धरतीवर अवतरलेल्या "परित्राणाय साधुनाम्‌ विनाशायाचं दृष्कृताम्‌' अशा श्री गोपालकृष्णास शतश वंदन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Different forms of lord ShriKrishna