युतीचे नेते म्हणतात 'आमचं ठरलं?' पण काय... 

ज्ञानेश्‍वर बिजले 
बुधवार, 24 जुलै 2019

बिहारमध्ये नितीशकुमार, महाराष्ट्रात ठाकरे या एनडीएतील मित्रपक्षांच्या काही अटी मान्य करीत तडजोड केली. त्याच वेळी, राज्यात विधानसभा निवडणुका एकत्र लढविण्याचीही घोषणा भाजपचे तत्कालिन अध्यक्ष अमित शहा, फडणवीस व ठाकरे यांनी 18 फेब्रुवारीला एकत्रित केली. 

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व 288 जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश पदाधिकाऱ्यांना दिला. शिवसेनाही सर्व जागा लढविण्याची तयारी करीत आहे. नेत्यांच्या राज्यभर यात्रा सुरू झाल्या आहेत. विधानसभेला युती होण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम आहेत. ठाकरे म्हणाले, "आमचं ठरलं'. पण, त्यांच्यात नक्की काय ठरलं, ते कळेनासे झाल्याने, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. युती टिकणार की तुटणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. 

स्वबळावर निवडून येण्याचा विश्‍वास नसतो, तेव्हाच अन्य पक्षांची गरज भासते. मात्र, स्वबळ वाढल्यास, एकटे लढण्याचा कार्यकर्त्यांचा रेटा सहन करताना नेत्यांची कसोटी लागते. भाजप सध्या त्या दबावाला तोंड देत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळाची खात्री नसल्याने, त्यांनी एनडीए पुन्हा जिवंत केली. बिहारमध्ये नितीशकुमार, महाराष्ट्रात ठाकरे या एनडीएतील मित्रपक्षांच्या काही अटी मान्य करीत तडजोड केली. त्याच वेळी, राज्यात विधानसभा निवडणुका एकत्र लढविण्याचीही घोषणा भाजपचे तत्कालिन अध्यक्ष अमित शहा, फडणवीस व ठाकरे यांनी 18 फेब्रुवारीला एकत्रित केली. 

राज्यात 48 पैकी 41 जागा जिंकताना 217 विधानसभा मतदारसंघांत भाजप-शिवसेना युतीने आघाडी घेतली. विधानसभेत बहुमतासाठी 145 आमदार लागतात. त्यामुळे, विधानसभेला युतीच विजयी होणार, हे जवळपास निश्‍चित मानले जाते. दोन्ही पक्षांचे नेते वेगवेगळी वक्तव्य करू लागले, तेव्हा ठाकरे व फडणवीस यांनी दोन्ही पक्षांच्या आमदारांची एकत्रित बैठक घेतली. जागा वाटपाचे सूत्र ठरले असून, त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ, असे या नेत्यांनी बजावले. त्यानंतर शिवसेनेच्या 18 खासदारांसह कोल्हापूरला सहा जूनला गेल्यानंतर, तेथे ठाकरे म्हणाले, ""आमचं ठरलं. युती मजबूत आहे. युती व्हावी, वाटत नाही, त्यांच्या दुःखात मी सहभागी होणार नाही.'' 

राज्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. शिवसेनेची सत्ता आल्यास, आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होईल, असे खासदार संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यात जळगावला जाहीर केले. अमित शहा व ठाकरे यांच्यात जागावाटपाचे ठरले आहे. जागेचे समसमान वाटप होईल, जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला लवकरच समोर येईल, असेही ते म्हणाले. 

दुसरीकडे, "मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे,' असे फडणवीस यांनी जाहीर केले. युती होणार की नाही, याचा विचार न करता सर्व 288 मतदारसंघांत तयारीला लागा, अशी सूचना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आमदारांना व पदाधिकाऱ्यांना दिली. त्याला शिवसेनेच्या काही नेत्यांनीही प्रत्युतर देत, सर्व जागा लढविण्याची तयारी दर्शविली. 

भाजपला केंद्रात एकहाती सत्ता मिळाल्यानंतर, त्यांनी एनडीएतील मित्रपक्षांना फारशी किंमत दिली नाही. लोकसभेला बिहारमध्ये 40 पैकी 39 जागा जिंकल्यानंतरही, भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांना बाजूला सारण्यास सुरवात केली. नितीशकुमार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीपद जनता दलासाठी घेतले नाही. बिहारमध्ये या दोन पक्षांचे सरकार आहे. शिवसेनेलाही केंद्रात केवळ एकच मंत्रीपद मिळाले. भाजपला सर्वत्र त्यांच्या पक्षाची सत्ता हवी आहे. त्यांचे केंद्रीय नेतेही त्याच पद्धतीने वाटचाल करीत आहेत. कर्नाटक, गोवा येथे त्याचे प्रत्यय येत आहेत. पंजाबात भाजपचे नेते अकाली दलाची युती तोडण्याचा आग्रह करीत आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्रात शिवसेनेची युती टिकणार का, हाही प्रश्‍न कार्यकर्त्यांना भेडसावत आहे. 

सत्तारूढ पक्षांतील या हालचाली कार्यकर्त्यांना गोंधळात टाकत आहेत. विशेषतः निवडणूक लढवू इच्छिणारे अधिक अस्वस्थ झाले आहेत. अन्य पक्षांतून आलेल्या इच्छुकांचे तर धाबे दणाणले आहे. राज्यात युतीचे सध्याच दोनशेच्या आसपास आमदार आहेत. त्यामुळे जेमतेम शंभर जागांचेच वाटप केले जाणार आहे. त्यातही अन्य मित्रपक्ष दहा-पंधरा जागा घेणार आहेत. भाजपच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने, उर्वरीत जागांच्या वाटपात शिवसेनेचे पारडे जड होणार आहे. हे उघड सत्य दिसत असल्याने, भाजपच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. 

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना ठिकठिकाणी भाजप त्यांच्या पक्षात सामावून घेत आहे. त्या नेत्यांचे काय करायचे, पक्षातील निष्ठावंतांची समजूत कशी घालायची, या समस्या भाजपला भेडसावणार आहेत. शिवसेनेलाही कमी अधिक प्रमाणात ही समस्या सतावणार आहे. लोकसभा निवडणुकीतही चंद्रपूर व औरंगाबाद मतदारसंघांत शिवसेनेच्या आमदारांनी युतीला झटका दिल्याने, युतीला पराभव पत्करावा लागला. युती झाल्यास, काही मतदारसंघांत बंडखोरीचा सामना करावा लागेल. 

युतीचे नेते म्हणतात, "आमचं ठरलं', पण काय ठरले, हा खरा प्रश्‍न दोन्ही पक्षांतील इच्छुकांपुढे, तसेच या पक्षांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांपुढे आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला कधी जाहीर होणार, कोणती जागा कोणत्या पक्षाच्या पारड्यात पडणार, हा कळीचा मुद्दा आहे. ते जाहीर झाल्यावर, काही मतदारसंघांत वाद निर्माण होणार, हे निश्‍चित. 

नेत्यांमध्ये "ठरलेले' जाहीर करण्यासाठी, जागा वाटप निश्‍चित केले पाहिजे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि ठाकरे यांची यासंदर्भात नुकतीच बैठक झाली आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांनी दुसऱ्या पक्षानी गेल्या वेळेला जिंकलेल्या काही जागांची मागणी केली आहे. चर्चेत ते सोडवितानाच समसमान जागा वाटप कसे करायचे, ते ठरवावे लागेल. 

जागा वाटप होताच, पक्षांतर्गत मागण्या वाढणार. काही मतदारसंघांत कार्यकर्त्यांचे रुसवे, फुगवे यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिना महत्त्वाचा ठरणार आहे. त्यावेळी दोन्ही पक्षांतील नेते राज्यभर दौरा करणार आहेत. त्याच वेळी वेगवेगळ्या सर्वेक्षण व चाचण्यातून राज्यातील राजकीय स्थितीचा अंदाज नेते बांधतील. त्यावरच युतीची पुढील वाटचाल ठरेल. तोपर्यंत युतीच्या नेत्यांचे "काय ठरले' ते समजण्यासाठी वाटच पहावी लागणार आहे....... 

........... .......... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Bijle writes about Shivsena BJP alliance in Maharashtra