Vidhan Sabha 2019 : अशी आखली काँग्रेसने स्ट्रॅटेजी 

Congress
Congress

राज्याची निवडणूक तीन आठवड्यांवर आली असताना, काँग्रेसच्या आघाडीवर मोठ्या हालचाली दिसत नसल्याने, राज्याच्या राजकीय वातावरणात अस्वस्थता जाणवत आहे. काय आहे काँग्रेसची स्ट्रटेजी (रणनिती)? खरोखरच काँग्रेसने निवडणूक सोडून दिली आहे, की वेगळ्या पद्धतीचे डावपेच आखून त्यावर कार्यवाही सुरू केली आहे, याकडे लक्ष द्यावे लागेल. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी एकहाती केलेल्या जोरदार प्रचारानंतरही अनपेक्षितपणे पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. तरीदेखील पक्षाचा मताधार घटला नाही, उलट तो वाढला. त्यांना बारा कोटी मते मिळाली, पण त्याचे विजयात रुपांतर करता आले नाही. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांत मात्र, काँग्रेस प्रसिद्धीपासून अलिप्त राहिल्याचे जाणवते. पक्षात आलेले नैराश्‍य झटकत ते पुन्हा शांतपणे पक्षबांधणी करण्याला लागले आहेत. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील ऐन निवडणुकीत नेतृत्व सोडून सत्ताधारी पक्षात पोहोचले. त्यानंतर, नितेश राणे, निर्मला गावीत, अब्दुल सत्तार, जयकुमार गोरे यांच्यासह एकूण सात आमदारांनी सत्ताधारी पक्षाचा आसरा घेतला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले. आणखी पाच-सहा आमदार जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. एवढ्या घडामोडी घडत असतानाही काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात जाहीर टीका झाली नाही. 

राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करतानाही यावेळी जागांवरून वाद झाला नाही. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 125 जागा घेत मित्र पक्षांनाही भरपूर जागा देण्याचे ठरविले. त्यामुळे, उमेदवारांची नावे ठरवितानाही काँग्रेस आघाडीवर राहिली. त्यांची यादी जाहीर झाली. त्यावेळी पक्ष सोडून जाण्याची साशंकता असलेल्यांना त्यांनी दूर ठेवले. यावरून पक्षात राहिलेल्यांना टिकवून ठेवत, त्यांच्यामागे उभारण्याची भूमिका काँग्रेसनी घेतल्याचे जाणवते. 

जिल्हानिहाय जबाबदारी 
पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करताना, पाच कार्याध्यक्ष नियुक्त केले. केंद्रातून पाचजणांना प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविली. त्यामुळे, थेट राज्य पातळीवर काही हालचाली न ठेवता जिल्हा हे केंद्र ठरवून, स्थानिक नेत्यांवर जबाबदारी सोपविली. प्रमुख नेत्यांवर त्या भागातील मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली. उदाहरणार्थ गडचिरोली, चंद्रपूर भागात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, नगरमध्ये थोरात, नांदेडमध्ये अशोक चव्हाण अशी पद्धत अवलंबली. त्यांच्याशी चर्चा करून उमेदवार ठरविले. 

काँग्रेसचे गेल्या निवडणुकीत आत्तापर्यंतचे सर्वांत कमी 42 आमदार निवडून आले. त्यांच्याकडे 30च्या आसपास आमदार आहेत. त्यांच्यामागे ताकद उभी करतानाच युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी साठ मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले, की ज्या मतदारसंघांत गेल्या निवडणुकीत थोडक्‍या मतांनी पराभव पत्करावा लागला, तेथे गेले तीन महिने तरुण कार्यकर्ते बूथपातळीवर काम करीत संघटना बळकट करीत आहेत. 

30 ते 60 जागांचे लक्ष्य? 
काँग्रेसमध्ये दरवेळी उघडपणे दिसून येणारा पक्षांतर्गत वाद यंदा नाही. त्याचवेळी, त्यांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत यंदा कधी नव्हे तेवढा एकोपा जाणवत आहे. आघाडी एकसंधपणे लढल्यास, त्यांना ठराविक मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करून गेल्या वेळेइतक्‍या किंबहुना त्यापेक्षा जास्त जागा पदरात पाडून घेता येतील. वेगवेगळ्या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला कमीत कमी 30, तर जास्तीत जास्त 55 जागा मिळतील. ही संख्या साठपर्यंतही वाढू शकेल. ते लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस कार्यरत झाल्याचे जाणवते. 

स्थानिक विषयांवर प्रचारात भर 
पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहूल व प्रियांका यांच्यासह अन्य राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री हे जाहीर प्रचारात सहभागी होताना, राज्यातील नेते जिल्हापातळीवर तळ ठोकून बसतील. प्रचारात प्रादेशिक, स्थानिक विषयांवर भर दिला जाईल. कोल्हापूर, सांगली, गडचिरोली भागातील पूर, पुण्यातील नाल्याच्या पुराची दुर्घटना, मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, साखर कारखान्यांपुढील आव्हाने हे विषय असतील. आर्थिक मंदी, बेरोजगारी यांबरोबरच मुंबईतील पीएमसी बॅंकेवर आरबीआयने घातलेल्या निर्बंधाचा मुद्दाही प्रचारात गाजणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com