अस्वलखिंडीतली माउली

रायरेश्‍वराच्या पठारावरून नाखिंदा टोकाकडे जाऊ लागो की केंजळगड-कमळगडापासून ते तोरणा राजगडापर्यंतचा केवढा सह्याद्री दोहो बाजूंना नजरेच्या टप्प्यात येतो.
Aswal Khind Old Women
Aswal Khind Old WomenSakal
Summary

रायरेश्‍वराच्या पठारावरून नाखिंदा टोकाकडे जाऊ लागो की केंजळगड-कमळगडापासून ते तोरणा राजगडापर्यंतचा केवढा सह्याद्री दोहो बाजूंना नजरेच्या टप्प्यात येतो.

गेली सुमारे चाळीस वर्षं डोंगरांवर-दुर्गांवर आणि अरण्यदऱ्यांमध्ये मनमुराद भटकलो. या भटकंतीदरम्यान अनेक विलक्षण माणसं भेटली. त्यांच्याबरोबर फिरलो-जेवलो...त्यांच्या घरा-झोपड्यांत राहिलो...ती माणसं माझी कधी झाली आणि मी त्यांचा कधी झालो हे कळलंच नाही. माझ्यासाठी ते निव्वळ वाटाडे नाहीत...म्हणून डोंगर-दऱ्यांतल्या या माणसांना मी ‘अरण्यनायक’ म्हणतो. अशाच अरण्यनायकांविषयी या सदरातून...

रायरेश्‍वराच्या पठारावरून नाखिंदा टोकाकडे जाऊ लागो की केंजळगड-कमळगडापासून ते तोरणा राजगडापर्यंतचा केवढा सह्याद्री दोहो बाजूंना नजरेच्या टप्प्यात येतो. या दऱ्या-खोऱ्यातील कितीतरी वाटांनी रायरेश्‍वर चढलो...आणि उतरलोही...पण एक वाट मनात घर करून राहिली. नाखिंदा टोकाच्या बाजूनं पठार उतरून अस्वलखिंडीतून कामथ्याला उतरणं...त्याला कारणही तसंच...एका अव्यक्त आणि अज्ञात वाटाड्याचं नव्हे, तर अस्वलखिंडीतल्या एका माउलीचं...

रायरेश्‍वराचं दर्शन घेऊन भल्या पहाटेच आम्हाला पठाराच्या नाखिंदा टोकाकडं निघायचं होतं आणि नाखिंद्याच्या बाजूनंच पठार उतरून अस्वलखिंड गाठायची होती. नाखिंद्याच्या उतारालाच मोहिमेचा खरा थरार सुरू होणार होता.

उतरण्याचे मार्ग दोन. एक नाखिंद्याच्या टोकापासून सरळ खाली पश्‍चिमेला थेट अस्वल खिंडीजवळ उतरणारा; पण हा तसा अवघड. दुसरा कुदळे गावच्या दिशेनं तीव्र उताराचा; पण कमी धोक्‍याचा. या वेळी कुदळ्याच्या बाजूनं उतरण्याचा निर्णय आम्ही घेतला. नाखिंद्यापासून जंगलातून मागं येऊन पठारावरून पूर्ण दरीला वळसा घालून कुदळ्याच्या बाजूला पोहोचलो तेव्हा सूर्य माथ्यावर आला होता. या उशिरामुळेच माझ्या मनाची घालमेल होत होती. रुळलेली वाट सोडली होती. मळलेली अशी वाट नव्हतीच. कुदळ्याला शक्‍य तितक्‍या लवकर पोचायचं होतं.

पठारावरच्या नामदेवला बरोबर घेतलं; पण तोही गडबडला होता. उतार तसा तीव्रच होता. पुढं जाऊन वाटेची खात्री करणं आणि परत सगळ्यांना घेऊन उतरणं अशी कसरत सुरूच होती. जवळचं पाणीही संपू लागलं होतं. क्षणोक्षणी तीव्र होणाऱ्या डोंगर-उतारानं झाडी, मोकळं वन, दरीचा काठ अशी मार्गक्रमणा सुरूच होती...सह्याद्रीच्या या आव्हानात कुदळ्यातली घरं दिसू लागली तेव्हा सूर्य कलतीकडे सरकला होता. पाण्याच्या ओढीनं का होईना; अडखळणारी पावलं गती घेऊ लागली आणि अखेरीस कुदळ्यातल्या एका अंगणात विसावलो. घशातून खाली उतरणारं पाणी, त्याला ‘जीवन’ का म्हणतात, हे सांगत होतं.

या साऱ्या उतरंडीमध्ये चांगलाच उशीर झाला होता. दुपारचे चार वाजून गेले होते. पाठीमागचं उतरून आलेलो रायरेश्‍वराचं पठार न्याहाळत होतो. क्षणभर डोळे मिटले. मिटलेल्या डोळ्यांसमोर ‘अस्वलखिंड’ उभी राहिली. अजून तर ती चढून जंगल-उतारानं कामथे गाव गाठायचं होतं.

गावकरी आमच्याकडं थोडं कुतूहलानं, थोडं आश्‍चर्यानं पाहत होते. ज्यांच्या अंगणात बसलो होतो ते म्हणाले : ‘‘पुढं काय?’’

मी समोरच्या डोंगराकडे बोट केलं आणि म्हणालो : ‘‘अस्वलखिंड चढून कामथे.’’

ते म्हणाले : ‘‘आत्ता?’’

मी म्हणालो : ‘‘हो!’’

कारण अस्वलखिंड चढून पुन्हा कामथ्यात उतरायला किमान तीन ते चार तास लागणार होते. आमचा हा संवाद ऐकून सहकारी एकमेकांकडे आणि माझ्याकडेही पाहू लागले. त्यांना जणू जाणवलं की चढ-उताराची आणखी एक अरण्यपरीक्षा समोर आहे. अस्वलखिंड चढून जाईपर्यंतच अंधार सोबतीला येणार होता. मग उतार किती खोल असतो याचा विचार न केलेलाच बरा.

आम्ही खिंडीच्या दिशेनं झपाझप चालू लागलो. गाव मागं पडलं. अस्वलखिंडीचा चढ सुरू झाला. नीरेचं कोरडं पात्र ओलांडलं. चढ अधिकच खडा झाला. पश्‍चिमेचं क्षितिज लाल झालं. पावलं झपाझप पडू लागली. जंगलात दाटलेल्या त्या उष्ण वाऱ्यात मन अधिकच कातर झालं. खिंडीच्या माथ्यावर पोहोचेपर्यंत सूर्य क्षितिजाला टेकला होता. जणू पश्‍चिमेच्या दरीच्या गर्भात लुप्त होत होता. दोन्ही बाजूंचे डोंगर काळवंडत होते. झाडं विरघळून जात होती.

दरीच्या कुशीत शिरलो...काळोखाचा भाग बनून गेलो. दरी संपता संपेना...अंधार हटता हटेना. चालतच राहिलो...पायतळीच्या वाळलेल्या पानांचं संगीत दाही दिशांच्या अंधारात काय ते सोबतीला होतं. निमग्न चालता चालता अचानक दूरवर दिसणाऱ्या वाडीतल्या दिव्यांनी भानावर आलो...अजूनही जंगल दरी उतरतोच आहे. वाडीचे दिवे तर दिसताहेत...पण वाडी येता येत नाहीय...पुन्हा दाट जंगल सुरू झालं. वाडी आणि दिवेही दिसेनासे झाले. दरीतला अंतहीन अंधार...

एवढ्यात दूरवरून हाक ऐकू आली, ‘डोंगर चढून वर येऊ नका... वाडीत जायची वाट उजवीकडून पाणंदीतून जाते...’ आम्ही चमकून आवाजाच्या दिशेनं पाहिलं...विजेरीच्या प्रकाशात एक मानवी आकृती डोंगरकड्याच्या टोकावर उभी होती. स्त्री-आकृती... कुण्या एका माऊलीची. कोण होती? कुणास ठाऊक?...त्या डोंगरकड्यावर ती का आली? कुणास ठाऊक? आम्ही जंगलात वाट शोधतोय हे तिला कसं कळलं? कुणास ठाऊक? आम्ही कुठं जाणार आहोत हेही तिला कसं कळलं? कुणास ठाऊक!

आम्ही तिला कसे दिसलो हेही कळत नाही; पण आम्ही कुठं आहोत हे तिला नक्की दिसत होतं.

ती वरूनच सांगत होती... ‘उजवीकडं चला, बांधावर या, दगडावरून पलीकडं जावा...उजवी वाट सोडा, डावीकडच्या पाण्याच्या वाटेनं जावा...आम्ही चुकलो की तिला कळायचं. ती ‘मागं या’ म्हणायची. आम्ही भारावल्यासारखे तिच्या आज्ञा पाळायचो. तिच्या आज्ञेबरहुकूम जंगलवाटा पार करत, वाडीच्या जवळ येऊन पोहोचलो. वाडीच्या पुढ्यात आलो. आता उंच डोंगरकड्यावरचा तिचा आवाज बंद झाला. त्या शून्य अंधारात आम्ही तिचं अस्तित्व शोधू लागलो. तिथूनच ओरडलो, ‘माउली, असशील तिथं उभी राहा. तुझ्या पाया पडायचंय. तू कोण आहेस ते माहीत नाही; पण या दुर्ग-डोंगरांनी, अरण्यांनीच आऊसाहेबांच्या आज्ञेनंच तुम्हाला पाठवलंय हे नक्की.’ माझ्यापाठोपाठ सगळे वाकले. भूमीला माथा टेकवला. जणू तिच्या पायावरच डोकं ठेवलं. ती कुठून आली, कुणास ठाऊक! का आली, कुणास ठाऊक! पण आईसारखं बोट धरून वाडीत सोडून गेली एवढं खरं! असे अनेक अनुभव सह्याद्रीच्या दऱ्या-दऱ्यांमध्ये येतात.

मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात कामथ्यातले गावकरी आमच्या आजूबाजूला जमले होते. कुणी परिचित, कुणी ना नात्यातलं, ना गोत्यातलं...पण आपलं. कुणी ओळखीचं...कुणी अनोळखी...पण याचा काही प्रश्‍नच नव्हता. सह्याद्रीच्या पोटातली ही माणसं ओळख असण्या-नसण्याच्या पलीकडची असतात.

अशी अनेक माणसं दुर्गांच्या, डोगरांच्या, अरण्यांच्या वाटांवर भेटली आणि कायमचीच मनात घर करून बसली. त्यांचं बोट धरून केवढा विलक्षण सह्याद्री फिरलो...सातपुडा, विंध्य, नीलगिरीही फिरलो. रानवाटांवरची अशी विलक्षण माणसं...या लेखमालेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना भेटतील...आपल्याशी बोलतील...त्यांच्या चंद्रमौळी घरात नेतील. उंच डोंगरावर नेतील, निबिड अरण्यात फिरवतील...त्यांच्या सणा-उत्सवात बोलावतील...त्यांच्या निसर्गदेवतांकडे घेऊन जातील...

(सदराचे लेखक दुर्ग-अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com